मोटर न्यूरॉन : जास्त व्यायाम केल्याने वाढू शकतो या आजाराचा धोका

रविवार, 13 जून 2021 (12:33 IST)
जेम्स गॅलाघर
वैज्ञानिकांच्या मते जनुकीय किंवा अनुवांशिकदृष्ट्या धोका असणाऱ्या गटातील व्यक्तींनी नियमित आणि अत्यंत कठोर व्यायाम केल्यास त्यांच्यामध्ये 'मोटर न्यूरॉन' आजाराचा (motor neurone disease) धोका वाढण्याची शक्यता असते.
 
शेफिल्ड विद्यापीठाच्या टीमनं केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. पण तसं असलं तरीही यामुळं लगेचच कोणी व्यायाम करणं थांबवता कामा नये, असंही टीमनं म्हटलंय. मात्र त्यांच्या अभ्यासातील निष्कर्षांमुळे ज्यांना या आजाराचा धोका अधिक आहे, त्यांचा शोध घेऊन त्यांना वेळीच योग्य सल्ला दिला जाऊ शकतो.
 
साधारपणपणे 300 पैकी एका जणाला मोटर न्यूरॉन आजार (MND)बळावण्याची शक्यता असते. मेंदूपासून स्नायूला संदेश पोहोचवणाऱ्या मोटर न्यूरॉन पेशी मृत पावल्यानं किंवा त्यांची कार्यक्षमता संपल्यानं व्यक्तीला चालताना, बोलताना आणि अगदी श्वास घेतानाही अडचणी निर्माण होऊ लागतात. त्यामुळं व्यक्तीचं आयुष्यही अत्यंत वेगानं कमी होतं.
पण हा आजार नेमका कोणाला होतो? आणि तो एवढा गुंतागुंतीचा का आहे? ढोबळ मानाने विचार करता जन्माच्या वेळी असलेला अनुवांशिक धोका आणि त्यानंतर आयुष्यभरात त्यावर परिणाम करत जाणारे पर्यावरणीय घटक या दोन्हींचा तो संमिश्र परिणाम असतो.
 
या आजाराचा आणि व्यायामाचा जुना संबंध आहे. पण यामागे तेच कारण आहे की, केवळ योगायोगामुळं व्यायाम या आजाराला कारणीभूत ठरतो हा वादाचा विषय आहे.
 
इटलीच्या फुटबॉलपटूंवर केलेल्या अभ्यासातून त्यांना सर्वसामान्यांच्या तुलनेत याचा धोका सहापट अधिक असतो असं समोर आलं. रॉब बुरो (रग्बीपटू), स्टिफन डर्बी (फुटबॉलपटू) आणि डोडी वेयर (रग्बीपटू) या सर्व क्रीडापटुंनी या आजाराबाबत स्पष्टपणे मतं मांडली आहेत.
याविषयी अभ्यास करणारे संशोधक डॉ.जोनाथन कॉपर-नॉक म्हणाले की, "मोटर न्यूरॉन या आजारासाठी व्यायाम हा धोकादायक ठरू शकतो हे आम्ही पुराव्यांसह सांगू शकतो. अनेक प्रसिद्ध क्रीडापटुंना झालेली या रोगाची लागण हा निव्वळ योगायोग असू शकत नाही."
 
अभ्यासकांनी यूके बायोबँक प्रोजेक्टमधील माहितीचा अभ्यासही केला. यात जवळपास 50 लाख लोकांच्या अनुवांशिक नुमन्यांची तपशीलवार माहिती आहे.
 
या माहितीचं प्रयोगात रुपांतर करण्यासाठी संशोधकांनी मेंडेलियन रँडमायझेशन नावाचं तंत्र वापरलं. यातून ज्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये अधिक तीव्र किंवा कठोर हालचालींचा समावेश होता, त्यांना या आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याचं समोर आलं.
 
ईबायोमेडिसीन या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात पुढील काही बाबीही समोर आल्या :
 
- मोटर न्यूरॉन आजाराचा धोका वाढवणारी अनेक जनुकं (genes)ही व्यायामानंतर त्यांचं वर्तन बदलत असतात
 
- मोटर न्यूरॉनशी संबंधित जनुकीय बदल असलेली व्यक्ती जर कठोर व्यायाम करत असेल, तर तिला कमी वयामध्ये हा आजार होऊ शकतो
 
कठोर आणि नियमित व्यायाम म्हणजे 15-30 मिनिटे आणि आठवड्यातून 2-3 दिवसांपेक्षा अधिक असं म्हटलं गेलं आहे. पण साधारणपणे जे लोक एवढा किंवा यापेक्षा अधिक व्यायामही करतात त्यापैकी बहुतांश लोकांना 'मोटर न्यूरॉन' हा आजार होत नाही, हेही स्पष्ट आहे.
 
डॉ. कूपर-नॉक याबाबत म्हणतात, "कुणाला धोका आहे हे आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळं कोणी व्यायाम करावा आणि कोणी करू नये, हा सल्लाही आपण देऊ शकणार नाही. जर सर्वांनीच व्यायाम करणं बंद केलं तर फायदा होण्यापेक्षा त्याचा तोटाच अधिक होईल.
पण ज्या पद्धतीनं हृदयविकारासंदर्भात फुबॉलपटूंची तपासणी करून त्यांना सल्ला दिला जातो, त्या पद्धतीचा काही तरी मार्ग अवलंबता येईल, अशी आशा आहे.
 
शेफिल्ड न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डेम पामेला शॉ यांच्या मते, "हे संशोधन तीव्र आणि कठोर शारीरिक हालचाली किंवा व्यायाम करणारे लोक आणि विशिष्ट धोका असलेल्या जनुकीय गटातील लोकांना होणारी मोटर न्यूरॉन आजाराची लागण, यातील संबंध शोधण्याच्या दिशेन दुवा ठरण्याची शक्यता आहे."
 
असं म्हटलं जातं की, कठोर व्यायाम करताना शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी खालावलेली असते. दुसरीकडं मोटर न्यूरॉन पेशींना शरिरात सर्वाधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळं ऑक्सिजनची पातळी खालावल्यानं मोटर न्यूरॉन पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ही प्रक्रिया होते.
 
या प्रक्रियेमुळं जनुकीय किंवा अनुवांशिक धोका असलेल्या गटातील व्यक्तींच्या शरिरातील मोटर न्यूरॉन पेशींना इजा होते. त्यामुळं या मोटर न्यूरॉन पेशी मृत आणि अकार्यक्षम होतात.
 
मोटर न्यूरॉन आजार संघटनेचे डॉ. ब्रायन डिकी यांच्या मते, या दिशेनं आणखी संशोधन होणं गरजेचं आहे. मोटर न्यूरॉन आजाराबाबत जनुकीय आणि पर्यायावरणीय घटकांचा अभ्यास अनेक ठिकाणी पण वेग वेगळा केला जात आहे. मात्र हे कोडं सोडवायचं असेल, तर या सर्वांचा एकत्रित अभ्यास होणं गरजेचं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती