महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत शिवसेनेने वाटाघाटीच्या चर्चाही सुरू केल्यात. या तिन्ही पक्षांच्या चर्चेची पहिली संयुक्त फेरीही पार पडली.
हे एकीकडे सुरू असताना, अजूनही भाजपला सत्तास्थापनेची आशा आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. याला कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्यं.
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर भाष्य करताना नितीन गडकरींनी म्हटलं, क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं. कधीकधी तुम्ही पराभूत होत आहात असं वाटायला लागतं, पण निर्णय त्याच्या अगदी उलट येतो.
#WATCH "Anything can happen in cricket and politics. Sometimes you feel you are losing the match, but the result is exactly the opposite. Also, I have just arrived from Delhi, I don't know the detailed politics of Maharashtra,"Union Min Nitin Gadkari on Maharashtra govt formation pic.twitter.com/JB6cfeMRok
भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपच्या सत्तेची आशा व्यक्त केली. भाजप वगळता कुणीही राज्यात सत्ता स्थापन करू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले. एबीपी माझानंही हे वृत्त प्रसिद्ध केलंय.
दुसरीकडे, शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापनेच्या चर्चांना सुरूवात केली असली, तरी महायुती तुटल्याची आणि एनडीएमधून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा केली नाहीय.
भाजपचा पर्याय पूर्णपणे संपला आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांना 12 नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेच करण्यात आला होता. तेव्हा त्याला उत्तर देताना, "तुम्हाला का एवढी घाई आहे, हे राजकारण आहे, राज्यपालांनी 6 महिने दिले आहेत ना," असं सूचक उत्तर त्यांनी दिले होतं.
त्यामुळे भाजपला शिवसेनेकडून अजूनही आशा आहेत का आणि एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा न करून शिवसेनेनंही दारं उघडी ठेवलीत का, असा सहाजिक प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आलीय. याच प्रश्नाचा धांडोळा बीबीसी मराठीनं घेतलाय.
भाजपन नेते भातखळकर म्हणतात, 'वेट अँड वॉच'
गडकरींच्या वक्तव्याबाबत भाजपचे सरचिटणीस अतुल भातखळकर म्हणाले, भारतीय जनता पक्षाला पूर्ण विश्वास आहे की, महाराष्ट्रात फक्त भाजपचंच सरकार बनेल.
"सगळ्यांच्या मनात हा विश्वास आहे. अपक्ष आमदारांचाही भाजपलाच पाठिंबा आहे. त्यामुळं सर्वाधिक मोठा पक्ष म्हणजे 120 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. पाच वर्षं आम्ही कार्यक्षम सरकार दिलं असून, जनादेश भाजपच्या बाजूनं आहे," असं अतुल भातखळकर म्हणाले.
भातखळकर पुढे म्हणाले, "आता संख्या नसल्यानं सत्तास्थापनेचा दावा केला नाही. मात्र, सर्वाधिक मोठा पक्ष भाजप असल्यानं, इतर तिन्ही पक्षांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचं सरकार येण्याची कुठलीही शक्यता नाही."
मात्र, सत्तास्थापनेसाठी आवश्यक 145 आमदारसंख्या भाजपकडे नसल्याची आठवण भातखळकरांना करून दिल्यानंतर ते म्हणाले, 'वेट अँड वॉच'
'..पण आमचं आता ठरलंय'
गडकरींच्या वक्तव्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "गडकरींना काय अभिप्रेत आहे, ते माहीत नाही. पण आमचं (शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी) आता ठरलंय. कॉमन मिनिमम प्रोग्रामचा मसुदा तिन्ही अध्यक्षांना पाठवलाय. ते मंजूर झाल्यानंतर खातेवाटपाची एक बैठक होईल. मग काय राहिलं? मग थेट जाऊन शपथच घ्यायचीय."
त्याचसोबत देसाई असंही म्हणाले की, "भाजपला प्रयत्न करायचेच होते, तर 15 दिवस होते. निम्मं-निम्मं मुख्यमंत्रिपद द्यायला तयार आहोत, एवढं जरी भाजपनं सांगितलं असतं, तर तातडीनं बैठक झाली असती आणि सरकार स्थापन झालं असतं. पण तसं काहीच झालं नाहीय."
तर गडकरी आणि फडणवीसांच्या आशावादावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र टोमणा मारलाय.
"देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री झालेत, हे जगाला माहीत आहे. भाजपच्या 105 मधील अनेकजण इतर पक्षातून फोडाफाडी करून आणलेले आहेत. सत्तेसाठी ते भाजपमध्ये गेलेले आहेत. हे नेते आस्वस्थ झाल्यानंतर त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी फडणवीसांकडे आहे. हारलेला जनरल सैनिकांना 'जिंकू जिंकू' सांगत राहतो. तसं फडणवीसांचं झालंय," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.
एनडीएतून बाहेर पडण्याची शिवसेनेकडून अधिकृत घोषणा का नाही?
नितीन गडकरी यांच्या वक्तव्यातून निघणाऱ्या संभाव्य अर्थाचं शिवसेनेनं जरी खंडण केलं असलं, तरी एक प्रश्नउरतोच, तो म्हणजे शिवसेनेनं अजूनही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून म्हणजे एनडीएतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली नाहीय.
त्याचवेळी एनडीएतील मोठा पक्ष असलेल्या भाजपनंही शिवसेनेला अधिकृतरित्या एनडीएतून बाहेर काढण्याची घोषणा केली नाहीय. त्यामुळं दोन्ही पक्षांनी एनडीएच्या माध्यमातून एक पर्याय जिवंत ठेवलाय का, याचीही चर्चा सुरु आहेच.
शिवसेनेला एनडीएत ठेवायचं की नाही, ती घोषणा भाजपनं करायचीय, असं शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले.
"केंद्रीय मंत्री अरविंद सावंतांचा राजीनामा आम्ही स्वत:हून दिलाय. आम्हाला तिथं अडकून राहायचं असतं, तर आम्ही स्वत:हून थांबलो असतो. त्यामुळं भाजपसोबत चर्चेचा आता आमच्याकडे पर्यायच नाहीय," असंही देसाईंनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.
मात्र, भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले, "शिवसेनाच म्हणते एनडीएतून बाहेर पडली. त्यामुळं शिवसेनेनं उत्तर द्यायचंय. भाजप चर्चेसाठी तयार होते."
महायुतीच्या जनादेशाप्रमाणे आम्ही सरकार स्थापन करण्यात यशस्वी होऊ, असा विश्वासही अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला. मात्र, आकड्यांच्या जुळवाजुळवीबाबत भातखळकरांनी न बोलणंच पसंत केलंय.