अग्निवीर, जातनिहाय जनगणना आणि बिहारला विशेष राज्याचा दर्जा याबाबत जेडीयूनं काय म्हटलं?

गुरूवार, 6 जून 2024 (18:53 IST)
जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी अग्निवीर योजनेवर पुनर्विचार व्हायला हवा असं म्हणलं आहे.
 
तसंच देशात जातनिहाय जनगणना करावी आणि बिहारला विशेष दर्जाही द्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
केसी त्यागी यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, "अग्निवीर योजनेबाबत काही मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. जनतेनं प्रश्न उपस्थित केल्यामुळं या योजनेच्या कमकुवत बाजूवर सविस्तर चर्चा व्हायला हवी,"असंही ते म्हणाले.
 
"जातनिहाय जनगणनेला कोणत्याही पक्षाचा विरोध नाही. पंतप्रधान मोदींनीही ते नाकारलेलं नाही. जातनिहाय जनगणना ही काळाची गरज आहे."
 
त्यागी म्हणाले की, "आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पण बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळायला हवा. राज्य विभाजनानंतर बिहारची जी अवस्था झाली आहे, ती दूर करण्यासाठी बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यायला हवा."
 
भाजपला स्वबळावर बहुमत मिळण्यात यावेळी यश आलेलं नाही. पण भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए आघाडीला 290 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळाला आहे. पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
 
पण जेडीयू 12 आणि टीडीपी 16 जागा जिंकत किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. सध्या हे दोन्ही पक्ष एनडीएचे घटकपक्ष आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती