कोरोना व्हायरसच्या दोन प्रकारांची एकाच वेळी लागण, 90 वर्षांच्या महिलेचा मृत्यू

रविवार, 11 जुलै 2021 (11:37 IST)
- मिशेल रॉबर्ट्स
एकाचवेळी कोरोनाच्या दोन व्हेरियंटची लागण होणं शक्य असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. एका 90 वर्षीय वृद्ध महिलेला अशा प्रकारचं डबल इन्फेक्शन (दुहेरी संसर्ग) झाल्यानंतर तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे.
 
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम आढळलेल्या अल्फा आणि बीटा प्रकारातील विषाणूची लागण या महिलेला झाली होती. बेल्जियममध्ये मार्च 2021 मध्ये मृत्यू झालेल्या या महिलेचं लसीकरण झालं नव्हतं.
 
दोन वेगवेगळ्या लोकांमुळं या महिलेलं असं डबल इन्फेक्शन झालं असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. अशाप्रकारचं समोर आलेलं हे अधिकृत असं पहिलंच प्रकरण असल्याचं त्यांचं मत आहे. हा प्रकार दुर्मिळ असला तरी दुहेरी संसर्गाचे असे प्रकार समोर येत असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. वैद्यकीय सूक्ष्म जीवशास्त्र आणि संसर्गजन्य रोग यासंबंधीच्या यंदाच्या युरोपीयन काँग्रेसमध्ये या वृद्ध महिलेच्या प्रकरणावर चर्चा केली जात आहे.
 
जानेवारी 2021 मध्ये ब्राझीलमध्ये दोन जणांना एकाच वेळी दोन प्रकारच्या कोरोना विषाणूंची लागण झाल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली होती. त्यापैकी गॅमा नावाचा विषाणू हा चिंताजनक असल्याचं म्हटलं जात होतं.
 
दरम्यान, पोर्तुगालमध्येही असंच एक प्रकरण समोर आलं. येथील डॉक्टरांनी नुकतेच एका 17 वर्षीय रुग्णावर उपचार केले. या रुग्णावर आधीच कोव्हिडची लागण झाल्यानं उपचार सुरू होते. त्याचदरम्यान रुग्णाला खोकल्याचा त्रास सुरू झाला. तो कोव्हिडचा दुसरा प्रकार होता.
 
कोरोनाचा दुहेरी संसर्ग झालेल्या या 90 वर्षीय महिलेला शास्त्रज्ञ अभ्यास करत असलेल्या कोरोनाच्या दोन चिंताजनक अशा विषाणूंची लागण झाली होती. तब्येत खालावल्यानं या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यानंतर या महिलेच्या श्वसन यंत्रणेमध्ये आणखी चिंताजनक अशी लक्षणं आढळून आली.
 
या महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर जेव्हा तपासण्या करण्यात आल्या तेव्हा या महिलेला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कोरोना विषाणुंची लागण झाल्याचं समोर आलं. कोरोनाच्या साथीतील अल्फा आणि बीटा या दोन प्रकारचे हे विषाणू होते.
 
''बेल्जियममध्ये एकाचवेळी या दोन विषाणूंचा प्रसार होत आहे. त्यामुळं या महिलेला एकाच दरम्यान दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून दोन विषाणुंची लागण झाली असण्याची शक्यता आहे. पण त्यांना लागण कशी झाली, हे कळलंच नाही,'' अशी माहिती बेल्जियमच्या असाल्ट येथील ओएलव्ही हॉस्पिटलमधील प्रमुख संशोधक डॉ. अॅनी वंकिरबर्घन यांनी दिली.
 
"या महिला एकट्या राहत होत्या. पण त्यांची काळजी घेण्यासाठी अनेकजण (केअर टेकर) येत होते.' रुग्ण महिलेची प्रकृती वेगानं खालावण्यामध्ये दोन वेगळ्या प्रकारच्या विषाणुंची (दुहेरी) नेमकी भूमिका होती का? हे सांगणं कठीण आहे," असंही त्या म्हणाल्या.
 
शरिरात विषाणुंची संख्या सातत्यानं वाढत असतानाच त्यांच्यामध्ये बदल (म्युटेशन) होत असतो. त्यामुळे विषाणुचे नवे प्रकार तयार होतात.
 
कोव्हिडच्या विषाणूमध्ये काळानुरुप काही महत्त्वाचे बदल होत गेले आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास, विषाणुंची संख्या वाढण्याची क्षमता वाढवण्यात किंवा आधी कोरोनाचा संसर्ग अथवा लसीकरण यामुळे तयार झालेल्या रोगप्रतिकार शक्तिला चकवा देण्याची क्षमता या विषाणूमध्ये निर्माण झाली.
 
यापैकी सर्वांत चिंताजनक विषाणूवर शास्त्रज्ञ बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. त्यालाच ''विषाणूचा चिंतानजक प्रकार'' म्हणण्यात आलं आहे.
 
सध्या इंग्लंडमध्ये सर्वाधिक प्रसार हा कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा होत आहे.
 
विषाणूच्या या प्रकाराच्या विरोधातही यापूर्वीच्या कोरोना लसी प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास तज्ज्ञांना आहे.
 
त्याचप्रमाणे अशाप्रकारे कोरोनाच्या नव्या विषाणूंच्या विरोधात अधिक प्रभावी ठरणारी लस तयार करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. त्यांचा बूस्टर डोसप्रमाणं वापर करता येऊ शकेल.
 
"एकाच व्यक्तीमध्ये अशाप्रकारे दोन चिंताजनक विषाणूचे प्रकार आढळणं यात काही नवीन नाही. कोरोनाची लागण झालेल्या एकाच व्यक्तीकडून याची लागण झालेली असू शकते. तसंच अनेक व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंही याची लागण होऊ शकते,'' असं वार्विक विद्यापीठाच्या विषाणूशास्त्राचे प्राध्यापक लॉरेन्स यंग म्हणाले.
 
अशा प्रकारच्या संसर्गामुळं कोव्हिड-19 ची स्थिती आणखी गंभीर होण्यात किंवा यापूर्वीच्या लसींची परिणामकारकता कमी होण्याची शक्यता आहे का? हे समजण्यासाठी आणखी अभ्यासाची गरज असल्याचंही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती