पक्षाच्‍या 'शस्त्रक्रिये'चे गडकरींचे संकेत

अभिनय कुलकर्णी

शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2010 (10:55 IST)
PTI
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन म्हणजे केवळ काही पदाधिका-यांची गर्दी किंवा नुसत्या चर्चाचे व्‍यासपीठ नसून अडचणीतून जात असलेल्‍या पक्षाची स्थिती सुधारण्‍यासाठी आवश्‍यक ते सर्व करण्‍याचे संकेत पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी पहिल्‍याच दिवशी दिले आहेत. आपल्‍या भाषणातून गडकरींनी पक्षाच्‍या ज्येष्‍ठ आणि बड्या नेत्यांचे ज्या पध्‍दतीने कान उपटले ते पाहता गडकरी पक्षाची 'सर्जरी' करणार हे नक्की झाले आहे.

भाजपच्‍या निर्णय प्रक्रियेत संघाची भूमिका नेहमीच महत्‍वाची असते. ही भूमिका केवळ अध्यक्ष निवडीपुरती मर्यादीत राहत नसून पक्षाची स्थिती सुधारण्‍यासाठी काय केले पाहिजे ते करण्‍यापर्यंतही असते. त्‍यामुळे काही दिवसांपूर्वी 'पक्षाला सर्जरीची आवश्‍यकता आहे' असे म्हणणा-या सरसंघचालक मोहन भागवत यांच्‍या पठडीतून तयार झालेले नागपूरचे गडकरी सर्जरी करतील हे आता निश्चित. गडकरी यांना अध्यक्ष बनवणे हा देखिल संघाचाच निर्णय.

गडकरी संघाशी संबंधित असल्‍याने त्यांना पक्ष चालवताना कुठलीही अडचण येऊ नये याची खबरदारीही संघ घेणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाला दिलेला केमोथेरेपीचा सल्‍ला किती ठाम होता हे गडकरींच्‍या आजच्‍या भाषणातून स्‍पष्‍ट लक्षात येऊ शकतो.

गडकरी यांनी आज पक्षाच्‍या ज्‍येष्ठ आणि बड्या नेत्‍यांना स्पष्ट शब्‍दात संकेत दिले अहोत, की पक्षाच्‍या प्रगती आड आलात तर सोडणार नाही. या व्‍यतिरिक्त नाराज नेत्‍यांचीही त्यांनी कान उघाडणी केली. पक्षासाठी अडचणी निर्माण करणारे मोठे नेतेच असतात असे बोलून त्यांनी एकाच बाणात अनेकांना घायाळ केले आहे. यात अरूण जेटलींपासून ते वसुंधरा राजे पर्यंतच्‍या नेत्यांचा समावेश आहे. यामुळे सरसंघचालक भागवत यांनी दाखविलेल्‍या रस्‍त्यावरून जाणारे गडकरी काय करू शकतात हे त्यांच्‍या एका तासाच्‍या भाषणातूनच स्‍पष्‍ट झाले आहे. त्यामुळे गडकरी भाजपचा 'गड' राखतील असे सध्‍या तरी वाटते.

वेबदुनिया वर वाचा