अमेरिकेचा अफगाणिस्तानात ड्रोन हल्ला, ISIS च्या तळांना केलं लक्ष्य

शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (13:19 IST)
अफगाणिस्तानातील इस्लामिक स्टेटच्या (ISIS) तळावर हल्ला केल्याची माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे.
 
सध्या अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असलेल्या काबूल विमानतळावर गुरुवारी (26 ऑगस्ट) आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान (ISIS-K) या संघटनेने घेतली होती. यामध्ये 170 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर मृतांमध्ये 13 अमेरिकन सैनिकांचाही समावेश आहे.
 
या हल्ल्याची योजना बनवणाऱ्या इस्लामिक स्टेट खुरासान संघटनेच्या सदस्यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून लक्ष्य केलं.
 
अफगाणिस्तानातील नांगाहार प्रांतात ड्रोनच्या मदतीने ही मोहीम पार पडली. यामध्ये ज्यांच्यावर हल्ला झाला ते कट्टरवादी मारले गेले आहेत, असा अंदाज आहे.
 
सेंट्रल कमांडचे कॅप्टन बिल अर्बन यांनी या ड्रोन हल्ल्याबाबत अधिक माहिती दिली.
 
अफगाणिस्तानच्या नांगाहार प्रांतात हा हल्ला करण्यात आला. याठिकाणी संशयित हल्लेखोर ठार झाल्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्याही नागरीकाची जीवितहानी झालेली नाही.
 
अमेरिकेने पाठवलेल्या रिपर ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आला. या ड्रोनने संशयिताला कारमध्येच गाठलं. यावेळी त्याच्यासोबत आणखी एक इस्लामिक स्टेट कट्टरवादी उपस्थित होता. या दोघांनाही ठार करण्यात आलं आहे, असं अधिकाऱ्यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
 
ISIS-K चे बहुतांश कट्टरवादी अफगाणिस्तानाच्या पूर्वेकडे असलेल्या नांगाहार प्रांतातच लपून बसले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
 
काबूल विमानतळावर अमेरिकेचे 5 हजार सैनिक अजूनही तैनात आहेत. अफगाणिस्तानातून बाहेर पडणाऱ्या लोकांना त्यांच्याकडून मदत केली जात आहे.
 
सध्या बीबीसीचे मुख्य आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी लाईस डोसेट हे काबूलमध्ये असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिक येथील काम आता आवरत आहेत. लवकरच काबूल विमानतळाचा ताबाही तालिबानकडे देण्यात येईल, अशी चिन्हे याठिकाणी दिसत आहेत.
 
बायडन म्हणाले होते, 'बदला घेणार'
गुरुवारी काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हल्लेखोरांना सोडणार नसल्याचं म्हणाले होते.
 
या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांना शोधून बदला घेण्यात येईल, असा इशारा जो बायडन यांनी दिला होता.
 
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी संभाव्य हल्ल्यांची शक्यता पाहता काबूलमधील अमेरिकन नागरिकांना नवा इशारा दिला आहे.
 
लोकांनी विमानतळाच्या मुख्य रस्त्यापासून दूर राहावं, अशी सूचना अमेरिकन प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 
तर, दुसरीकडे तालिबान संघटनेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी काबूल विमानतळ आपल्या ताब्यात घेण्यासाठी आपण सज्ज असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर माघारी परतताच विमानतळाचा ताबा तालिबान घेईल, असं त्यांनी सांगितलं.
 
दरम्यान, आपण अखेरच्या क्षणापर्यंत अफगाण लोकांना देशातून बाहेर काढू, असा विश्वास अमेरिकेने व्यक्त केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती