झाकीर नाईक: डोंगरी ते मलेशिया, डॉक्टर नाईक इस्लामचे प्रचारक कसे बनले?

मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (18:21 IST)
फिफा वर्ल्ड कपची महाजत्रा सुरू झालीय. जगातील सर्वांत मोठ्या इव्हेंटपैकी एक. फक्त खेळाडू, फुटबॉल चाहतेच नाही तर अनेक कॉर्पोरेट कंपन्या, मोठमोठे उद्योजक, राजकारणी देखील फिफा वर्ल्डकपची वाट बघत असतात. त्यामुळे अनेक उलाढाली घडणे साहजिकच आहे.
 
विशेषतः हा कतार मध्ये होणारा वर्ल्डकप तर राजकारणाचे केंद्र बनला आहे. यजमानपदासाठी झालेल्या लाचखोरीच्या वादापासून ते आत्ताच्या बीअरबंदीच्या राड्या पर्यंत कतार वर्ल्डकप वादाच्या टीआरपी मध्ये एक नंबरला आहे. 
 
अशातच एक नवीन वाद कतार मध्ये येतोय. या वादाचं नाव आहे डॉ. झाकीर नाईक.
 
 मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक यांना कतार सरकारने फिफा वर्ल्डकप दरम्यान इस्लामिक उपदेशाचा प्रसार करण्यासाठी आमंत्रित केल्याची चर्चा आहे. ते कतारला जाणार म्हटल्यावर सगळीकडेच खळबळ उडाली आहे.
 
कट्टर इस्लामवादी त्यांचं स्वागत करत आहेत तर इतर लोक खवळल्याचं ट्विटरवर दिसून येतंय. एवढंच नाही तर भारतातील सोशल मीडिया सुद्धा पेटून उठलाय. पण हे झाकीर नाईक आहेत तरी कोण? त्यांचं भारताशी कनेक्शन नेमकं काय आहे. 
 
कोण आहेत झाकीर नाईक ?
झाकीर नाईक यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले पण आता ते एक धर्मगुरू म्हणून ओळखले जातात. नाईक कुटुंबीय हे मुंबईतील डोंगरीचे आहे.
 
डोंगरी म्हणजे मुस्लिम बहुल भाग आहे. झाकीर नाईक सुद्धा इथेच एका मिडलक्लास घरात वाढले.
 
त्यांच्या घरात अनेक जण डॉक्टर होते. त्यांचे वडील देखील डॉक्टर होते. मूळचे कोकणातले अब्दुल नाईक हे उदारमतवादी होते. ते धार्मिक तर होतेच पण शिवाय मुस्लिम समाजात शैक्षणिक चळवळ रुजावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक होते. 
 
 झाकीर नाईक मुंबईच्या टोपीवाला कॉलेजमधून एमबीबीएस झाले. 
 
सुरुवातीच्या काळात वडिलांप्रमाणे डॉक्टरकीची प्रॅक्टिस देखील केली. असं म्हणतात की याचं काळात त्यांच्यावर दक्षिण अफ्रिकेतील गुजराती वंशाचे धर्म प्रचारक अहमद दीदात यांचा प्रभाव पडला.
 
त्यांच्याच प्रभावातून 1991 साली झाकीर नाईक यांनी देखील आपली मेडिकल प्रॅक्टिस सोडली आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली.  
 
दिव्य मराठीसाठी राजकीय विश्लेषक अविनाश कोल्हे यांनी झाकीर नाईक यांच्यावर एक लेख लिहिला होता. त्यात ते म्हणाले होते, "1990 च्या दशकात बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरिन यांची 'लज्जा' ही कादंबरी चर्चेत होती. या कादंबरीवर साधकबाधक चर्चा करण्यासाठी 1994 मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाने परिसंवाद आयोजित केला होता.
 
"त्यात डॉ. झाकीर नाईकने भाग घेतला होता. चर्चेचा विषय होता 'धार्मिक दहशतवाद आणि आविष्कार स्वातंत्र्य'. तेव्हापासून डॉ. झाकीर प्रकाशात आले. हळूहळू डॉ. झाकीर नाईक यांची प्रवचने लोकप्रिय होऊ लागली. "
 
"नाईक यांच्या सभांना हजारो लोक हजेरी लावायचे आणि त्यात गैर मुस्लीम सुद्धा होते. काही वर्षांनंतर त्यांची चर्चा दूरवर पसरली होती. त्यांचं महत्त्व वाढायला सुरुवात झाली होती.
 
"त्यांच्या प्रत्येक चाहत्याला त्यांना वेळ देणं कठीण झालं. झाकीर नाईक यांचे गुरु दीदात सांगतात की, इस्लामचा जितका प्रचार 40 वर्षांत त्यांनी केला नाही तितका प्रचार चार वर्षांत नाईकांनी केला," असं कोल्हे यांनी सांगितलं होतं.   डॉ. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनने पीस टीव्ही (Peace TV) नावाचं चॅनल सुरू केलं. आज 125 पेक्षा जास्त देशांमध्ये पीस टीव्हीचं प्रसारण होतं आणि ऑनलाईन स्ट्रीमिंगही होतं.
 
अनेक आंतरराष्ट्रीय विचारवंत या चॅनेलवरून आपली प्रवचने देतात. झाकीर नाईक याच चॅनेलच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले.
 
 2010 साली इंडियन एक्सप्रेस समूहाने तर त्यांचा समावेश जगातील 100 प्रभावशाली भारतीय व्यक्तींमध्ये केला होता.
 
झाकीर नाईकशी संबंधित वाद
कोल्हे पुढे सांगतात, "तसं बघितलं तर झाकीर नाईकची प्रवचने अगदी पुरोगामी वाटतील. मुस्लिम दहशतवादाचा तर ते धिक्कार करतात असंच एखाद्याला वाटू शकतं. पण जर काळजीपूर्वक या भाषणाचा अभ्यास केला तर ते प्रचंड कट्टरतावादी असल्याचं जाणवून येईल.
 
"समलिंगी व्यक्तीना फाशी दिली पाहिजे, बायकोला केलेली मारहाण योग्य असते अशा पद्धतीचे विचार ते आपल्या भाषणातून मांडताना दिसतो. या काही उदाहरणांवरून डॉ. झाकीर नाईकची मांडणी वादग्रस्त असल्याचं दिसून येते.
 
"झाकीर नाईक कितीही नाकारत असले तरी इस्लाममधील 'सलाफी' पंथाचा त्यांच्यावर प्रभाव असल्याचं जाणवतं. आपल्या प्रवचनातून त्यांनी काही वेळा ओसामा बिन लादेनचे देखील कौतुक केले होते. 
 
"अमेरिकेवर 9/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश यांचा हात होता असा देखील गंभीर आरोप त्यांनी केला होता," असं कोल्हे आपल्या लेखात लिहितात.
 
2016 साली बांगलादेशमध्ये काही अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार केलेला, त्या अतिरेक्यांनी हे कृत्य करण्यापूर्वी झाकीर नाईकच्या भाषणांचा आपल्यावर प्रभाव पडला असल्याचं मान्य केलं होतं. त्यांच्या वादग्रस्त प्रवचनामुळेच भारत, कॅनडा, बांगलादेश व इंग्लंड या देशांमध्ये त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. 
 
झाकीर नाईक यांच्यावर असलेले आरोप
मनी लाँडरिंग आणि द्वेष पसरवणारी भाषणं केल्याप्रकरणी 2016 पासून भारतीय यंत्रणा नाईक यांच्या मागावर आहेत. प्रत्यक्ष हजर नसून मनी लाँडरिंगमध्ये सहभागी झाल्याचा आरोप त्यांच्यावर झाले आहे. तेव्हापासूनच झाकीर नाईक भारतात परत आलेले नाहीत. मलेशियामध्ये त्यांनी आश्रय घेतलाय. 
 
झाकीर नाईक यांच्याविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने समाजात वैमनस्य पसरविल्याचा खटला दाखल केला आहे. मात्र त्यांनी स्वत:वर लाववेल्या सगळ्या आरोपांचा इन्कार केला आहे.
 
त्यांना परत पाठवण्यात यावं अशी मागणी भारताने केली आहे. पण आतापर्यंत मलेशियन सरकारने त्यांच्या पर्मनंट रेसिडंट (PR) स्टेटसची पाठराखण करत नाईक यांच्यावर भारतात योग्य रीतीने खटला चालवला जाणार नाही, असं म्हटलं होतं. 
 
मात्र मलेशियामध्ये राहूनही त्याच्या बद्दलचे वाद थांबलेले नाहीत.  
 
 2019 साली मलेशियन हिंदू हे मलेशियन पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांच्यापेक्षा भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जास्त ईमान राखतात असा दावा करून त्यांनी वाद ओढवून घेतला होता. तिथे देखील त्यांच्या भाषणावर बंदी घालण्यात आली होती. 
 
 मलेशियामध्ये देशव्यापी बंदी घालण्यात येण्याआधी नाईक यांच्यावर तिथल्या सात राज्यांमध्ये भाषण करण्यावर बंदी घालण्यात आली होती.
 
इतकं असूनही झाकीर नाईक सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहेत. फेसबुकवर त्यांचे 17 मिलियन ( 1 कोटी 70 लाख) फॅन्स आहेत. 
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती