उद्धव ठाकरे युतीतले ‘लहान भाऊ’ झाल्याबद्दल पहिल्यांदाच म्हणाले...
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019 (11:44 IST)
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याच पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला मुलाखत दिली. युती संदर्भातल्या प्रश्नांना खरोखरच उद्धव ठाकरे समाधानकारक उत्तर देऊ शकले का, याचा घेतलेला हा वेध...
'सामना'चे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीतील पहिला भाग सोमवारी प्रसिद्ध झाला. युतीचे जागावाटप, आत्तापर्यंत युतीच्या जागावाटपात मिळालेल्या निचांकी जागा, मुख्यमंत्रिपद इत्यादी विषयांवरील प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिली आहेत.
लोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या चर्चेदरम्यान विधानसभेला शिवसेना आणि भाजप निम्म्या निम्म्या जागा लढवतील असं सांगितलं गेलं होतं. पण विधानसभेसाठी प्रत्यक्ष जागावाटप होताना जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला 124 जागा आल्या आहेत. तर भाजपकडे 164 जागा गेल्या असून त्यातून मित्र पक्षांना काही जागा दिलेल्या आहेत. यावर उद्धव ठाकरेंना विचारले गेले की 124 जागांवर आपण तडजोड केली आहे. यावर उत्तर देताना उद्धव सांगतात की, मी तडजोड केली नाही. भाजपकडून देवेंद्रजी आणि चंद्रकांतदादा सांगत होते की आमची अचडण उद्धवजींनी समजून घ्यावी. ती अडचण आम्ही समजून घेतली.
पुढे संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना म्हटलंय की शिवसेनेच्या इतिहासात हा सगळ्यांत कमी आकडा आहे. त्यावर उद्धव म्हणतात की हा आकडा सध्या कमी वाटत असला तरी त्याचबरोबरीनं शिवसेनेच्या जास्तीत जास्त आमदारांच्या संख्येची सुरुवात करणारा पहिला आकडा असेल. जास्तीत जास्त आमदार जिंकायला जेव्हा सुरुवात होते, तो हा पहिला टप्पा असेल.
उद्धव ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे सारवासारव?
जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचं विश्लेषण करताना महाराष्ट्र टाइम्सचे सहायक संपादक विजय चोरमारे म्हणतात की, "उद्धव ठाकरेंनी जागावाटपाबाबत केलेलं जे वक्तव्य आहे ती एकप्रकारची सारवासारव आहे. भाजपनं शिवसेनेची फसवणूक केली हे स्पष्ट झालेलं आहे. कारण निम्म्या निम्म्या जागा ठरल्याचा शब्द त्यांनी पाळलेला नाही.
"मित्र पक्षांसाठी म्हणून जागा घेतल्याचं सांगितलं जातंय. पण मित्र पक्षांच्या जागाही भाजप स्वत:च्या चिन्हावर लढवणार असं सध्याचं चित्र आहे. जर भाजपला शिवसेनेला निम्म्या जागा द्यायच्या होत्या तर त्यांनी मित्र पक्षांच्या जागा शिवसेनेच्या चिन्हावर लढवण्यासाठी द्यायला हव्या होत्या. तर भाजपकडून झालेली फसवणूक स्पष्ट दिसत आहे. पण उद्धव ठाकरे फक्त सत्तेसाठी तडजोड करत आले आहेत."
"मागे एकदा उद्धव ठाकरेंनी विधान केले होते की शिवसेना केवळ जनतेसाठी म्हणून अपमान सहन करून सत्तेत राहिली आहे. या अशा विधानांना काय अर्थ आहे? आत्ताही त्यांनी म्हटलंय की युतीसाठी मी तडजोड केली पण ही तडजोड मी महाराष्ट्रासाठी केली. हे विधान अत्यंत पोकळ स्वरूपाचं आहे. आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर केवळ सारवासारव करण्याचा हा प्रयत्न आहे."
शिवसेना सातत्यानं आपण युतीतील मोठा भाऊ असल्याचं सांगत आली आहे. मात्र या निवडणुकीत प्रथमच शिवसेनेला भाजपपेक्षा कमी जागा घेऊन लहान भाऊ म्हणून समाधान मानून घ्यावं लागलं आहे.
निवडणुकीनंतर समसमान वाटप होणार?
शिवसेनेला 124 जागा मिळाल्यामुळे ज्या जागी उमेदवार नाहीत तेथील जे कार्यकर्ते लढण्याची तयारी करत होते त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटतं का, असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांना या मुलाखतीत विचारला गेला. त्यावर त्यांचं म्हणणं आहे की "युतीत कमवताना काही गमवावं लागतं. पण मी सत्तेसाठी हे केलं. सत्ता असेल तर त्या उरलेल्या 164 मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी काही ना काही देऊ शकतो. म्हणून मी युती केली."
जागावाटपाचा फिफ्टी-फिफ्टीचा करार मोडला असं तुम्हाला वाटतं का, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणालेत की, "आम्ही समजूतदारपणा दाखवला आहे. 'ब्लू सी'च्या त्या पत्रकार परिषदेत जबाबदारी आणि अधिकार याचे समसमान वाटप हा अतिशय महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे 24 तारखेला विधानसभेचे निकाल लागतील त्यानंतर पुढच्या आठ-दहा दिवसांत मंत्रिमंडळ स्थापन होईल. तेव्हा समसमान वाटप म्हणजे काय ते लोकांना कळेल."
लोकमतचे उप-मुख्य उपसंपादक योगेश बिडवई सांगतात की, "शिवसैनिक मुख्यमंत्री होईल, असा दावा उद्धव ठाकरे करत आहेत. मात्र भाजप व छोट्या पक्षांकडील उर्वरित 164 जागा पाहता ते या निवडणुकीत शक्य होईल, असे दिसत नाही. उद्धव ठाकरे यांची विधाने परस्परविरोधी आहेत. एकीकडे ते मुख्यमंत्रिपदाची भाषा करतात दुसरीकडे जास्तीत जास्त आमदार जिंकायला सुरुवात होते, तो हा पहिला टप्पा असेल, असे सांगत आहेत. म्हणजे आत्ता कुठे आमदारांची संख्या वाढायला सुरुवात होईल असं ते सांगतायेत. मग मुख्यमंत्रिपद कसे मिळणार?"
"निवडणुकीनंतर समसमान वाटपाबाबत त्यांचे वक्तव्यही प्रत्यक्षात येणे अवघड आहे. मावळत्या सरकारमध्ये भाजपला शिवसेनेच्या पाठिंब्याची नितांत गरज असतानाही शिवसेनेला सत्तेत फिफ्टी-फिफ्टी वाटा मिळू शकलेला नाही. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपातही समसमान वाटप झाले नसल्याचं दिसतंय. या निवडणुकीनंतर जर भाजपनं आणखी जागा जिंकल्या तर भाजप शिवसेनेला सत्तेत समान वाटा देऊ शकेल का याबाबत शंकाच आहे."
उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा हा पहिला भाग होता. दुसऱ्या भागात ते ईडी, आरे, कणकवली मतदारसंघ या विषयांवर बोलणार आहेत.