कुतुबमिनारच्या जागी आधी मंदिर होतं का?

बुधवार, 10 मार्च 2021 (17:59 IST)
दिल्लीतील कुतुब मिनार परिसरातील कुतुब मिनार आणि कुव्वत-उल-इस्लाम मशीद ही भारतात मुस्लिम सुलतानांनी अगदी सुरुवातीला उभारलेल्या इमारतींपैकी आहेत.
 
कुतुब मिनार आणि लागूनच असलेल्या दिमाखदार कुव्वत-उल-इस्लाम मशिदीच्या बांधकामासाठी तिथल्या अनेक हिंदू आणि जैन मंदिरातले स्तंभ आणि दगडांचा वापर करण्यात आला होता.
 
काही हिंदू संघटनांच्या मते ही मशीद म्हणजे खरंतर मंदिर आहे आणि हिंदूंना इथे पूजा-अर्चना करण्याची परवानगी मिळायला हवी.
 
या वास्तूला मंदिर जाहीर करावं यासाठी या संघटनांनी कोर्टात याचिकादेखील दाखल केली आहे.
 
दिल्लीतल्या महरौली भागात असलेल्या कुतुब मिनारला जगातल्या काही मोजक्या आश्चर्यांपैकी एक मानलं जातं.
 
गेली अनेक शतकं जगातली सर्वांत उंच इमारत असण्याचा मान या मिनारला मिळाला आहे. कुतुब मिनारलगतची मशीद कुव्वत-उल-इस्लाम या नावाने ओळखली जाते.
 
भारतात मुस्लिम बादशहांनी उभारलेल्या अगदी सुरुवातीच्या मशिदींपैकी ही एक आहे.
 
या मशिदीत शेकडो वर्षं जुन्या मंदिरांचाही काही भाग आहे. आजही या मशिदीच्या आवारातल्या भिंतींवर आणि खांबांवर देवीदेवतांच्या मूर्ती आणि मंदिरांच्या वास्तुकलांची झलक पाहायला मिळते.
 
27 हिंदू आणि जैन मंदिरांचे अवशेष असलेल्या ठिकाणी ही मशीद उभारण्यात आल्याचं कुतुब मिनारच्या प्रवेशद्वाराजवळच्या एका शिलालेखात लिहिलं आहे.
 
मंदिर अस्तित्वात आहे का?
प्रख्यात इतिहासकार प्राध्यापक इरफान हबीब सांगातत, "हा मंदिराचा भाग आहे, यात शंका नाही. मात्र, ही मंदिरं तिथेच होती की आसपासच्या परिसरात, यावर कायमच चर्चा होते. हे उघड आहे की 25 किंवा 27 मंदिरं एकाच ठिकाणी असू शकत नाहीत. त्यामुळे हे स्तंभ इकडून-तिकडून गोळा करून इथे आणले गेले असावे."
 
'कुतुब मिनार अँड इट्स मॉन्युमेंट्स' या पुस्तकाचे लेखक आणि इतिहासकार बी. एम. पांडे यांच्या मते मूळ मंदिरं इथेच होती. ते सांगतात, "मशिदीच्या पूर्वेकडून प्रवेश केल्यास तिथे असलेलं बांधकाम हे खरं बांधकाम आहे. मला वाटतं मंदिरं इथेच होती. काही आसपासच्या परिसरातही असतील. तिथून स्तंभ आणि दगड इथे आणून इतर बांधकाम केलं असावं."
 
राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांच्या पराभवानंतर मोहम्मद घौरीने कुतुबुद्दीन ऐबक या आपल्या सेनापतीची दिल्लीचा शासक म्हणून नेमणूक केली.
 
इ. स. 1200 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक आणि त्यांचे उत्तराधिकारी शम्सुद्दीन इल्तुतमिश यांनी महरौली भागात कुतुब मिनारची उभारणी केली.
 
ऐबक यांच्या कार्यकाळातच कुव्वत-उल-इस्लाम मशीदही उभारण्यात आली आणि पुढे या मशिदीचा विस्तार होत गेला.
 
मशिदीच्या पश्चिमेकडचा भाग सुरुवातीच्या काळातल्या इस्लामिक शैलीत आहे.
 
मेहराबच्या (जिथे उभे राहून इमाम नमाज पठण करतात) भिंतींमध्ये कुराणातील प्रार्थना आणि फुलांचं नक्षीकाम आहे. मात्र, मशिदीत मंदिराचे अवशेषही आहेत. काही ठिकाणी तर जुन्या मंदिराचा संपूर्ण साचा आहे.
 
कुतुब कॉम्प्लेक्स खरंतर हिंदू धर्माचं केंद्र होतं, असा दावा काही हिंदू संघटना बऱ्याच काळापासून करत आल्या आहेत. हिंदू जागरण संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी नुकतीच एक याचिका दाखल करून या भागात पूजेची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कोर्टाकडे केली आहे.
 
बीबीसीशी बोलताना हिंदू कार्यकर्ते आणि वकील हरी शंकर जैन म्हणतात, "तिथे आजही हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती भग्नावस्थेत पडल्या आहेत. देशासाठी ही शरमेची बाब आहे. या संबंधात आम्हाला या ठिकाणी पूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका आम्ही दाखल केली आहे."
न्यायालयीन कारवाई
एप्रिलच्या पहिल्या आठवड्याात दिल्लीतील एका कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होईल.
 
मात्र, इतिहासातील इमारती आणि घटनांचं आजच्या संदर्भात आकलन करणे योग्य ठरणार नाही, ते आहे तसंच ठेवावं, असं पुरातत्त्ववाद्यांचं म्हणणं आहे.
 
पुरातत्त्व विभागाचे प्रमुख सैयद जमाल हसन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "आर्ट आणि आर्किटेक्चरशी संबंधित ज्या इमारती आहेत, मग त्या बौद्ध धर्माच्या असो, जैन असो, हिंदू असो किंवा मग इस्लाम धर्माच्या, अशा कुठल्याही धर्माच्या असो, भूतकाळातील वारसा जसा आहे तसाच जतन केला गेला पाहिजे. यावरून येणाऱ्या पिढीला ही वास्तुकला शैली कुणाची होती, गुप्त शैली आहे, शुंग शैली आहे, मौर्य शैली आहे, मुघल शैली आहे, कुणाची आहे हे कळेल. ती शैली जिवंत ठेवणं, आपलं काम आहे."
अनेक हिंदू संघटना आणि इतिहासकार ताज महाल, पुराना किला, जामा मशीद आणि मुस्लिम शासकांनी उभारलेल्या इतर अनेक इमारती हिंदूंच्या असल्याचं मानतात.
 
मुस्लिम शासकांनी हिंदूंची मंदिरं आणि इमारतींना पाडून तिथे नवीन बांधकाम केलं, असं त्यांना वाटतं.
 
रंजना अग्निहोत्री हिंदू कार्यकर्त्या आहेत, वकील आहेत आणि कुतुब मिनार परिसराला मंदिर जाहीर करावं यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या याचिकाकर्त्यांपैकी एक आहेत.
 
त्या म्हणतात, "आम्ही एकत्र शपथ घेतली आहे की भारतात जेवढी मंदिरं मुघलांनी हिंदूंचा अपमान करण्यासाठी आणि मशिदी उभारण्यासाठी उद्ध्वस्त केली तिथे आम्ही भारताची प्रतिष्ठा पुन्हा बहाल करू आणि ही मंदिरं स्वतंत्र करू."
 
प्रा. इरफान हबीब म्हणतात, "हे विचार भारताच्या वारशाला नष्ट करणारे आहेत. तुम्ही या दृष्टीने इतिहासाकडे बघितलं तर असे अनेक बौद्ध मठ आहे जिथे आधी मंदिरं होती. मग त्यांचं काय करायचं? तुम्हाला माहिती आहे महाबोधी मंदिरात जी मूर्ती आहे, माझ्या माहितीप्रमाणे ती शंकराची मूर्ती आहे. त्यामुळे असंच चालत राहिलं तर याला अंतच नाही."
मागे अनेक मुस्लिमांनी अनेक ऐतिहासिक धार्मिक वास्तूंमध्ये प्रार्थना सुरू करण्याचा प्रयत्न केला होता.
 
धार्मिक वाटणाऱ्या प्राचीन इमारतींविषयी पुरतत्त्व विभागाचं धोरण अगदी स्पष्ट असल्याचं इतिहासकार बी. एम. पांडे म्हणतात.
 
ते सांगतात, "ज्या प्राचीन इमारती पुरतत्त्व विभागाकडे येताना धार्मिक कामांसाठी वापरल्या जात नव्हत्या त्या नमाज पठण किंवा पूजेसाठी सुरू करता येत नाहीत. ज्या इमारती धार्मिक उद्देशांसाठी वापरात होत्या तिथे पूजा करण्यापासून रोखता येत नाही."
"पुरातत्त्व विभागाने कुतुब मिनार परिसर ताब्यात घेतला त्यावेळी तिथे नमाज किंवा पूजा होत नव्हती. त्यामुळे आज हा परिसर पूजेसाठी खुला करण्याची मागणी पूर्णपणे चुकीची आहे."
 
कुतुब मिनार परिसर पुरातत्त्व विभागाने उत्तमपणे जपून ठेवला आहे.
 
ऐतिहासिक कुतुब मिनार, तिथले मकबरे, मशिदी आणि मदरशांना दररोज हजारो पर्यटक भेट देतात.
 
कुतुब मिनारच्या परिसरात अनेक साम्राज्यांचं महत्त्वाचं केंद्र होतं. सरकारने या परिसराला राष्ट्रीय वारसा म्हणून संरक्षित केलं आहे.
 
या परिसराची धार्मिक अंगाने विभागणी करण्याऐवजी याकडे इतिहासाचं स्मारक म्हणून बघणे, अधिक योग्य ठरेल, असं इतिहासकारांचं म्हणणं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती