जिल्हा परिषद निवडणुकांतली महाविकासआघाडीची मुसंडी भाजपसाठी धोक्याची घंटा आहे का?

शुक्रवार, 3 जानेवारी 2020 (10:45 IST)
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं सरकार महाविकास आघाडीच्या रुपात सत्तेवर येऊन आता महिना उलटला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला तरी खातेवाटप अद्याप जाहीर झालेलं नाही.
 
तरीही महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूरमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आघाडीने यश मिळवलं. तर आज होणाऱ्या जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे काय भूमिका घेतात यावर सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
 
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने आता भाजपची महाराष्ट्रात कशी स्थिती असेल, ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे का? या प्रश्नांचा वेध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
 
नाशिकमध्ये शिवसेनेने राखला गड
आज झालेल्या नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सयाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
 
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर जि. प. अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून बाळासाहेब क्षीरसागर तर भाजपाकडून जे. डी. हिरे यांचे अर्ज दाखल केला होता. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सयाजी गायकवाड तर भाजपकडून कान्हू गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.
 
शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी च्या एकीपुढे आपले संख्याबळ अपुरे आहे हे बघून भाजपच्या उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
 
नाशिकच्या जिल्हा परिषदेत एकूण सदस्यसंख्या 73 आहे. त्यापैकी एक पद रिक्त आहे. सध्या असलेल्या 72 सदस्यांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 25 सदस्य आहेत. तर राष्ट्रवादीचे 15, भाजपाचे 15 आणि काँग्रेसचे 8 सदस्य, तर माकपचे 3 आणि 6 अपक्ष सदस्य आहेत.
 
याबदद्ल बोलताना महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीचे संपादक शैलेंद्र तनपुरे म्हणाले, "मागच्या निवडणुकीतही शिवसेनेने काँग्रेसच्या सहाय्याने जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली होती. यावेळीही त्याची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला तसा नवीन नाही. मात्र आज जळगावमध्ये होणारी निवडणूक रंजक असेल. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर गेली 20 वर्षं भाजपच्या वर्चस्वाला धोका निर्माण होईल."
 
कोल्हापुरातूनही भाजप हद्दपार
2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला कोल्हापूर मतदारसंघातून एकही जागा मिळाली नाही. आजही झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही भाजपचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या बजरंग पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी सतीश पाटील यांना विजय मिळाला.
 
आज जिल्हा परिषदेच्या 67 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत. काँग्रेसला 14, राष्ट्रवादीला 10, शिवसेनाला 10, शेतकरी संघटना आणि शाहू आघाडीला दोन, अपक्षांना एक, चंदगड विकास आघाडीला आणि ताराराणी विकास आघाडीला एक अशा एकूण 41 जागांवर विजय मिळाला आहे.
 
तर भाजप आघाडीला एकूण 24 जागांवर विजय मिळाला.
 
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेत झालेल्या पराभवानंतर आता भाजप जिल्ह्यातून हद्दपार झाली आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, महापालिका आणि आता जिल्हा परिषद यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. याचे परिणाम येणाऱ्या काळात सर्वत्र अशाच प्रकारे पाहायला मिळतील असं राजकीय विषयाचे अभ्यासक प्रकाश पवार यांना वाटतं.
 
"भाजपच्या फडणवीस मॉडेलला तोंड देण्यासाठी शरद पवार यांनी नवी राजकीय समीकरणं तयार केली त्यातूनच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. हे राजकीय समीकरण होण्यासाठी शरद पवार यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारानुसार सूत्र तयार केले प्रबोधनकार यांनी ब्राह्मणेतर हिंदूंचा स्वीकार केला होता.
 
"त्यानुसार राजकारणात ब्राह्मणेतर हिंदूच कायम राहील हे सध्याच चित्र आहे. त्याचाच भाग म्हणून सिकेपी, मराठा आणि मराठेतर हिंदू यांना केंद्रस्थानी ठेवून इतरांना सत्तेपासून दूर ठेवलं. याचा फायदा म्हणून येणाऱ्या काळात भाजप सत्तेपासून दूर राहील," असं प्रकाश पवार यांना वाटतं.
 
तर राज्यात महाविकास आघाडी असल्याने सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वच पातळ्यांवर ही आघाडी टिकवणं गरजेचं आहे असं लोकमतचे वरिष्ठ पत्रकार विश्वास पाटील यांना वाटतं.
 
ते पुढे सांगतात, "सहकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था वर येत्या काळात या तीन पक्षाचे वर्चस्व राहिल. गेल्यावेळी जरी भाजप सत्तेत आला असला तरी या तिन्ही पक्षांना टक्कर देण्याइतपत भाजप राज्याच्या राजकारणात सक्षम नाही. त्यामुळं येत्या काळात भाजपला हर तर्हेने सत्तेपासून दूर ठेवत राज्यात हीच राजकीय समीकरणं पाहायला मिळतील."
 
नगरमध्ये काय झालं?
अहमदनगरमध्ये ही महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. महाविकास आघाडीमुळे भाजपला माघार घेण्याची वेळ नगरमध्ये आली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या प्रताप शेळकेंची निवड झाली.
 
या निवडणुकीचे विश्लेषण करताना लोकमतच्या नगर आवृत्तीचे संपादक सुधीर लंके म्हणाले, "ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. कारण ग्रामीण भागात शिवसेनेचा जोर भाजपपेक्षा जास्त होता.
 
इतर पक्षांच्या नेत्यांमुळे भाजप वाढली आहे. त्यामुळे भाजपचा जो पाया तयार व्हायला हवा तो झाला नाही. त्यामुळे याचा फटका भाजपला नक्कीच बसेल. गेल्या पाच वर्षांत भाजपने नगर जिल्ह्यात सत्ता स्थापन करण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र त्यांना ते शक्य झालं नाही. यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांकडे समीकरण जुळून आलं नाही. कारण शिवसेना त्यांच्याबरोबर नाही, दोन्ही काँग्रेस त्यांच्याबरोबर नाही. अशा वेळेस संख्याबळ आणणार कुठून?" असं लंके सांगतात.
 
या संपूर्ण विषयावर बोलताना महाराष्ट्र टाइम्स चे ज्येष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे म्हणाले, "सगळ्याच ठिकाणी महाविकास आघाडी येणं शक्य नाही. कारण स्थानिक पातळीवर सत्तेची समीकरणं वेगळी असतात. त्यामुळे कोण कोणाचं मित्रपक्ष आहेत हे सगळं स्थानिक समीकरणावर ठरत असतं.
 
"पण तरीसुद्धा राज्याच्या पातळीवर जी समीकरणं असतात त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होत असतात. यात अपक्षांचा वाटाही मोठ्या प्रमाणात असतो. कारण राज्यात सत्तेवर असलेले लोक अपक्षांना काही आश्वासनं देऊन त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सत्तेवरच्या पक्षाची सरशी होते. ती याआधी भाजपची व्हायची. आता ती महाविकास आघाडी छोट्या पक्षांना बरोबर घेऊन ही गणितं जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते, चोरमारे सांगतात.
 
आता जळगावमध्ये आज होणाऱ्या निवडणुकीत काय होतंय यावरून भाजपचं चित्र आणखी स्पष्ट होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती