इंडोनेशियाची नवी राजधानी: या पाच देशांवरही आली होती राजधानी हलवण्याची वेळ
सोमवार, 2 सप्टेंबर 2019 (11:44 IST)
इंडोनेशियाला लवकरच नवीन राजधानी मिळण्याची शक्यता आहे. जकार्ता हे इंडोनेशियाच्या सध्याच्या राजधानीचं शहर आहे. मात्र, तिथलं सरकार राजधानी जकार्ताहून बोर्नेओ बेटावरच्या शहरात हलवण्याचा विचार करतंय.
राजधानीचं नेमकं स्थळ आणि राजधानी किती दिवसात हलवणार हे अजून निश्चित झालेलं नाही. मात्र, राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी यासंबंधीचा प्रस्ताव 16 ऑगस्ट रोजी तिथल्या कायदे मंडळात मांडला.
राजधानी हलवण्याचं कारण समजून घ्यायला फारसं अवघड नाहीये. सध्याची राजधानी जकार्ता ही दरवर्षी 1 ते 15 सेंटीमीटर या वेगाने समुद्राखाली जात आहे. आजघडीला या शहराची जवळपास निम्मी जमीन समुद्राखाली गेली आहे. जावा समुद्रकिनारी वसलेल्या जकार्ताची जमीन मऊ आहे. शिवाय या शहरातून 13 नद्या वाहतात.
शहरात वाहतूक कोंडीची समस्यादेखील मोठी आहे. या मेगासिटीमध्ये जगातलं सर्वात वाईट ट्रॅफिक असल्याचं 2016 साली केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आलं होतं. मंत्र्यांना बैठकांसाठी वेळेत पोचता यावं, यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते, अशी तिथली परिस्थिती आहे.
बोर्नेओ बेटाचा इंडोनेशियातला भाग कालिमंतन नावानं ओळखला जातो. याच ठिकाणी नवी राजधानी उभारली जाण्याची शक्यता आहे. राजधानी बदलण्यासाठी जवळपास 33 अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. शिवाय नव्या शहरात 9 ते 15 लाख लोकांसाठी घरं बांधण्यासाठी 30 ते 40 हजार हेक्टर जमिनीची गरज पडेल.
मध्यवर्ती कालिमंतनमधलं पलंगकराया हे शहर नव्या राजधानीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. भौगोलिकदृष्ट्या हे शहर इंडोनेशियन द्विपसमुहाच्या जवळ आहे. शिवाय, इंडोनेशियाचे जनक सुकार्नो यांनीदेखील राजधानीसाठी या शहराचं नाव सुचवलं होतं.
मात्र, आपलं सत्ताकेंद्र दुसऱ्या शहरात स्थलांतरित करणारं इंडोनेशिया पहिलं राष्ट्र नाही. यापूर्वीही काही देशांनी आपली राजधानी दुसरीकडे हलवली आहे.
1. कझाकिस्तान
1997 साली राष्ट्राध्यक्ष नूरसुलतान नझरबायेव्ह यांनी कझाकिस्तानची राजधानी बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कझाकिस्तानची राजधानी 'अलमॅटी'वरून 1200 किमी. उत्तरेला असलेल्या शहरात हलवली. त्या शहराचं नाव होतं 'अकमोला', म्हणजे पांढरी कबर. त्यांनी सर्वप्रथम या शहराचं नाव बदललं आणि नवीन नाव ठेवलं 'अस्ताना'.
यानंतर नव्या राजधानीच्या उभारणीसाठी त्यांनी जगभरातून वास्तूरचनाकारांना बोलावले. नव्या राजधानीतलं सर्वात प्रमुख आकर्षण आहे 'खान शटीर'. हा जगातला सर्वात मोठा तंबू आहे. नॉर्मन फॉस्टर यांनी हा तंबू डिझाईन केला आहे. या तंबूत शॉपिंग मॉल आणि एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्स आहे.
या शहरातलं आणखी एक आकर्षण म्हणजे बेटॅरेक टॉवर. हे बेटॅरेक टॉवर झाडावर ठेवलेल्या अंड्यासारखं दिसतं. टॉवरमध्ये वेगवेगळे डेक आहेत. डेकवरून शहरातल्या नवनवीन वास्तूंचं दर्शन घडतं. यातली सर्वांत सुंदर वास्तू म्हणजे राष्ट्रपती भवन. पांढऱ्या रंगाच्या या भव्य महालावर असलेला आकाशी निळ्या रंगाचा घुमट बघणाऱ्याचं लक्ष सहज वेधतो.
हे राष्ट्राध्यक्षांचं घरच नाही तर त्यांचं कार्यालयदेखील आहे आणि राष्ट्राध्यक्षांचा सर्व कर्मचारी वर्गही याच वास्तूत राहतो. राष्ट्राध्यक्षांच्या महालाच्या शेजारी आहे सेंट्रल कॉन्सर्ट हॉल. दूरून बघताना हिरवी छटा असलेल्या निळ्या रंगाचा हा हॉल उघडत असलेल्या अंतराळयानासारखा दिसतो.
कझाकिस्तानला लाभलेल्या तेलाच्या नैसर्गिक देणगीमुळे इतकी भव्य राजधानी उभारणं शक्य झालं आहे. तेल उद्योगामुळेच कझाकिस्तानची अर्थव्यवस्था 2018 साली 4.8 टक्क्यांनी वाढली. 2018 साली नूरसुलतान नझरबायेव्ह राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार झाले. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या शहराला त्यांचं नाव देण्यात आलं.
त्यामुळे कझाकिस्तानच्या राजधानीला आज नूर-सुलतान म्हणून ओळखलं जातं. मंगोलियातल्या उलानबातर शहरानंतर जगातली सर्वात थंड राजधानी म्हणून नूर-सुलतान ओळखलं जातं.
2. म्यानमार
म्यानमारची पूर्वीची राजधानी होती यांगून. मात्र, 2005 साली यांगूनपासून 370 किलोमीटर दूर असलेल्या नाय पी ताव या शहरात राजधानी हलवण्यात आली. या शहराचं क्षेत्रफळ लंडनच्या चौपट आहे. मात्र, लोकसंख्या फारच कमी आहे.
म्यानमारने आपली राजधानी का बदलली याचं स्पष्ट कारण कधीच कळलं नाही.
म्यानमारच्या माहिती प्रसारण मंत्र्यांनी बीबीसीच्या प्रतिनिधीला हे ठिकाण सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं असल्याचं त्यावेळी सांगितलं होतं. जाणकारांना मात्र तसं वाटत नाही. सैन्याला परकीय आक्रमणाच्या भीतीमुळे किंवा सीमा भागातल्या अल्पसंख्याक लोकांवर अधिकाधिक नियंत्रण मिळवता यावं, यासाठी राजधानी बदलल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
म्यानमारच्या वसाहतपूर्व काळात राजे-महाराजे भविष्यवेत्त्यांच्या सांगण्यावरून सतत नवनवीन शहर आणि महाल उभारायचे. तशातलाच हा प्रकार असल्याचंही काहींना वाटतं.
योजनाबद्ध राजधानीतली सगळी वैशिष्ट्यं या नव्या राजधानीत आहेत. संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा मार्ग 20 लेनचा आहे. मात्र, या रस्त्यावर रहदारी अत्यंत तुरळक असते. शहरात भरपूर चकचकीत शॉपिंग मॉल आणि लक्झरी हॉटेल्स आहेत. मात्र, हॉटेल्स सहसा रिकामीच असतात.
याशिवाय, सफारी पार्क, प्राणीसंग्रहालय आणि तीन स्टेडिअम्सही आहेत. म्यानमारच्या इतर भागात नसेल मात्र, नव्या राजधानीत चोवीस तास वीज पुरवठा असतो.
3. बोलिव्हिया
बोलिव्हिया हा दोन राजधानी असलेला देश आहे. एक आहे सुक्रे आणि दुसरी ला पाझ. 1899 पर्यंत केवळ सुक्रे ही बोलिव्हियाची एकमेव राजधानी होती. मात्र, नागरी युद्धानंतर या देशाला ला पाझ ही दुसरी राजधानीही मिळाली. ला पाझ हे बोलिव्हियातलं सर्वात मोठं शहर आहे.
युद्धानंतर संसद आणि प्रशासन ला पाझला हलवण्यात आलं. न्यायपालिका मात्र सुक्रेमध्येच ठेवण्यात आली. 1825 साली बोलिव्हिया राष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळी या देशाच्या मध्य भागात असलेल्या सुक्रे शहराला राजधानीचा मान मिळाला. या शहराची लोकसंख्या केवळ अडीच लाख इतकी आहे. तर ला पाझची लोकसंख्या आहे 17 लाख.
2007 साली संसद आणि सरकार पुन्हा सुक्रेला हलवण्यचा प्रस्ताव मांडण्य़ात आला. मात्र या प्रस्तावाला कडाडून विरोध झाला.
बोलिव्हियातील गरीब प्रदेश असणाऱ्या पश्चिम भागातले राष्ट्राध्यक्ष इव्हो मोरॅलिस यांचे समर्थक आणि अधिक समृद्ध अशा पूर्व भागात राहणारे त्यांचे विरोधक यांच्यातल्या संघर्षामुळे या कल्पनेचा जन्म झाला.
अखेर राजधानी पुन्हा सुक्रेला हलवण्याचा प्रस्ताव बारगळला. त्यामुळे आज या देशाला दोन राजधान्या आहेत.
4. नायजेरिया
1991 पर्यंत नायजेरियातलं सर्वात मोठं शहर असलेलं लागोस हे राजधानीचं शहर होतं. मात्र ही राजधानी अबुजाला हलवण्यामागे अनेक कारणं होती. पहिलं कारण म्हणजे अबुजा नायजेरियाच्या मध्य भागात आहे. पूर्वीची राजधानी असलेलं लागोस शहर किनारपट्टीला लागून होतं.
नायजेरियातल्या ईशान्येकडच्या मायदुगिरी शहरातून लागोसला जाण्यासाठी 1600 किमीचं अंतर पार करावं लागायचं. त्यासाठी तब्बल दोन दिवस लागायचे. त्या तुलनेने मध्य भागात असलेलं अबुजा जवळ आहे.
याशिवाय, लागोस खूप गजबजलेलं शहर होतं.
अबुजा राजकीय आणि वांशिकदृष्ट्या बरंच तटस्थ आहे. लागोस शहरात योरुबा वंशाच्या लोकांचं वर्चस्व होतं. तर नायजेरियाच्या आग्नेय आणि वायव्य भागात प्रामुख्याने इग्बोस वंशीय राहतात. नायजेरियात वंशवाद छोटा मुद्दा नाही. इग्बोज वंशियांनी नायजेरियातून बाहेर पडून स्वतंत्र राष्ट्र स्थापनेचा प्रयत्न केला. त्यामुळे 1967 ते 1970 या काळात नायजेरियात युद्ध पेटलं होतं.
लागोस हे पुरातन शहर आहे. तर अबुजा नियोजनपूर्वक उभारण्यात आलेलं नवं शहर आहे. लागोसमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी असते. अबुजामधले रस्ते मात्र मोठे आहेत.
लागोसमध्ये सर्वोच्च न्यायालय, नॅशनल असेंम्ब्ली आणि राष्ट्रपती भवनासोबत तीन राष्ट्रीय सांस्कृतिक संस्था आहेत. मात्र, अनधिकृतपणे अनेक फेडरल एजन्सी अजून लागोसमधून कार्यरत असल्याचं बोललं जातं.
5. पोर्तुगाल
पोर्तुगालची राजधानी आता लिस्बन नाही तर रिओ डी जानेरियो आहे. या मागचं कारण आहे नेपोलियन. पेनिन्सुला युद्धादरम्यान (1807-14) फ्रेंच राज्यकर्त्यांनी पोर्तुगालवर तीनहून जास्तवेळा आक्रमण केलं.
डिसेंबर 1807 ला आक्रमण होण्याच्या काही दिवस आधी ब्रागान्झा राजघराणं आणि दरबार पोर्तुगाल सोडून त्यावेळी पोर्तुगाल वसाहत असलेल्या ब्राझीलला रवाना झाले आणि 1808 च्या मार्च महिन्यात ते रिओला पोहोचले.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रिओ एक समृद्ध शहर होतं. तिथे सोनं होतं, हिरे होते, साखर होती. शिवाय, गुलामही मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. लोकसंख्येच्या एक तृतीयांश जनता गुलामच होती.
प्रिन्स रिजेंट डॉम जोआवो सहावे यांनी पोर्तुगाल, ब्राझील आणि अल्गार्वस यांचा मिळून युनायटेड किंगडमची स्थापना केली. या कृतीमुळे केवळ एक वसाहत असलेला ब्राझील पोर्तुगालच्या पातळीवर आला. ब्राझिलला प्रशासकीय स्वातंत्र्यही देण्यात आलं. 1861 साली महाराणीच्या निधनानंतर प्रिन्स रिजेंट युनायटेड किंग्डमचे राजे झाले.
1821 साली पोर्तुगीज न्यायालय पुन्हा लिस्बनला हलवण्यात आलं. राजेशाहीचा अस्त होईपर्यंत म्हणजे 1910 पर्यंत न्यायालय लिस्बनमध्येच होतं.