जगातल्या 90 कोटी टन अन्नाच्या नसाडीला तुमचाही हातभार लागत आहे का?

बुधवार, 10 मार्च 2021 (17:38 IST)
व्हिक्टोरिया गिल
एका जागतिक अहवालानुसार दरवर्षी सुमारे 90 कोटी टन अन्न फेकून दिलं जातं. 1 टन म्हणजे 1000 किलो. म्हणजे तुम्हीच अंदाज बांधा किती मोठ्या प्रमाणात अन्न फेकलं जातंय.
 
संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाअंतर्गत प्रसिद्ध केलेल्या फूड वेस्ट इंडेक्समध्ये समोर आलंय की दुकानं, घरं किंवा रेस्टॉरन्टमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नापैकी एकूण 17 टक्के अन्न सरळ कचऱ्यात फेकलं जातं.
 
या अहवालासाठी संयुक्त राष्टांची सहकारी असलेली स्वयंसेवी संस्था रॅपनुसार लोक सध्या आपल्याला किती अन्नाची गरज आहे यांचा अंदाज घेऊन किराणा, भाजीपाला खरेदी करत आहेत. रोजचा स्वयंपाकही मोजूनमापून करत आहेत.
 
याच गोष्टीला आणखी उत्तेजन देण्यासाठी प्रसिद्ध शेफची मदत घेतली जातेय. ज्यायोगे लोकांना अन्नाची नासाडी कमी करण्याच्या सवयी लागतील.
 
'2.3 कोटी ट्रक भरून अन्न'
या अहवालातल्या अन्नाच्या नासाडीचा प्रश्न आधी अंदाज होता त्यापेक्षा कित्येक पटींनी मोठा आहे, असं रॅपच्या रिचर्ड स्वॅनेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
"90 कोटी टन अन्न दरवर्षी फेकलं जातं. हे अन्न 40 टन क्षमता असणारे 2 कोटी 30 लाख ट्रक भरू शकतं. एका पाठोपाठ एक असे हे ट्रक उभे केले तर पृथ्वीला सात चकरा मारून होतील."
अन्ननासाडीचा प्रश्न आधी फक्त श्रीमंत देशांमध्येच आहे असं वाटत होतं. कारण तिथले लोक कायमच गरजेपेक्षा जास्त विकत घ्यायचे आणि खाऊ शकतो त्यापेक्षा जास्त शिजवायचे. पण या नव्या अहवालानुसार जगात 'जिथे बघावं तिथे' अन्न वाया जातंय.
 
या अहवालात काही त्रुटी आहेत. श्रीमंत आणि गरीब देशातल्या अन्न वाया जाण्याच्या पद्धतींविषयी यात स्पष्टता नाही. उदाहरणार्थ या अहवालात 'इच्छेने फेकून दिलेलं अन्न' आणि 'नाईलाज म्हणून फेकावं लागलेलं अन्न' याच फरक केलेला नाही.
 
"या मुद्दयाचा आम्ही बारकाईने अभ्यास केलेला नाही, पण शीतगृहांची व्यवस्था नसणं, त्यासाठी वीज किंवा इंधन नसणं असे प्रश्न गरीब देशांना सतावू शकतात," संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या मार्टिना ओटो यांनी बीबीसीला सांगितलं.
 
ओटो यांच्या मते फेकलेल्या अन्नापैकी खाण्यायोग्य असलेल्या आणि नसलेल्या भागांचा डेटा फक्त श्रीमंत देशांमध्ये उपलब्ध होता. न खाण्यायोग्य भाग म्हणजे उदाहरणार्थ हाडं किंवा सालं. गरीब देशांमध्ये अन्नाच्या खाण्यायोग्य भागाची नासाडी खूपच कमी होत असणार पण त्याची आकडेवारी उपलब्ध नसल्याने सर्वकष निष्कर्षात अख्ख्या जगातच अन्न वाया जातं असं दिसलं.
 
यावर्षी होणाऱ्या जागतिक हवामान आणि जैवविविधता परिषदेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालक इंगर अँडरसन जगातली अन्न नासाडी 2030 पर्यंत निम्म्यावर आणण्यासाठी सगळ्या देशांनी कटीबद्ध व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत.
 
त्या म्हणतात, "आपल्याला हवामान बदल, निसर्ग आणि जैवविविधतेची हानी, प्रदुषण, वाढता कचरा यासारख्या प्रश्नांचा गंभीरतेने विचार करून त्यावर उपाय हवे असतील तर जगभरातले व्यवसाय, सरकारं, आणि लोकांनी अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवेत."
 
"फेकलेलं अन्न जगातल्या एकूण ग्रीनहाऊस गॅसेस पैकी 8-10 टक्के ग्रीनहाऊस गॅसेसच्या उत्सर्जानासाठी कारणीभूत आहे. हेच ग्रीनहाऊस गॅसेस हवामान बदलाला जबाबदार आहेत. म्हणजे जर फेकलेलं अन्न एखादा देश असतं तर त्यांच्यामुळे होणारं कार्बन उत्सर्जन जगातलं तिसरं सगळ्यांत मोठं उत्सर्जन असतं."
 
लॉकडाऊनचा परिणाम
जिथे अन्न इच्छेने फेकून दिलं जातं आणि ते वाया जायला इतर कोणतीही कारणं नसतात अशा प्रकारची अन्नाची नासाडी कोव्हिड-19 च्या काळात बऱ्यापैकी कमी झाली. त्यामुळे अन्न नासाडी थांबवता येऊ शकते यावर शिक्कामोर्तब झालं.
 
रॅपने केलेल्या अभ्यासानुसार महिन्याचं नियोजन, अन्नाची व्यवस्थित साठवणूक आणि एकदम स्वयंपाक न करता थोडा-थोडा ताजा स्वयंपाक करणं या गोष्टींमुळे लॉकडाऊनच्या काळात 2019 च्या तुलनेत अन्नाच्या नासाडीत 22 टक्क्यांनी घट झाली.
 
"घरातच कोडलं गेल्यामुळे लोकांच्या स्वयंपाकाच्या सवयीत बदल झाला. लोक नियोजनबद्धरितीने रोज थोडा थोडा स्वयंपाक करायचे त्यामुळे वाया कमी जायचं. पण आता परिस्थिती पूर्ववत झाल्यामुळे अन्नाची नासाडी पुन्हा वाढायला लागली आहे," असं हा अभ्यास सांगतो.
 
अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी प्रसिद्ध शेफ आता लोकांना जागरूक करायच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
 
ब्रिटीश टीव्हीवरच्या कुक नादिया हुसेन रॅपसोबत काम करत आहेत. त्या त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शिळं अन्न फेकून न देता त्यांच काय करता येईल याच्या रेसिपी शेअर करतात.
 
तीन मिशेलीन स्टार असलेल्या रेस्टॉरन्टचे मालक मासिमो बोटूरा यांना संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाचे सदिच्छा दूत म्हणून नेमलं आहे. अन्नाची नासाडी कमी करण्यात ते मोलाची भूमिका बजवतील असंही पर्यावरण कार्यक्रमाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
 
लॉकडाऊच्या काळात त्यांच्या कुटुंबाने इटलीत 'क्वारंटाईन किचन' नावाचा शोही केला होता.
 
एका बाजूला कोट्यवधी टनांचं अन्न फेकून दिलं जातंय तर दुसऱ्या बाजूला 2019 मध्ये जवळपास 70 कोटी लोक उपाशी झोपत होते. कोरोनाच्या जागतिक साथीनंतर हा आकडा वाढण्याची चिन्ह आहेत.
 
इंगर अँडरसन म्हणतात की अन्नाची नासाडी थांबवली तर ग्रीनहाऊस गॅसेसच उत्सर्जन कमी होईल, जैवविविधतेची होणारी हानी कमी होईल, प्रदुषणाला आळा बसेल, अन्नाची उपलब्धता वाढेल ज्यायोगे जगात कमी लोक उपाशी राहतील. अशा जागतिक मंदीच्या काळात यामुळे पैसै वाचायलाही मदत होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती