काश्मिरी स्त्रिया आमच्या आया बहिणी...

गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (13:51 IST)
केंद्र सरकारने काश्मीरला न्याय मिळवून दिला आहे. काश्मिरी पंडितांना न्याय मिळवून दिला आहे. काश्मीरमधून आर्टिकल 370 काढल्यानंतर अनेकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. 370 काढल्यानंतर विरोध करणाऱ्यांच्या प्रतिक्रिया आभ्यासण्यासारख्या आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा प्रश्न यूएनकडे आहे आपण हस्तक्षेप करू नये, काहींचं म्हणणं आहे की हा काश्मीरीयतवर अन्याय आहे, काहींचं म्हणणं आहे की हा निर्णय लोकशाही पद्धतीने घेतला गेला नाही, काहींचं म्हणणं आहे की या निर्णयामुळे भारतावरचे हल्ले वाढतील, तर काहींचं म्हणणं आहे की ज्याप्रकारे काश्मिरी स्त्रियांवर विनोद होत आहेत त्यावरून काश्मीर मिळणं ही आपली लायकी नाही...
 
पहिला मुद्दा असा आहे की हा प्रश्न यूएनकडे आहे की नाही याने काही फरक पडत नाही. हा प्रश्न आपला अंतर्गत आहे आणि तो प्रश्न आपण आपल्या पद्धतीने सोडवू शकतो. यासाठी यूएन, अमेरिका ह्यांचा काहीही संबंध नाही. ज्यावेळी लादेनला मारायला अमेरिका पाकमध्ये घुसली होती त्यावेळी त्यांना कुणी प्रश्न केला होता का? ज्यावेळी तेलाच्या राजकारणासाठी अमेरिका नीच राजकारण करते तेव्हा त्यांना कुणी प्रश्न विचारतं का? त्यावेळी आपला प्रश्न आपण सोडवलेला आहे. दुसरी गोष्ट हा प्रश्न केंद्र सरकारने योग्य पद्धतीने सोडवलेला आहे कारण अजूनपर्यंत अमेरिका वा चीन ह्यांनी यावर प्रश्नचिन्ह उभे केलेले नाहीत. हा नरेंद्र मोदींच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विजय आहे.
 
दुसरा मुद्दा हा काश्मीरीयतवर अन्याय मुळीच नाही. मुळात काश्मीरच्या जनतेचा भलं याने होणार आहे आणि जेव्हा काश्मिरी पंडितांना सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या बायका मुली इथे ठेवून निघून जा, तेव्हा हे स्वयंघोषित पुरोगामी कुठे होते? आपल्याच देशातील आपलेच नागरिक बेघर झाले तेव्हा हा मानवतेवरवचा अन्याय नाही का वाटला? जेव्हा शुक्रवारच्या नमाझनंतर पोलिसांना जमाव मारून टाकतो तेव्हा मानवतेवरचा अन्याय कुठे गेला होता. दुसरी गोष्ट काश्मीरी जनतेचं डोकं हे फुटीरतावादी आणि काश्मिरी नेते भडकवत असतात कारण तो त्यांच्या धंदा आहे. जसा आतंकवाद हा पाकिस्तानचा मूळ व्यवसाय आहे. बटाटे उगवणे हा तर पार्ट टाइम बिजनेस. पण मूळ धंदा अतिरेकी घडवणे. आणि ह्या काश्मिरी नेत्यांची मुलं अमेरिकेत वगैरे शिकायला जातात. पण काश्मिरी जनतेच्या मुलांना मात्र हातात दगड घेऊन सैन्यावर फेकायला लावतात. मुळात इतकी वर्षे काश्मीरीयतवर अन्याय होत होता. आता कुठे त्यांना न्याय मिळालाय.
 
तिसरा मुद्दा हा प्रश्न लोकशाही पद्धतीनेच घेतलेला आहे. लोकशाहीचा खून तर राजीव गांधींनी शाहबानो ह्यांच्यावर अन्याय करून केला, लोकशाहीचा खून तर इंदिरा बाईंनी आणीबाणी लादून केला, लोकशाहीचा खून तर पराकोटीचा भ्रष्टाचार करून काँग्रेसने केलाय... आणि इतकी वर्षे काश्मीरमध्ये दंगली घडवून आणून, अतिरेकी तयार करून लोकशाही दृढ होत होती का? लोकशाहीचा खून असली भाषा तेच करतायत ज्यांचं दुकान बंद झालंय... त्यामुळे 370 काढल्यामुळे लोकशाही अधिक सक्षम होणार आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आता काश्मीरमध्येही लागू झालंय...
 
चैथा मुद्दा असा की आता भारतावरचे हल्ले वाढतील. तर मुळात असं काही होणार नाही. कारण ज्यावेळी 370 रद्द करण्यापूर्वी सैन्य काश्मीरमध्ये तैनात केलं होतं तेव्हा पाकिस्थान आणि काश्मिरी नेत्यांचे स्टेटमेंट्स वाचण्यासारखे होते. ते खूप घाबरलेले आणि बिथरलेले होते. दुसरी गोष्ट हुररियत नावाची गोष्ट केंद्र सरकारने संपवली आहे. दगडफेक करणाऱ्यांवर जी कारवाई झाली त्यामुळे तेही घाबरलेत. पाकिस्तानलाही आता कळून चुकलंय की हे मनमोहनसिंहाचं भित्रा आणि कमकुवत सरकार नाही, जे केवळ कसाबच्या हल्ल्यानंतर पुरावे पाठवत राहील. हे मोदींचं सरकार आहे जे सैन्य पाठवतं आणि मारल्याशिवाय आपले सौनिक माघारी फिरत नाहीत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमुळे त्यांचं कंबरडं मोडलंय. कुलभूषण जाधवांच्या केसमध्येही त्यांची नाचक्की झालीय. आणि 370 रद्द करण्याआधी आपलं सैन्य काश्मीरमध्ये तैनात केलं गेलं होतं... त्यामुळे आपण आपल्या सैन्यशक्तीवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. कोणत्याही प्रकारचे हल्ले करण्याची आता पाकिस्तानची ताकद उरलेली नाही.
 
शेवटचा मुद्दा असा की काश्मिरी स्त्रियांकर फिरणारे विनोद. अर्थात काही विनोद हे विनोदापुरते घ्यायचे असतात. कारण त्यात निखळ आनंद असतो... पण काही विनोद खरच खूप वाईट होते. काश्मिरी स्त्रिया सैनिकांवर दगडफेक करतात ही कदाचित त्यांची संस्कृती असेल, ज्यावेळी काश्मिरी पंडितांच्या स्त्रियांविषयी अभद्र बोललं गेलं, तुमच्या स्त्रिया सोडून निघून असं म्हणण्यात आलं, ही त्यांची संस्कृती होती. पण ही आपली संस्कृती मुळीच नाही. आपण जर शिवाजी महाराजांचं नाव घेत असू तर शिवाजी महाराजांची स्त्रियांचींषयीची भावनाही आपण समजून घेतली पाहिजे. सावरकरांना प्रत्येक स्त्रीमध्ये मातृभूमी दिसायची आणि विवेकनंदना प्रत्येक स्त्रीमध्ये माँ काली दिसायची ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे काश्मिरी स्त्रियांचं चारित्र्यहनन होईल असे विनोद आपण पसरवायला नको.
 
रामायणात एक कथा अशी आहे, ज्यावेळी रामाने बालिला मारलं त्यानंतरही सुग्रीव रामाला दिलेलं सीतेला शोधण्याचं वचन पूर्ण करत नव्हता. तो मंदिराच्या नशेत बुडावा होता, त्याच्या राण्यांची सुद्धा तिच अवस्था होती. लक्षण प्रचंड रागावला आणि सुग्रीवला जाब विचारण्यासाठी जात होता. ही बातमी सेवकाने जेव्हा सुग्रीवला सांगितली तेव्हा सुग्रीवने आपल्या बायकोला सांगितलं की तू लक्ष्मणाला गाठ, नाहीतर तर अनर्थ होईल. तेंव्हा ती बाई त्याच अवस्थेत बाहेर आली. अतिशय सुंदर अशी ती मादक स्त्री, पदर सावरण्याचंही तिला भान नव्हतं. ती लक्षणासमोर अली लक्षणाने तिला पाहताच नजर खाली घातली. दुसरा कुणी पुरुष असता तर तिच्या सौंदर्याचा किमान नजरेने तरी आस्वाद घेतला असता पण लक्षणाने मान वर करून पाहिलं नाही. सांगायचं तात्पर्य ही आपली संस्कृती आहे. आपलं मन लक्ष्मणा इतकं पवित्र नसेल, या आधुनिक युगात ते कठिणही आहे. पण आपण इतके नीच तर मुळीच नाही की स्त्रीचं चारित्र्यहनन करू... त्यामुळे हा वाह्यातपणा आपण आता सोडला पाहिजे आणि काश्मिरी स्त्रियांविषयी आपण आदरभाव ठेवला पाहिजे. जरी त्यांनी आपला द्वेष केला होता, आपल्यावर अत्याचार केले होते, आपल्या स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहिलं  होतं तरी आपण त्यांच्या स्त्रियांना सन्मानच केला पाहिजे. कारण हीच आपली संस्कृती आहे. ही सद्गुणविकृती नाही, ही संस्कृती आहे. आणि जो बलवान आहे, तोच खरा अहिंसक व समोरच्याला माफ करण्याचा क्षमतेचा असतो. आज आपलं सरकार बलवान आहे. ते काँग्रेससारखं पुचाट नाही. त्यामुळे हे सरकार आपलं रक्षण करू शकतं.
 
आपण काश्मिरी स्त्रियांना राख्या पाठवूया, कदाचित पुढच्या वर्षी रक्षबांधनाला त्या आपल्याला राख्या बांधतील. लक्षात घ्या आपण यापुढे मुक्तपणे काश्मीरमध्ये हिंडू शकणार आहोत, तिथल्या जमिनी सुद्धा आपण विकत घेऊ शकतो. कदाचित आपल्यापैकी अनेक जण तिथे कायमचे राहायलाही जाऊ शकतील. यातूनच आपापसातील मतभेद विसरून बंधुभाव वाढणार आहे... पण हा बंधुभाव असा प्रेमानेच वाढला पाहिजे... आपण प्रेमानेच विजय मिळवायचा आहे, कारण अधमांचा नाश करायला बंदूकधारी सैनिक सज्ज आहे. त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. यापुढे कृपया काश्मिरी स्त्रियांची मानहानी करू नका. हे छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच आवडलं नसतं एवढं तरी लक्षात असू द्या... काश्मिरी स्त्रिया आमच्या आया बहिणीच आहेत... त्या आईच्या ममत्वाचा स्पर्शाला आम्ही मुलं मुकलो होतो, त्या गोमट्या सुंदर बहिणीच्या राखीला आम्ही मुकलो होतो. पण 370 रद्द केल्यामुळे ही भिंत आता पाडली गेली आहे, हा दुरावा आता दूर झाला आहे..
 
भारत माता की जय...
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती