कपिल पाटील कोण आहेत? त्यांचा सरपंच ते केंद्रीय मंत्री प्रवास कसा झाला?

बुधवार, 7 जुलै 2021 (21:29 IST)
भिवंडी मतदारसंघाचे खासदार असलेल्या कपिल पाटील यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यातून कोणाला स्थान मिळते यासंदर्भात नारायण राणे, हिना गावित यांची नावं चर्चेत होती. यादरम्यान कपिल पाटील यांनी प्रसिद्धीझोतात न येता बाजी मारली आहे.
 
2014 मध्ये पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणूक आणि पक्षविस्तार हे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन भाजपने ही खेळी केली आहे.
 
लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या अशा ठाणे जिल्ह्यातील हा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र स्वरुपाचा आहे.
 
ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचं वर्चस्व कमी करणं तसंच आगरी समाजाला प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीनेही कपिल पाटील यांचं नाव महत्त्वाचं आहे.
 
कपिल यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर गावाचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलं.
 
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं.
 
ठाणे जिल्हा हा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीत शिंदे यांचा सामना करण्यासाठी भाजपने पाटील यांच्या नावावर मंत्रिपदाची मोहोर उमटवत बळ दिलं आहे.
 
नवी मुंबई विमानतळाला शेकापचे दिवंगत नेते दि.बा.पाटील यांचं नाव देण्यावरून राज्यातील आगरी समाज आक्रमक झाला आहे. केंद्रीय मंत्री म्हणून पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत राज्यातील आगरी मतांचं ध्रुवीकरण करण्याचाही प्रयत्न असल्याचं दिसत आहे. काही वर्षांपूर्वी कपिल पाटील यांनी संसदेत नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव द्यावी अशी मागणी केली होती.
 
ठाणे जिल्ह्यात रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांच्या रुपात भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र काही वर्षात शिवसेनेने भाजपवर वरचष्मा मिळवला. आनंद दिघे यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे यांनी पकड मिळवली. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांना तर ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पाटील यांना प्राधान्य देण्यात आलं आहे.
 
2019 मध्ये कपिल पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना नमवलं होतं. कुणबीसेना आणि श्रमजीवी आदिवासी संघटनेचा असलेला पाठिंबा पाटील यांच्यासाठी निर्णायक ठरला होता. भिवंडी मतदारसंघात भिवंडी, शहापूर, मुरबाड, बदलापूर, कल्याण (पश्चिम) या भागाचा समावेश होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती