जुळी मुलंः जगात जुळ्यांची संख्या का वाढली असावी?

शनिवार, 13 मार्च 2021 (17:10 IST)
जगात जुळ्यांची संख्या कधी नव्हे इतकी वाढली आहे. एका अभ्यासानुसार आज घडीला जगात जुळ्यांची संख्या सर्वोच्च आहे.
जगभरात दरवर्षी तब्बल 16 लाख जुळी बाळं जन्मतात. जगात जन्मणाऱ्या प्रत्येक 42 बाळांमागे एक जुळं असतं.
उशिराने गर्भधारणा आणि गर्भधारणेसाठी आयव्हीएफसारख्या वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वाढता वापर, यामुळे 1980 सालापासून जुळी अपत्यं जन्माला येण्याचं प्रमाण वाढलं आहे.
मात्र, यापुढे ही संख्या कमी होईल, असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे एकावेळी एकच अपत्य जन्माला यावं, असं वाटणाऱ्यांची आणि तसे प्रयत्न करणाऱ्या जोडप्याची संख्या वाढतेय.
'Human Reproduction' या नियतकालीत यासंबंधी एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या 30 वर्षात सर्वच प्रदेशांमध्ये जुळ्यांचा जन्मदर वाढला आहे. आशियात जुळ्यांचा जन्मदर 32 टक्क्यांनी वाढला तर उत्तर अमेरिकेत जुळे जन्माला येण्याचं प्रमाण तब्बल 71 टक्क्यांनी वाढलं आहे.
या अभ्यासासाठी संशोधकांनी 2010 ते 2015 या काळात 165 देशातल्या जुळ्यांच्या प्रमाणाची माहिती मिळवली आणि 1980 ते 1985 काळातल्या प्रमाणाशी त्याची तुलना केली.
दर एक हजार बाळंतपणात जुळी बाळं जन्माला येण्याचं सर्वाधिक प्रमाण युरोप आणि उत्तर अमेरिकेत आहे. जगभरातलं हे प्रमाण दर एक हजार बाळंतपणात 9 वरून 12 वर आलं आहे.
मात्र, आफ्रिकेत हे प्रमाण पूर्वीपासूनच अधिक आहे आणि गेल्या 30 वर्षात त्यात फारसा फरकही पडलेला नाही. लोकसंख्या वाढ हे त्यामागचं एक कारण असू शकतं.
मदतीचा हात
आजमितीला जगभरात जन्मणाऱ्या जुळ्यांपैकी 80% जुळी बालकं आफ्रिका आणि आशिया खंडात जन्माला येतात.
यामागे कारणही आहे, असं यासंबंधीचा अभ्यास करणारे ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्रा. क्रिस्टियन मॉन्डेन म्हणतात.
ते सांगतात, "अफ्रिकेत द्विबीज जुळे (Dizygotic twins) जन्मण्याचं प्रमाण जास्त असल्याने तिथे जुळ्यांचा जन्मदर इतका जास्त आहे. दोन स्त्रिबीज दोन शुक्राणुंनी एकाचवेळी फलित होतात, त्याला द्विबीज जुळे म्हणतात."
ते पुढे म्हणतात, "अफ्रिकन लोक आणि इतर यांच्यात असलेल्या अनुवांशिक फरकामुळे होत असावं."
दुसरीकडे युरोप, उत्तर अमेरिका आणि ओशियानिक देशांमध्ये (प्रशांत महासागर आणि आसपासचा भूभाग) जुळी अपत्य जन्माला येण्याचं प्रमाण वाढतंय. 1970 सालापासून गर्भधारणेसाठी IVF, ICSI, कृत्रिम गर्भधारणा, ओव्हेरियन स्टिम्युलेशन यासारख्या प्रगत वैद्यक तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय. हेदेखील जुळ्यांचं प्रमाण वाढण्यामागचं एक मुख्य कारण आहे.
या सर्व तंत्रज्ञानामुळे एकावेळी एकापेक्षा जास्त अपत्य जन्मण्याची शक्यता वाढते.
ज्या स्त्रियांना थोडी उशिराने गर्भधारणा हवी असते, गर्भनिरोधाच्या साधनांचा वाढता वापर आणि एकंदरितच प्रजननाची क्षमता कमी होणं, या सर्वांचीही यात भूमिका असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
मात्र, प्रा. मॉन्डेन सांगातत, हल्ली स्त्रिया एकाच अपत्यासाठी आग्रही दिसतात. यात धोकाही कमी असतो.
ते म्हणतात, "हे महत्त्वाचं आहे. कारण जुळ्या मुलांमध्ये बाल्यावस्थेत होणारा मृत्यूदर अधिक आहे. शिवाय, जुळं असल्यास गर्भावस्था, बाळांतपण आणि त्यानंतरही माता आणि बाळांमध्ये वैद्यकीय गुंतागुंत अधिक असते."
जुळ्या मुलांच्यावेळचं बाळंतपणही गुंतागुंतीचं असतं. बरेचदा प्रिमॅच्युअर डिलिव्हरी होते, जन्माच्या वेळी बाळांचं वजनही कमी असतं आणि अशा प्रेगनंसीजमध्ये 'स्टिल बर्थ'चं प्रमाणही अधिक असतं. स्टिल बर्थ म्हणजे मृत बाळ जन्माला येणे.

जगण्याची शक्यता
अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये जुळ्या बाळांचा जन्म अधिक काळजीचा विषय असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
आफ्रिकेत तर परिस्थिती अधिक चिंतेत टाकणारी आहे. तिथे जुळ्यांपैकी एक बाळ एक वर्ष पूर्ण होण्याआधीच दगावण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. दरवर्षी जवळपास 2 लाख बाळं तिथे दगावतात.
हा अभ्यास करणारे प्रा. जेरोएन स्मिट्स सांगतात, "श्रीमंत पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये जुळ्यांचा जन्मदर उप-सहारा आफ्रिकेच्या जन्मदराजवळ येतोय. मात्र, त्यांच्या जगण्याच्या शक्यतेमध्ये बरीच तफावत आहे."
भविष्यात जुळ्यांच्या जन्मदरामध्ये भारत आणि चीन महत्त्वाची भूमिका बजावतील, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
कमी होणारी प्रजनन क्षमता, उशिराने होणारी गर्भधारणा आणि IVF सारखं तंत्रज्ञान या सर्वांचा येणाऱ्या काळात जुळ्यांच्या संख्येवर नक्कीच परिणाम होईल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती