आईवडिलांनी दुसरं लग्न केलं तर मुलांना काय वाटतं?

शनिवार, 24 ऑगस्ट 2019 (12:19 IST)
भूमिका राय
 
आई-वडील शेअर करणं इतकं सोपं असतं का?
 
"लहानपणापासून ज्या खोलीबदद्ल सांगितलं असतं की ही आई बाबांची खोली आहे त्या खोलीत जाणारी व्यक्ती बदलली की वाईट तर वाटतंच. पण हळूहळू तेही पाहण्याची सवय होते. मग काही वेगळं वाटत नाही."
 
आकांक्षाने त्या दुसऱ्या स्त्रीला आईच्या रूपात स्वीकारलं आहे आणि ती आनंदात आहे. मात्र या नात्याचा स्वीकार करणं तिच्यासाठी कठीण होतं.
 
या बाबतीत सगळ्यांचा अनुभव एकसारखा नसतो. कॉफी विथ करण मध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान हिने सांगितलेल्या तिच्या आठवणी आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आकांक्षापेक्षा वेगळ्या आहेत.
 
सैफ यांना 'अब्बा' म्हणणारी सारा करीनाला 'छोटी मां' म्हणू शकत नाही. तिच्या मते ज्या दिवशी ती असं म्हणेल त्या दिवशी तिला निराशेचा झटका येईल.
 
तिचं स्वप्न आहे की करीनाबरोबर शॉपिंगला जावं. मात्र सावत्र नात्यांमध्ये अशी मैत्री होऊ शकते का? यावर सारा म्हणते, "अब्बा आणि करीना यांचं लग्न होतं. मला आईने तयार करून दिलं आणि मग आम्ही दोघी लग्नाला गेलो."
सारा म्हणते जे झालं ते चांगलं झालं. मग ते आईवडिलांचं वेगळं होणं असू देत किंवा पुन्हा लग्न करणं असू देत.
 
"कमीत कमी आज सगळे आपापल्या ठिकाणी खूश आहेत," अस ती या कार्यक्रमात म्हणाली.
 
झोया-फरहान आणि शबाना आझमी यांचं नातंही काहीसं असंच आहे. शबाना आझमी जावेद अख्तर यांची दुसरी पत्नी आहे. फरहान आणि झोया त्यांची पहिली पत्नी हनी इरानी यांची मुलं आहेत.
 
फरहान यांनी या कार्यक्रमात सांगितलं आहे की त्यांना आपल्या वडिलांबाबत काही तक्रारी होत्या. मात्र त्यानंतर शबाना यांच्याशी त्याचं नातं सुधारत गेलं. मात्र याचं श्रेय ते शबाना यांना देतात. कारण त्यांनी या दोघांनाही कधीच परक्यासारखी वागणूक दिली नाही.
नातेसंबंधांच्या तज्ज्ञ निशा खन्ना म्हणतात की, "अशा नात्यांचा स्वीकार करणं इतकं सोपं नसतं. कारण ही नाती जुन्या नातेसंबंधांची जागा घेतात. कोणत्यही व्यक्तीसाठी जुनी नाती आणि नात्यांशी निगडीत आठवणी विसरणं इतकं सोपं नसतं."
 
दिल्लीत शिकणाऱ्या अनुराग यांनाही असाच काहीसा अनुभव आला आहे. त्यांच्या मते कोणतंही नवीन नातं स्वीकारणं इतकं सोपं नसतं कारण अशी नवी नाती जुन्या नात्यांची जागा घेत आहेत.
 
अनुराग जेव्हा सातवीत होते तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला. तीन बहिणींमध्ये सगळ्यात मोठे असलेले अनुराग सांगतात की आई गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनी दोन महिन्यांनी लग्न केलं.
 
आपल्या नवीन आईच्या पहिल्या भेटीची आठवण अनुराग सांगतात, "बाबा जेव्हा त्यांच्याबरोबर पहिल्यांदा घरी आले तेव्हा मी माझ्या भावा बहिणींबरोबर टीव्ही पाहत होतो. ते म्हणाले की ही तुझी आई आहे. आम्ही काही म्हटलं नाही. त्यांच्याशी काही न बोलता ही बाई दुष्ट आहे असं माझ्या मनानं ठरवलं. त्यांच्यामुळेच माझी आई गेली असेल, असंही मला वाटून गेलं."
 
आता त्या दोघांमध्ये नात इतर कुटुंबीयांसारखंच आहे. मात्र एका मोठा काळ अनुराग यांच्या मनावर द्वेष, राग यांचा पगडा होता.
 
दिल्लीत राहणाऱ्या आकांक्षाचे आईवडील परस्पर सहमतीने वेगळे झाले होते.
 
ती सांगते, "मला समजावलं होतं की आमच्यात कोणत्याच प्रकारचं भांडण नाही मात्र आम्ही एकत्र राहू शकत नाही. मी बाबांबरोबर राहिले, मात्र सात महिन्यानंतर बाबांनी एका बाईशी माझी भेट घालून दिली. नंतर बाबांनी लग्न केलं. ती चांगली होती. मात्र मला असं वाटायचं की ती मला आणि बाबांना दूर करतेय ती दोघं बोलायची तेव्हा मला वाईट वाटायचं. मला असं वाटायचं की माझं सगळं निसटून जात आहे."
 
आकांक्षा सांगते की ही गोष्ट तिने तिच्या आईशी शेअर केली तेव्हा तिने आकांक्षाला समजावलं. मात्र सगळ्या प्रकारामुळे तिच्या आयुष्यातला मोठा काळ एकटेपणात गेला.
 
आकांक्षाच्या मते एखादी व्यक्ती आपलं नातं किती लवकर आणि कशा पद्धतीने स्वीकार करतं हे बऱ्याच अंशी समाजावर अवलंबून आहे.
 
"आपल्या समाजात काही गोष्टींबाबत एक ठराविक व्यवस्था तयार झाली आहे. माझ्या मनात हे बसलं होतं की सावत्र आई किंवा सावत्र वडील आहेत म्हणजे ते वाईटच असणार. बाबांचं लग्न झाल्यावर बराच काळ तिच्या मित्रमैत्रिणीच्या घरचे नवीन आई कशी आहे असा प्रश्न विचारायचे," ती सांगते.
 
आकांक्षा सांगते की, "मी काहीही उत्तर दिलं तरी ते म्हणायचे की आपली आई तर आपलीच असते. तू तिच्याकडे रहायला जा."
 
ही नाती इतकी अवघड का?
आयुष्यातील सावत्र नात्यांमध्ये इतका कडवटपणा का असतो हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. सावत्र नात्यांचा अनुभव घेतलेल्या लोकांच्या मनात अगदी येतोच.
 
याविषयी सायकॉलॉजिस्ट प्रवीण त्रिपाठी म्हणाले, "अशा नात्यांमध्ये अडचणी येतात. मात्र चर्चेने हे प्रश्न सोडवता येतात. एखाद्या नवीन नात्याबद्दल मुलांना स्पष्टपणे सांगितलं जात नाही ही एक मोठी समस्या आहे."
 
ते म्हणतात, "अनेकदा मुलांना पूर्ण सत्य सांगितलं जात नाही. पण गोष्टी जितक्या स्पष्टपणे सांगितल्या जातील तितकं ते चांगलं आहे. पुढे काय होणार आहे याची कल्पना दिली तर ते पण स्वत:ला तयार करू शकतील."
 
प्रवीण सांगतात, "मुलांना त्यांची भूमिका, त्याची कर्तव्य माहिती असतील तर नातं दृढ व्हायला मदत होईल. कोणालाही रिप्लेस केलं जात नाहीये हे सांगितलं पाहिजे. त्या ऐवजी एक नवीन सदस्य येतोय असं सांगणं जास्त योग्य ठरेल. कारण त्यांना जर योग्य पद्धतीनं सांगितलं नाही तर निश्चितच त्यांना वाईट वाटेल."
 
"एखाद्या मुलाला किंवा मुलीला नातेसंबंधात अडचणी आल्या तर त्यांचा स्वभाव रागीट किंवा चिडचिडा होऊ शकतो. आपली फसवणूक झाली असं मुलाला वाटलं तर नैराश्य येऊ शकतं," ते म्हणाले.
 
नवीन सदस्यासमोरची आव्हानं
मानसशास्त्रज्ञांच्या मते या अडचणी येण्याचं कारण म्हणजे घरातील नवीन सदस्य लगेच अधिकारवाणीने वागू लागतो. हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे मूल घाबरू शकतं.
 
सगळी आव्हानं मुलांनाच असतात अशातलाही भाग नाही. नवीन सदस्यांनासुद्धा अनेक अडचणी येऊ शकतात.
 
एका नवीन वातावरणाशी जुळवून घेणं, त्यानुसार आपली कामं ठरवणं, प्राथमिकता बदलणं, अशा अनेक गोष्टी नवीन सदस्यांना कराव्या लागतात.
 
अशाच प्रकारच्या तडजोडी लग्न होऊन घरात आलेल्या सुनेलाही कराव्या लागतात. मात्र समोर सावत्र हे बिरुद लागलं की या अडचणी आणखी मोठ्या होतात.
 
सावत्र आईपेक्षा सावत्र वडील होणं जास्त आव्हानात्मक आहे, असं डॉ. प्रवीण सांगतात.
 
"पुरुष कायम कुटुंबप्रमुख म्हणून भूमिका बजावू इच्छितात. म्हणून दुसऱ्यांचा विचार करणं त्यांना सहजासहजी जमत नाही. म्हणून त्यांना नवीन कुटुंबात येणं कठीण जातं," असं ते सांगतात.
 
समाज नवीन नाती का स्वीकारत नाहीत?
नातेसंबंध तज्ज्ञ निशा खन्ना म्हणतात की सावत्र नातं जुनं नातं संपल्यावरच येतं. मात्र आपल्या समाजात पहिल्या नात्यालाच जास्त मान मिळतो.
 
आपल्याकडे लग्न हे सगळ्यात पवित्र आणि आयुष्यभराचं नातं मानलं जातं. अशातच दुसऱ्या लग्नाला तितकी मान्यता मिळत नाही. समाजही दुसऱ्या लग्नाचा मोकळेपणाने स्वीकार करत नाही. त्यामुळे आव्हानं वाढत जातात, असं त्या सांगतात.
 
"असं झालं तर नात्यांमध्ये नकारात्मकता येण्याची शंका असते. नवीन सदस्याला तुलनात्मक नजरेनं पाहिलं जातं. अशात आव्हानं वाढण्याची शक्यता जास्त असते. मुलंसुद्धा ही तुलना करतात आणि हाच सगळ्यात मोठा धोका असतो."
 
"मुलांना विश्वासात घेऊन नवीन नात्याची सुरुवात केली, त्यांना लहानसहान निर्णयात सामील करून घेतलं तर या अडचणी दूर होऊ शकतात," असं निशा सांगतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती