नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्याचा देवेंद्र फडणवीसांना फायदा होईल की तोटा?

शनिवार, 10 जुलै 2021 (12:58 IST)
प्राजक्ता पोळ
भाजपचे नेते नारायण राणे यांनी 7 जुलैला केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद दिल्यामुळे राज्यात शिवसेनेला शह देण्यासाठीची भाजपची ही रणनीती असल्याचं स्पष्ट आहे.
 
पण राज्याच्या राजकारणात रस असलेल्या नारायण राणेंना थेट केंद्रीय कॅबिनेटमध्ये स्थान मिळालं. दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेले नारायण राणें महत्त्वाकांक्षी नेते आहेत. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन राज्यसभेची खासदारकी देऊन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
 
त्यासाठी राज्यातल्या भाजप नेतृत्वाने आग्रह धरल्याचंही बोललं गेलं. राणेही केंद्रात फारसे खुश असल्याचं दिसलं नाही. पण आता केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांची पुन्हा एकदा राजकीय ताकद वाढली आहे.
 
त्यामुळे राज्यातील राजकारणात रस असलेले नारायण राणे भाजप नेत्यांसाठी प्रतिस्पर्धी ठरतील का? नारायण राणेंना केंद्रात स्थान मिळाल्याचा देवेंद्र फडणवीस यांना फायदा होईल की तोटा? याबाबतचा हा आढावा..
 

महत्वाकांक्षी नेते
नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेपासून सुरू झाली. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंच्या विश्वासामुळे त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं.
 
कालांतराने उध्दव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात मतभेद होऊ लागले. मग त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला.
 
2005 साली त्यांनी कॉंग्रेसची वाट धरली. काँग्रेसमध्ये असताना राणे यांनी राज्याची महसूल आणि उद्योग मंत्रिपदं भूषवली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये राज्याच्या कॅबिनेटमध्ये महत्वाचं खाती मिळूनही त्यांची मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा कायम राहिली.
 
त्यासाठी त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका करतानाही विचार केला नाही. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे काही काळासाठी त्यांना कॉंग्रेस पक्षातून निलंबितही करण्यात आले होते.
 
नारायण राणे यांनी सोनिया गांधी यांची माफी मागितल्यानंतर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं. पण त्यानंतरही नारायण राणे अधूनमधून कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करत असतं.
 
तत्कालीन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांचे अनेकदा मतभेद झाले. नारायण राणे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर प्रसार माध्यमांतून अनेकदा टीका केली. त्यानंतर राणे हे भाजपच्या जवळ गेले.
 
राज्याच्या राजकारणात रस असतानाही राणे यांना भाजपकडून राज्यसभेवर खासदार करण्यात आले आणि आता ते केंद्रात मंत्री झाले. राणेंचा हा प्रवास त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे वादग्रस्त ठरला आहे.
 
नारायण राणे ज्या पक्षात असतील त्या पक्षातल्या इतर नेत्यांना त्यांनी कायमच आव्हान दिलं. यामुळे नारायण राणेंची महत्वाकांक्षा देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभं करु शकते का?
 
जेष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, "नारायण राणे हे फडणवीसांसाठी आव्हान ठरतील असं वाटतं नाही. राणेंचा राज्यातल्या भाजपला मजबूत करण्यासाठी आणि कोकणात शिवसेनेला धक्का देण्यासाठी निश्चित फायदा होईल. नारायण राणे यांना केंद्रात मंत्री पद मिळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केले आहेत. सध्याच्या परिस्थितीत तरी फडणवीस आणि राणे यांच्यात नेतृत्व संघर्ष होईल असं वाटत नाही."
 

राणेंचं मराठा नेतृत्व?
राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये संघर्ष बघायला मिळतोय. यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर येऊ शकतो.
 
सध्या मराठा आरक्षणावरुन पेटलेल्या राजकारणात संभाजी राजे छत्रपती भाजपपासून दूर गेल्याचं चित्र आहे. उदयनराजेंचा भाजपला फारसा उपयोग होताना दिसत नाही. अशातच नारायण राणेंचा मराठा चेहरा केंद्रीय मंत्री झाला.
 
जेष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, "भाजपमध्ये जातीय राजकारणासाठी एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहिलं जात नाही. जसं वंजारी मतदारांसाठी पंकजा मुंडेंवर अवलंबून न राहता भाजपने रमेश कराड आणि भागवत कराडांना पुढे आणलं. धनगर मतदारांसाठी महादेव जानकरांवर अवलंबून न राहता पक्षाने गोपीचंद पडळकरांना तयार केलं. तसंच मराठा समाजासाठी नारायण राणेंचा फायदा भाजप करून घेऊ शकते आणि त्याचा राज्यात देवेंद्र फडणवीसांना फायदाच होईल."


शिवसेनेला शह देण्यापुरताच राणेंचा फायदा?
शिवसेनेने भाजपबरोबर युती तोडून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केलं. यामुळे भाजपचं संख्याबळ जास्त असूनही त्यांना विरोधी पक्षात बसावं लागलं. हे भाजपच्या जिव्हारी लागलं आहे.
 
2022 ला मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यात भाजप शिवसेनेला शह देण्याची तयारी करतेय.
 
जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात, "भाजपसमोर सध्या शिवसेनेला शह देणं एवढंच आव्हान आहे. महाराष्ट्राची सत्ता पालट वगैरे या गोष्टी भाजपसाठी फार मोठ्या नाहीत. भाजप पक्ष हा खूप पुढचा विचार करून चालणारा पक्ष आहे. 2024 च्या निवडणुकीचा विचार करुन चाललं तर विरोधी पक्षाबाबत आक्रमक राहणार्‍या नेत्याचं कार्ड भाजपने बाहेर काढलय असं म्हणायला हरकत नाही. शिवसेनेविरोधात आक्रमक असणाऱ्या राणेंचा राज्यात भाजपला आणि फडणवीसांना फायदाच होईल. जे काम देवेंद्र फडणवीस आता करत आहेत. त्याला नारायण राणेंच्या आक्रमकतेमुळे पाठींबा मिळेल. केंद्रीय मंत्री असल्यामुळे राणेंच्या बोलण्याला महत्त्व प्राप्त होईल. याउलट राणे आणि फडणवीस यांच्यात स्पर्धा होईल असं कुठेही वाटत नाही."
 
नारायण राणेंच्या राजकारणाविषयी बोलताना जेष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात, "नारायण राणे हे शिवसेनेचे आक्रमक नेते होते. ते कॉंग्रेसमध्ये गेले. कॅबिनेट मंत्री पदं भूषवली. मग भाजपमध्ये आले. आता केंद्रीय मंत्री झाले. यामध्ये त्यांना कोकणातून निसटता पराभव पत्करावा लागला. निलेश राणे लोकसभेला शिवसेनेसमोर निवडणूक हरले. हे विसरता येणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं सध्याचं राजकारण बघता नारायण राणेंपासून फडणवीसांना नुकसान होईल असं कुठेही वाटत नाही."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती