शरद पवार सगळ्यात भ्रष्ट राजकारणी असं विकिपीडियावर का दिसतं? - फॅक्ट चेक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबद्दलचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. विकिपीडियावर देशातील सगळ्यात भ्रष्ट नेता असं टाइप केलं तर शरद पवारांचं नाव येतं असं या स्क्रीनशॉटमध्ये दिसतं. काय आहे नेमकं तथ्य?
उजव्या विचारसरणीच्या फेसबुक तसंच व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये हा स्क्रीनशॉट शेकडोवेळा शेअर केला जात आहे. स्क्रीनशॉटमध्ये शरद पवारांची माहिती देणारं विकिपीडिया पेज दिसतं. त्यात असं लिहिलंय- शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणातील सगळ्यात भ्रष्ट राजकारणी आहेत. 1999मध्ये काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती.
चर्चित माणसं, संस्था, संघटना, ठिकाणं, देश यांच्याबद्दलची माहिती देणारा विकिपीडिया हे डिजिटल व्यासपीठ आहे. मात्र विकिपीडियावर फेसबुक तसंच ट्वीटरप्रमाणे अकाऊंट तयार करता येतं. ज्यांचं विकिपीडियावर अकाऊंट आहे ती माणसं विकिपीडियावर उपलब्ध माहितीत बदल करू शकतात.
इंटरनेट अर्काइव्हची पाहणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की, 26 मार्चला शरद पवारांच्या विकिपीडिया पेजवर ते सगळ्यात भ्रष्ट राजकारणी असल्याचं लिहिलं आहे. मात्र आता या पेजमध्ये बदल करण्यात आले आहेत.
हे कधी झालं? शरद पवारांची माहिती देणाऱ्या विकिपीडिया पेजमध्ये कितीवेळा बदल करण्यात आले आहेत? याविषयी आम्ही शहानिशा केली.
नक्की काय आणि केव्हा घडलं?
26 मार्चला तडके OSZP नावाच्या विकिपीडिया युझरने शरद पवार यांच्याविषयीच्या माहितीतील सुरुवातीच्या परिच्छेदात सगळ्यात लोकप्रिय नेते अशी भर घातली. मात्र larry hocket नावाच्या अन्य युझरने काही तासांतच या पेजवरून सगळ्यात लोकप्रिय नेते हे वाक्य काढून टाकलं.
यानंतर साडेआठ वाजता vivek 140798 नावाच्या युझरने शरद पवार हे सगळ्यात गुणवान कौशल्यवान नेत्यांपैकी एक आहेत असं लिहिण्यात आलं. मात्र हे विशेषणही काही तासांतच हटवण्यात आलं. थोड्या वेळानंतर याच युझरने शरद पवारांची माहिती देण्यावर या पेजवर त्यांच्याशी निगडीत वादविवादांचे संदर्भ काढून टाकले. मात्र तूर्तास हे संदर्भ या पेजवर वाचता येतात.
विकिपीडिया एडिट अर्काइव्ह वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की 26 मार्चला दोनदा माहितीत बदल करण्यात आले. यानुसार विकिपीडियावर शरद पवार सर्वोत्तम नेते अशी प्रतिमा तयार करण्यात आली. मात्र 10 वाजता एका युझरने त्यांच्या पक्षाचं नाव नॅशनललिस्ट काँग्रेस पार्टी बदलून नॅशनल करप्ट पार्टी असं केलं.
यानंतर एका तासात शरद पवारांबाबत निगडीत माहितीत सगळ्यात भ्रष्ट नेते असा उल्लेख करण्यात आला. OSZP नावाच्या युझरने ज्या ठिकाणी शरद पवार सगळ्यात लोकप्रिय नेते असं लिहिलं होतं त्याचठिकाणी सगळयात भ्रष्ट राजकारणी असा उल्लेख करण्यात आला.
हे कसं झालं?
इंटरनेट वापरणाऱ्या नेटिझन्ससाठी विकिपीडिया हा सहज, पटकन उपलब्ध होणारा माहितीचा स्रोत आहे. गुगलवर व्यक्ती, संस्था, ठिकाणं यांच्याविषयी सर्च केल्यानंतर सर्वाधिक परिणाम म्हणजेच पेजेस विकिपीडियाचेच असतात.
विकिपीडियावर सर्वसामान्य माणसांद्वारे केल्या जाणाऱ्या बदलांमुळे चुकीची माहिती लोकांपर्यंत जाण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, विकिपीडियावरच्या शरद पवारांची माहिती देणाऱ्या पेजवर तूर्तास बदल करण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. आता त्या पेजवर विकिपीडियाचे विश्वासार्ह युझर्सच बदल करू शकतात.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, ''यासंदर्भात आपली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करावा. शरद पवारांची बदनामी करण्याचा कोणी प्रयत्न केला हे शोधून काढणं आवश्यक आहे." काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.