सुप्रिया सुळेंचा विजय शरद पवारांची ताकद दाखवणारा की अजित पवारांना धडा शिकवणारा?

बुधवार, 5 जून 2024 (11:21 IST)
'बारामती कुणाची? शरद पवारांची की अजित पवारांची?'
 
हा प्रश्न बारामतीसह महाराष्ट्र आणि देशाला पडला होता. या प्रश्नाचं उत्तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानं 4 जूनला दिला. बारामतीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवार यांचा तब्बल 1 लाख 53 हजार मतांनी पराभव केला. नणंद भावजयीच्या निवडणुकीत सुळेंची नुसती सरशीच झाली नाही, तर खडकवासला विधानसभा मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघात त्यांना आघाडीही मिळाली आहे. पोस्टल मतदानाची पहिली फेरी वगळता पुढच्या जवळपास सर्वच फेऱ्यांमध्ये सुप्रिया सुळे आघाडी मिळवत गेल्या. महायुतीतल्या नेत्यांची नाराजी आणि दुसरीकडे भावनिक मुद्दयांवर गेलेली निवडणूक याच्या आधारे हा विजय मिळाल्याचे चित्र दिसते आहे. मात्र, हा विजय म्हणजे जनतेने सुळेंना दिलेला कौल की शरद पवारांना दिलेला पाठिंबा? असा प्रश्नही उपस्थित होतोय.
 
मतदारसंघनिहाय चित्र
सहा मोठ्या आणि महत्वाच्या मतदारसंघांचा समावेश असलेला बारामती मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. एकीकडे वेल्ह्यासारखा दुर्गम भाग, तर दुसरीकडे खडकवासला मतदारसंघासारख्या शहरी भागाचा या मतदारसंघात समावेश आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहिली तर भोर मध्ये 41625, बारामती मध्ये 48168, पुरंदरमध्ये 34387, इंदापूरमध्ये 25689 आणि दौंडमध्ये 24267 मतांची आघाडी सुप्रिया सुळेंना मिळाली आहे. खडकवासल्यात मात्र सुनेत्रा पवारांना 21696 मतांची आघाडी मिळाली आहे.
 
पुरंदर मधली विजय शिवतारेंची नाराजी, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी जाहीरपणे घेतलेली भूमिका आणि भोर-वेल्ह्यात संग्राम थोपटे आणि अनंतराव थोपटेंनी दिलेला पाठिंबा हे यातले महत्वाचे फॅक्टर ठरले. एकूण चित्र पाहता, सुप्रिया सुळे 1 लाख 58 हजार 333 मतांनी निवडून आल्या. गेल्या वेळच्या मताधिक्यापेक्षा हा आकडा तीन हजारांनी जास्त आहे. सुप्रिया सुळेंना 51.85 टक्के, तर सुनेत्रा पवारांना 40.64 टक्के मतं मिळाली आहेत.
 
2019 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंना 52.63 टक्के तर भाजपच्या कांचन कूल यांना 40.69 टक्के मतं पडली होती. सुनेत्रा पवारांना एकूण पडलेल्या मतांची संख्या जास्त असली तरी टक्केवारीनुसार मात्र त्यांना कांचन कूल यांच्या वाट्याला आली तेवढीही मतं पडलेली दिसत नाहीत.
 
काय घडलं?
भाजपचं मिशन बारामतीचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलेलं आहे. थेट पवार विरुद्ध पवार अशी लढत असलेल्या या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बारामतीवर आपलं वर्चस्व राखलं आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी भाजप सोबत जात उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. यानंतर राष्ट्रवादी कोणाची याची लढाई सुरु असतानाच पक्षाचं घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे गेलं. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर नवीन तुतारी हे चिन्ह घेऊन लढण्याची वेळ आली. अजित पवारांनी बहीण सुप्रिया सुळेंसमोर थेट आव्हान उभं करत पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. त्यानंतर नणंद-भावजयीच्या या लढतीमध्ये लेकीला सासरी पाठवा ते सून बाहेरून आलेली आहे अशा पद्धतीची वक्तव्य केली गेली. विकास कोणी केला, नेमका कोणता प्रकल्प कोणी आणला यावरुनही आरोप प्रत्यारोप झाले.
 
त्याबरोबरच अजित पवारांनी आपल्यावर शरद पवारांनी अन्याय केल्याचं नरेटिव्ह या निवडणुकीत कायम ठेवलं. सुप्रिया सुळेंच्या साथीला रोहित पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि आई सुनंदा पवार यांच्यासह अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांचे कुटुंबीयही उतरले.
 
दुसरीकडे कुटुंबातील काही सदस्यच त्यांच्या बरोबर आहेत असं म्हणत अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी मात्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सुनेत्रा पवारांना निवडून द्या या मुद्दयावर प्रचाराचा भर ठेवला. अर्थात, केलेला विकास आणि नव्याने काय करणार याची आश्वासनं बारामतीच्या उदाहरणासह या प्रचारात होतीच. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघात सातत्याने पराभव झालेल्या भाजपसाठी देखील यंदाची निवडणूक महत्वाची ठरली होती. ‘पवार विरुद्ध पवार’ निवडणुकीत अजित पवारांच्या माध्यमातून चित्र पालटू शकेल अशी आशा भाजप नेत्यांना होती.
 
नाराजी नाट्य आणि मनधरणी
प्रत्यक्षात मात्र उमेदवार जाहीर होत असतानाच अजित पवारांच्या आणि सुनेत्रा पवारांच्या वाट्याला नाराजी नाट्य आलं. पुरंदरमधून विजय शिवतारेंनी आपण निवडणूक लढवणार असल्याचं सांगत थेट आव्हान उभं केलं. इंदापूरमध्ये देखील हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत उघडपणे नाराजी व्यक्त करत आपल्याला धमकावलं जात असल्याचाही आरोप केला. या सगळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नेत्यांमध्ये समेट घडवून आणली. शिवतारेंनी जाहीरपणे माघार घेतली. पाटील यांनी माघार घेतल्याचे जाहीर केले तरी इंदापूर मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात पुन्हा एकदा नाराजीचा पाढा वाचला होता.
 
मतदानाचा दिवस आणि नाट्यमय घडामोडी
मतदानाच्या दिवशी देखील अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ऐन मतदानाच्या दिवशी आमदार दत्तात्रय भरणे यांचा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला दमदाटी करत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला. त्या कार्यकर्त्याची चूक असल्याचा दावा भरणेंनी केला आणि आपल्या भाषेबद्दल माफीही मागितली. मात्र, सुप्रिया सुळेंनी तातडीने त्या कार्यकर्त्याची भेट घेतली. दुसरीकडे निवडणुकीच्या दोन दिवस आधी अजित पवारांची आई त्यांच्या सोबत नसल्याचा दावा श्रीनिवास पवारांनी केली. अजित पवार मतदानाला आपल्या आईसोबत उपस्थित राहिले. मात्र, मतदानानंतर थोड्याच वेळात अजित पवारांच्या आईंना भेटण्यासाठी सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी पोहोचल्या. हे दोनही मुद्दे मतदानाच्या दिवशी चर्चेत राहीले.
 
कोणत्या मुद्द्यांचा फायदा?
शरद पवारांसाठी आपल्याला मतदान करायचे आहे हा मुद्दा या निवडणुकीत चर्चेत होता. त्याचा फायदा झालेला दिसतो आहे. त्याचबरोबर गेल्या पाच वर्षात सुप्रिया सुळेंनी सातत्याने केलेले दौरे, वाढवलेला जनसंपर्क याचाही फायदा त्यांना झाला. बेरजेची गणितं आखत विधानसभा मतदारसंघनिहाय नियोजनानेही गणिते बदलली. एकीकडे खासदारकीचा अनुभव असलेल्या सुप्रिया सुळे तर दुसरीकडे थेट राजकारणात पहिल्यांदा उतरलेल्या सुनेत्रा पवार असं चित्र यावेळी दिसलं. सुनेत्रा पवारांनी प्रचारासाठी कष्ट घेतले असले आणि बारामतीतल्या प्रचाराचा अनुभव गाठीशी असला तरी त्या थेटपणे लोकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी मुद्दे मांडू शकल्या नाहीत. त्यातच प्रचारादरम्यान अजित पवार लोकांना दमदाटी करत आहेत असे आरोप रोहित पवारांनी केले. अशा अनेक मुद्द्यांना तोंड देतच सुनेत्रा पवारांना ही निवडणूक लढवावी लागली. या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलताना पत्रकार प्रशांत अहेर यांनी म्हटलं, “यावेळी लोकांसमोर चॉइस होता थोरल्या पवारांसोबत जायचं की धाकट्या पवारांसोबत जायचं. लोकांनी असा विचार केला की या निवडणुकीत थोरल्या पवारांसोबत आणि विधानसभेला धाकट्या पवारांसोबत जाऊ.”
 
अहेर यांनी सांगितलं की, “निवडणुकीच्या आधी सुप्रिया सुळेंनी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये एक भजन स्पर्धा घेतली होती. त्यानंतर ‘रामकृष्णहरी वाजवा तुतारी’ असं प्रचाराचं घोषवाक्यच तयार झालं. ही स्पर्धा हा एक योगायोग होता असं वाटत नाही. तीच पुढे कायम लोकांच्या तोंडी असलेली दिसली. तुतारी भोवती प्रचार फिरला.” ते पुढे सांगतात, “लोकांना विचारलं की लोक जय रामकृष्ण हरी म्हणायचे. पुढे वाजवा तुतारी म्हणण्याची वेळही त्यांच्यावर येत नव्हती. अजित पवार हे स्पर्धेत असतील असं वाटत होतं. एक्झिट पोल मध्येही ते दिसत होतं. 8 ते 9 टक्क्यांची लीड एक्झिट पोलमध्ये सुनेत्रा पवारांना दाखवली होती. याचा अर्थ साधारण एक दीड लाख मतांचा फरक दिसू शकणार होता असा अंदाज होता. मात्र सुप्रिया सुळेंना मिळालेलं लीड हे सुनेत्रा पवारांच्या भविष्यासाठी काळजी करण्यासारखंच आहे.” निकाल जाहीर झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सुळेंनीही ‘रामकृष्ण हरी’ म्हणतच मतदारांचे आभार मानले. यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या, " ही लढाई एक वैचारिक लढाई होती हे मी संपुर्ण प्रचारादरम्यान सांगत होते. वैयक्तिक टीका मी भाजपवरही केलेली नाही. कारण माझी वैयक्तिक लढाई कोणाशीच नाही. महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही सर्वात मोठी आव्हाने असल्याचं दाखवून दिलं आहे. संविधान बदलण्याची भाषा भाजपच्या खासदारांनी केली आहे. घटनात्मक संस्थांचा गैरवापर केला. या सगळ्याला जनतेने उत्तर दिले आहे. माझी वैयक्तीक कोणाशीच लढाई नव्हती. माझी लढत एनडीएशी होती. कोणीतरी उमेदवार एनडीएचा असणारच होता.“ 2019 च्या निवडणुकीत मावळमधून पार्थ पवार, आणि आता बारामतीत सुनेत्रा पवारांच्या निमित्ताने अजित पवारांच्या वाट्याला होमग्राऊंडवरच पराभव आला आहे. या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवारांनी म्हटलं की, “लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जनतेने दिलेला कौल मी नम्रपणे स्विकारतो हाती आलेले निकाल हे अनपेक्षित असले तरी या निकालातून आम्ही आत्मपरिक्षण करु. नव्याने पुनर्बांधणी करु.”

बारामतीमध्ये कोणते मुद्दे महत्वाचे ठरले याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता म्हणाले, “ही लढत जरी सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया अशी असली तरी ही अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच होती. शरद पवारांनी ही लढत जिंकत ‘मीच बॅास आहे’ हे दाखवून दिले आहे. अजित पवारांना असे वाटले की, केलेली विकासकामं आणि मोदींची प्रतिमा यावर निवडणूक जिंकू शकू.” ते पुढे सांगतात, “पवारांना सहानुभुती होतीच. पण शरद पवारांनी अजित पवारांना या निवडणुकीत एक्सपोज केलं. त्यांची वागणूक कशी चूक आहे हे दाखवून देताना आपल्याला काही मिळाले नाही हा अजित पवारांनी केलेला दावा खोडून काढला. त्याबरोबरच सुप्रिया सुळेंनी जोडलेले लोक, जनसंपर्क याचा फायदा झालाच. पवार डावपेचात सरस ठरले. त्याबरोबरच सुप्रिया सुळेंची अभ्यासू उमेदवार ही ओळख फायद्याची ठरली. त्यातच तावरे, थोपटे यांना भेटणे उपयोगाचे ठरले. तसेच अजित पवारांनी स्वत: बोलून दाखवलेली भीती, की लोक घड्याळाला नव्हे तर कमळाला मत देतात हेही खरं ठरलं आहे. अनेकांना पडलेली ही फूट आणि अजित पवारांना भाजपने सोबत घेणे पटले नाही. अनेकांना सुळेंसारखा अभ्यासू उमेदवार असायला हवं असं वाटत होतं. याचा फायदा सुप्रिया सुळेंना झाला.”
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती