प्रवीण दरेकर: शिवसेना ते मनसे ते भाजप आणि आता परिषदेतले विरोधी पक्षनेते

शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (10:00 IST)
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झालीय.
 
शिवसेनेतून मनसेत आणि मनसेतून भाजपमध्ये असा राजकीय प्रवास करणाऱ्या प्रवीण दरेकर यांनी केलाय. विद्यार्थी दशेपासून प्रवीण दरेकर यांचा राजकारणात वावर आहे.
 
दरेकरांचे वडील एसटी कंडक्टर, तर आई मासळी विक्रेती होती. वैयक्तिक आयुष्यातील खाचखळगे पार करत प्रवीण दरेकरांनी आधी मुंबईतील आणि आता राज्याच्या राजकारणात आपलं विशिष्ट स्थान निर्माण केलंय.
 
मुंबै बँकेतील घोटाळ्यावरून प्रवीण दरेकर यांच्यावर आरोपही झाले. हे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.
 
व्यक्तिगत आयुष्यातील संघर्ष, राजकारणातील पक्षांतरं आणि घोटाळ्यांमध्ये आलेलं नाव, या सगळ्या गोष्टींमुळं प्रवीण दरेकर नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले.
 
मात्र, आता भाजपमध्ये प्रवेश करून पाच वर्षेही झाले नसताना, दिग्गजांना बाजूला सारत भाजपनं दरेकरांची थेट राज्याच्या विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्यानं पुन्हा चर्चा सुरू झालीय.
 
मूळचे रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील असलेल्या प्रवीण दरेकरांच्या राजकीय जीवनाची सुरुवात मुंबईतून झाली.
 
1989 साली मुंबई विद्यापीठातून कॉमर्स विषयात पदवी संपादित करून पुढे त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं.
 
विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासह प्रवीण दरेकर सध्या भाजपचे राज्य सचिव आहेत. शिवाय, भाजपच्या सहकार विभागाचे प्रमुखही आहेत.
 
1. वडील एसटी कंडक्टर, तर आई मासळी विक्रेती :
प्रवीण दरेकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील वसाप या गावी झाला. वडील एसटी कंडक्टर होते. मात्र, वडिलांची एसटीतली नोकरी सुटल्यानं घर चालवण्यासाठी प्रवीण दरेकरांच्या आईनं मासळी विकण्यास सुरूवात केली.
 
घरात पैसे नसल्यानं शिक्षणासाठी पाच-पाच किलोमीटर चालत जावं लागत असे, असं प्रवीण दरेकरांनी विधानपरिषदेच्या सभागृहात भाषणादरम्यान सांगितलं. त्यांचं दहावीपर्यंतचं शालेय शिक्षण पोलादपुरातच झालं.
 
2) शिवसेनेचं काम करण्यास सुरुवात
1989 सालापासून प्रवीण दरेकर यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात शिवसेनेतून केली. भारतीय विद्यार्थी सेनेचे (भाविसे) ते राज्य सरचिटणीस होते. राज ठाकरे त्यावेळी भाविसेची जबाबदारी सांभाळत होते. राज ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून प्रवीण दरेकरांची ओळख होती.
राज ठाकरेंचा निकटवर्तीय असल्याचा फटकाही दरेकरांना बसल्याचं वरिष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात.
 
3. शिवसेनेवर नाराजी
"1997 साली प्रवीण दरेकर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवू इच्छित होते. त्यांना दहिसरमधून तिकीटही जाहीर झालं. त्यामुळं आभारासाठी ते 'मातोश्री'वर गेले. तिथून घरी परतले, तर तोपर्यंत त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं," असं धवल कुलकर्णी सांगतात.
 
शिवसेनेतली घुसमट अशी साचत गेली. ती पुढे 2006 साली मनसेच्या रूपात समोर आली. ज्यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, त्यावेळी दरेकरांनी मनसेत प्रवेश केला.
 
4) मनसेत प्रवेश आणि पहिल्यांदा विधानसभेत दाखल:
शिवसेनेतल्या नाराजांना आणि आपल्या समर्थकांना घेऊन राज ठाकरेंनी 2006 साली मनसेची स्थापना केली. त्यावेळी प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंना साथ दिली. 2009 साली मनसे पक्ष ज्यावेळी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरा गेला, त्यावेळी प्रवीण दरेकर मुंबईतल्या मागाठाणे मतदारसंघातून विजयी झाले.
 
शिवसेनेतील आक्रमकपणा मनसेत आल्यानंतरही प्रवीण दरेकरांनी सोडला नाही. माध्यमांमधून मनसेची बाजू मांडत असत.
 
5) मुंबै बँकेच्या घोटाळ्याचा आरोप :
प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे 2000 पासून संचालक होते, तर 2010 पासून अध्यक्ष आहेत. या बँकेत घोटाळा केल्याचा आरोप दरेकरांवर झाला.
 
मात्र, या आरोपांवर प्रवीण दरेकरांनी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर सभागृहात केलेल्या भाषणात म्हटलं, "मुंबै बँकेच्या माध्यमातून काम करत असताना अनेकांनी टीका केली. तिथला पैसा ग्रामीण भागातल्या कारखान्यांना दिला. एखादा कारखाना अडचणीत आला असेल, मात्र अनेक कारखाने मुंबै बँकेच्या मदतीनं उभे राहिलेत."
 
हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे उपस्थित असलेल्या प्रवीण दरेकरांना बीबीसी प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी या आरोपांबाबत प्रश्न विचारले. दरेकरांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. यावर उत्तर त्यांनी दिलं की, "कोर्टाने (मला) क्लीन चिट दिली आहे. सर्व केसेस संपलेल्या आहेत. मी तुम्हाला याचा अहवाल द्यायला तयार आहे. जे आरोप करतायेत त्यांना सांगा पुरावे द्या. या पलीकडे मला यावर काही बोलायचं नाही."
 
6) राज ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश :
2014 च्या विधानसभा निवडणुकीत दरेकर पुन्हा मागाठाणे मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर लढले, मात्र पराभूत झाले. त्यातच मनसेला गळती लागली. मोठे नेते सोडून जाऊ लागले. त्यातले एक प्रवीण दरेकरही होते.
 
जानेवारी 2015 मध्ये प्रवीण दरेकरांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पुढच्याच वर्षी म्हणजे जुलै 2016 मध्ये प्रवीण दरेकर भाजपतर्फे विधानपरिषदेत गेले. माध्यमांमधून भाजपची बाजू मांडण्यातही प्रवीण दरेकर पुढाकार घेत असतात.
 
7) फडणवीसांचे निकटवर्तीय :
 
प्रवीण दरेकर यांची माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून भाजपमध्ये ओळख आहे.
 
"विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपमध्ये भाई गिरकर, सुजितसिंह ठाकूर यांसारखे नेते होते. मात्र, तरीही प्रवीण दरेकरांची वर्णी लागली. या निवडीने राज्य भाजपवरील देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व अबाधित असल्याचं सिद्ध झालं," असं धवल कुलकर्णी सांगतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती