शाळा कधीपासून सुरू होणार? ब्रिज कोर्स म्हणजे काय?

सोमवार, 14 जून 2021 (11:50 IST)
कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी राज्यातील शाळा उद्यापासून ऑनलाईन माध्यमातूनच सुरू होणार आहेत. राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
 
प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याबाबत मात्र अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आजही अनेक जिल्ह्यांत कडक लॉकडॉऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे.
 
शाळा प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे अशी माहिती शालेय शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
 
शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाची भूमिका काय?
शाळा प्रत्यक्षात सुरू करण्यासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही. तसंच शाळा तूर्तास ऑनलाईन माध्यमातूनच सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभाग देणार आहे.
 
शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितलं, "15 जूनपासून ऑनलाईऩ आणि इतर शक्य माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचण्याच्या सूचना आम्ही देणार आहोत. येत्या दोन दिवसांत यासंदर्भात पत्रक जारी करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये याचीही खबरदारी घेण्यास सांगण्यात येईल."
 
प्रत्यक्षात शाळा कधी सुरू होणार किंवा याबाबत शिक्षण विभागाची पूर्व तयारी सुरू आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले,
 
"राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोनाची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे राज्य सरकारने टप्प्यांनुसार लॉकडॉऊनचे निर्बंध लागू केले आहेत. तेव्हा शाळा सुरू करत असताना सरसकट सगळीकडे एकाचवेळी शाळा सुरू करता येणार नाहीत."
 
"आपल्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात,"असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
शिक्षक संभ्रमात
शैक्षणिक वर्ष सुरू करा म्हणजे शाळा सुरळीत सुरू झाल्या असं होत नाही, अशी प्रतिक्रिया शिक्षक देत आहेत.
 
शाळा नेमक्या कोणत्या पद्धतीने सुरू करायच्या? शाळा ऑनलाईन असणार की ऑफलाईन? कोणत्या इयत्तेला किती तास शिकवायचे? अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे का? असे अनेक प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर आहेत.
 
शाळेचा अभ्यासक्रम अवघ्या काही दिवसांत सुरू होणार असला तरी शिक्षण विभागाकडून मात्र कोणत्याही स्पष्ट सूचना आणि सविस्तर नियोजन शिक्षकांपर्यंत पोहोचलं नसल्याचं चित्र आहे.
 
महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटनेचे सचिव संजय डावरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "पंधरा तारखेपासून ऑनलाईऩ शाळा सुरू करा फक्त एवढंच सांगितलं आहे. पण शिक्षण कसं सुरू करायचं, त्यासाठीची यंत्रणा, अभ्यासक्रम, ऑनलाईन शैक्षणिक साहित्य अशा अनेक गोष्टी कशा साध्य करणार? याबाबत शिक्षण विभागाने काहीच सांगितलं नाही."
 
मुंबईत शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षकांना संदेश पाठवण्यात आले आहेत. पुढील दोन महिन्यात कशापद्धतीने शिक्षण पद्धती असणार आहे याची माहिती शिक्षकांकडून मागवली जात आहे.
 
संजय डावरे सांगतात, "दहावीच्या निकालासाठी मुख्याध्यापक शिक्षकांना शाळेत बोलवत आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा सुद्धा काही शाळांना घ्यायची आहे. तसंच शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने शिक्षकांना शाळेत बोलवणार आहोत. पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अनेक ठिकाणी बंद आहेत. मुंबई, ठाण्यात रेल्वेत शिक्षकांना प्रवेश नाही. त्यामुळे याची व्यवस्था सरकारने करायला हवी."अशी मागणी सुद्धा शिक्षकांकडून केली जात आहे.
 
काही शाळा गेल्यावर्षी देण्यात आलेल्या नियामावलीनुसार शाळा सुरू करणार आहेत. मुंबईतील एका शाळेचे शिक्षक विलास परब सांगतात, "पाचवी ते आठवसाठी दोन विषयांचे वर्ग असतील तर नववी आणि दहावीसाठी पूर्ण वेळ शाळा असू शकते. त्याप्रमाणे नियोजन सुरू आहे."
 
वर्षाच्या सुरुवातीलाच शिकावा लागणार ब्रिज कोर्स
15 जूनपासून राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या किंवा नाही झाल्या तरी या ब्रिज कोर्सपासूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात व्हावी यादृष्टीने शिक्षण विभागाचे नियोजन आहे.
 
SCERT चे संचालक दिनकर टेमकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी समजा पाचवीत आहे. तेव्हा हा ब्रिज कोर्स चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. शाळा बंद असल्याने तसंच ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत पण ज्याच्याशिवाय पुढील अभ्यासक्रम शिकता येणार नाही असे महत्त्वाचे विषय आम्ही ब्रिज कोर्समध्ये घेत आहोत."
 
असा असेल ब्रिज कोर्स
• प्रत्येक विषयाचा ब्रिज कोर्स वेगळा असणार आहे. म्हणजेच प्रत्येक विषयासाठी ब्रिज कोर्स उपलब्ध असेल. गणित आणि विज्ञान या दोन विषयांवर अधिक भर दिला जाणार असल्याचं दिनकर टेमकर यांनी सांगितलं.
 
• हा ब्रिज कोर्स 45 दिवसांचा असणार आहे.
 
• यंदा विद्यार्थी इयत्ता तिसरीत असल्यास ब्रिज कोर्स हा दुसरीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.
 
• पुढील वर्गात प्रवेश करत असताना विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करेल.
 
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) मराठी भाषा विभागाच्या प्रमुख आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मुलांचा लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी हा ब्रिज कोर्स तयार केला जात आहे. शाळा बंद असल्याने दुसरीत गेलेला विद्यार्थी प्रत्यक्षात पहिलीत शाळेत न जाता दुसरीत गेला आहे. तेव्हा प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे असं आम्ही गृहीत धरत आहोत आणि त्यादृष्टीने ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित करत आहोत."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती