अमेरिका तापमान : डेथ व्हॅलीमध्ये पारा 54 अंशांच्या वर

रविवार, 11 जुलै 2021 (11:54 IST)
अमेरिकेत अनेक राज्यांमध्ये भीषण उकाडा वाढला आहे. कॅलिफोर्निया आणि नेवाडामध्ये रोज तापमान नवनवीन विक्रम मोडीत काढत आहे. कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमध्ये शुक्रवारी विक्रमी 54.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. रविवारीही याठिकाणी उकाड्यापासून दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज हवमान विभागानं वर्तवला आहे. डेथ व्हॅलीमध्ये ऑगस्ट 2020 मध्येही एवढ्याच तापमानाची नोंद झाली होती. काही जण हे पृथ्वीवरील सर्वाधिक तापमान असल्याचा दावा करत आहे. 1913 मध्ये 56.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचा दावाही केला जातो. पण हवामान तज्ज्ञांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
अमेरिकेतील लाखो नागरिक तापमानाच्या या भीषण समस्येचा सामना करत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं (नॅशनल वेदर सर्व्हीस) अशा प्रचंड तापमान असलेल्या भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.
 
तसंच त्यांना घरामध्येच किंवा इमारतींमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती