इराणी कुर्द कमांडर जनरल कासिम सुलेमानी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार
शुक्रवार, 3 जानेवारी 2020 (11:25 IST)
कुर्द कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ल्यात ठार केलं. सुलेमानी हे इराणच्या कुर्द सेनेचे प्रमुख होते.
याच हल्ल्यात कताइब हिजबुल्लाहचा कमांडर अबू महदी अल मुहांदिस हा देखील ठार झाल्याचं अमेरिकेने सांगितलं आहे.
"परदेशात राहणाऱ्या अमेरिकन सैनिकांच्या सुरक्षेसाठी कासिम सुलेमानी यांना ठार मारण्याचं पाऊल उचललं गेलं. अमेरिकेच्या अध्यक्षांनीच तसा आदेश दिला होता. सुलेमानी यांना अमेरिकेनं दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं," अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण खात्यानं दिली.
अमेरिकनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, "27 डिसेंबर रोजी इराकस्थित अमेरिकन सैनिकांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यासह गेल्या अनेक महिन्यांपासून इराकमधील अमेरिकन सैन्याच्या चौक्यांवरील हल्ल्यांमध्ये सुलेमानी यांचा हात होता. गेल्या आठवड्यात अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्यालाही सुलेमानी यांनीच परवानगी दिली होती."
तसंच, "अमेरिकेनं केलेला एअरस्ट्राईक भविष्यातील इराणी हल्ल्यांना रोखण्याच्या उद्देशानं केला गेलाय. अमेरिका कुठंही असली तरी, आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठीची कारवाई सुरुच ठेवेल," असंही या पत्रात अमेरिकनं म्हटलंय.
जनरल कासिम सुलेमानी यांच्यावरील कारवाई मध्य-पूर्व आशियातील अत्यंत मोठी घटना मानली जातेय.
इराण आणि इराण समर्थक शक्ती आता इस्रायल आणि अमेरिकेविरोधात उत्तरादाखल जोरादर पावलं उचलण्याची शक्यताह वर्तवली जातेय.
कताइब हिजबुल्लाह संघटना अमेरिकेच्या निशाण्यावर का?
कताइब हिजबुल्लाह संघटना सातत्यानं इराकस्थित आमच्या लष्करी चौक्यांवर हल्ला करते, असा दावा अमेरिका करत आलीय.
2009 पासूनच अमेरिकेनं कताइब हिजबुल्लाहला 'दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केलंय. शिवाय, अबू महदी अल मुहांदिसला 'आंतरराष्ट्रीय दहशतवादी' महणून घोषित केलं होतं.
इराकच्या स्थिरतेला आणि शांततेला कताइब हिजबुल्लाह संघटना घातक असल्याचा दावा अमेरिकेचा आहे.
"कताइब हिजबुल्लाहचा संबंध इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशन गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC च्या आंतरराष्ट्रीय कारवाया सांभाळणाऱ्या कुर्द सेनेशी आहे. या संघटनेला इराणकडून विविध प्रकारची मदत मिळते," असं अमेरिकेच्या संरक्षण खात्याचं म्हणणं आहे.