कोण आहे हमझा बिन लादेन? ज्याच्या मृत्यूचा अमेरिका दावा करत आहे

गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (13:49 IST)
अल कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेनचा मुलगा हमझा मरण पावल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
त्याच्या मृत्यूचे ठिकाण आणि तारिख याबाबत अधिक तपशिल निनावी सूत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये नमूद करण्यात आलेला नाही.
 
फेब्रुवारी महिन्यामध्ये अमेरिकेनं हमझाची माहिती कळवणाऱ्यास 10 लाख डॉलर्स बक्षिस देण्याचे घोषित केलं होतं.
 
हमझा बिन लादेनचं वय अंदाजे 30 असावं. त्यानं अमेरिका आणि इतर देशांवर हल्ला करण्याचं आवाहन करणारे व्हीडिओ आणि ऑडिओ मेसेज त्यांन प्रसिद्ध केले होते.
 
हमझाच्या मृत्यूबाबत NBC आणि न्यूयॉर्क टाइम्सनं बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.
 
या बातम्यांबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप आणि व्हाईट हाऊस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी बुधवारी काहीही बोलण्यास नकार दिला.
 
हमझा बिन लादेननं आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यावा असं आवाहन जिहादींना केलं होतं. ओसामा बिन लादेनला अमेरिकेनं 2011 साली पाकिस्तानात जाऊन ठार केलं होतं.
 
अरेबियन द्वीपकल्पातील लोकांनी उठाव करावा असंही आवाहन त्यानं केलं होतं. सौदी अरेबियानं त्याचं नागरिकत्व मार्च महिन्यामध्ये काढून घेतलं होतं.
 
हमझा इराणमध्ये नजरकैदेत असावा असं मानलं जातं. पण तो अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा सीरियामध्ये असावा असंही सांगितलं जातं.
 
पाकिस्तानातल्या अबोटाबादमध्ये ओसामाला मारल्यानंतर सापडलेल्या कागदपत्रांमध्ये अल-कायदाचं नेतृत्व हमझाकडे देण्यासाठी त्याला तयार करण्यात येत असल्याचं नमूद केलं होतं, असं अमेरिकेच्या गृह खात्यानं स्पष्ट केलं होतं.
 
हमझा आणि अल-कायदाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलीचा व्हीडिओसुद्धा अमेरिकन फौजांना सापडल्याचं सांगण्यात येतं. त्याचे सासरे अब्दुल्ल अहमद अब्दुल्ला म्हणजेच अबू मुहम्मद अल-मसरीवर 1998 साली टांझानिया आणि केनया इथल्या अमेरिकन दुतावासावर झालेल्या बाँबहल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप केला जातो.
 
2001 साली अल-कायदानं अमेरिकेमध्ये विमानहल्ले केले होते. गेल्या दशकभरात इस्लामिक स्टेटमुळे अल-कायदाचं नाव मागे पडलं आहे.
 
अमेरिकेचा द्वेष करायला शिकवण्यात आलेला मुलगा
बीबीसी न्यूजचे ख्रिस बकलर यांनी केलेले विश्लेषण
 
हमझाचं नक्की वयही अमेरिकेला माहिती नाही यावरूनच त्याच्याबद्दल फार माहिती उपलब्ध नसल्याचं दिसतं.
 
तो अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा इराणमध्ये असावा अशी माहिती नुकतीच मिळाली होती. मात्र तरिही अमेरिकन अधिकाऱ्यांना हा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार नक्की कोणत्या देशात लपला असावा हे सांगता येत नाही.
 
त्याच्या माहितीसाठी लावण्यात आलेलं लाखो डॉलर्सचं बक्षिस केवळ तो किती घातक आहे हे सांगण्यासाठी नसून ते अल कायदा आणि त्याच्या प्रचार मोहिमेचं प्रतिकात्मक महत्त्व सांगून जातं.
 
2001 साली अमेरिकेवर हल्ला झाला होता तेव्हा हमझाचं वय अत्यंत कमी होतं. अमेरिकेचा द्वेष करतच तो मोठा झाला.
 
जर खरंच तो मेला असेल अल-कायदाचा एक महत्त्वाचा आवाज गेला असं म्हणता येईल. मात्र तरिही अल-कायदा संघटनेकडून असलेला धोका कमी झाला असं म्हणता येणार नाही.
 
अल-कायदाबद्दल
अल-कायदा संघटना 1980च्या दशकामध्ये अफगाणिस्तानात उदयाला आली. सोव्हिएट फौजांना देशाबाहेर काढण्यासाठी अफगाण मुजाहिदीनांना अरबांची साथ मिळाल्यानंतर ही संघटना स्थापन झाली. त्यांना मदत करण्यासाठी ओसामानं ही संघटना स्थापन केली. 1989मध्ये त्यानं अफगाणिस्तान सोडलं आणि हजारो परदेशी मुस्लिमांना लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी तो 1996 साली परतला. अमेरिका, ज्यू धर्मिय आणि त्यांचे सहकारी यांच्याविरोधात 'पवित्र युद्ध' करण्याची घोषणा अल-कायदा केली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती