पद्मसिंह पाटील ज्या प्रकरणात आरोपी आहेत ते पवनराजे निंबाळकर खूनप्रकरण नेमकं काय आहे?

सोमवार, 2 सप्टेंबर 2019 (11:30 IST)
हर्षल आकुडे
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांचा मुलगा आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं शनिवारी (31 ऑगस्ट) जाहीर केलं.
 
उस्मानाबादचे खासदार राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांच्यावर चुलतबंधू पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाची चर्चा राज्यभरात होत आहे. हे प्रकरण काय आहे याबाबत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू.
 
2004 च्या विधानसभा निवडणुका सुरू होत्या. राज्याचं सगळं लक्ष उस्मानाबाद मतदारसंघाकडे लागलेलं होतं. आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांच्याविरुद्ध त्यांचेच चुलत बंधू पवनराजे निंबाळकर उभे राहिले होते. पद्मसिंह राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तर पवनराजे शिवसेनेच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे होते. पवनराजे निंबाळकर यांनी पहिल्यांदाच पाटील यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं. एका मंत्र्यासमोर त्याचा भाऊच उभा होता.
 
राजकीय कुरघोडी
पवनराजे आणि पद्मसिंह यांच्यातल्या राजकीय कुरघोडीचा एक किस्सा ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव सांगतात, "तेरणा साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर पद्मसिंह आणि पवनराजे या दोघांमध्ये प्रचंड वैर निर्माण झालं होतं. राजकीय लढाईने त्यांच्यातील वितुष्टाने टोक गाठलं. या लढाईत कोण जिंकतं हे पाहण्याची उत्सुकता होती. मतदानाचा दिवस उजाडला. असं सांगितलं जातं की, उस्मानाबाद मतदारसंघातील प्रत्येक घरात एका दैनिकाचा अंक येऊन पडला. यामध्ये ठळक अक्षरात एक बातमी होती. 'डॉ. पद्मसिंह पाटील यांना पवनराजे निंबाळकरांचा पाठिंबा?"
 
"या बातमीमध्ये प्रश्नचिन्ह होतं पण या बातमीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. डॉ. पाटील तेव्हा तेर इथं मतदान करण्यासाठी गेले होते. त्यांना पत्रकारांनी गाठलं. तेव्हा असं काहीच नसल्याचं पाटलांनी स्पष्ट केलं. निंबाळकर यांचे कार्यकर्तेही मतदारांमधला संभ्रम दूर करण्यासाठी दिसेल त्या बसवर, रिक्षांच्या काचांवर याचा खुलासा करणारे संदेश लिहू लागले. 'पवनराजेंनी पद्मसिंह पाटलांना पाठिंबा दिलेला नाही. रेल्वे इंजिन चिन्हालाच मत द्या!"
 
या बातमीची चर्चा अनेक दिवस रंगली होती असं जाधव सांगतात.
 
मंत्रिपद गमावलं
अर्थातच निवडणूक रंगतदार झाली. याआधी सलग सहावेळा उस्मानाबाद मतदारसंघावर वर्चस्व राखून असलेल्या पद्मसिंह पाटलांनीच यावेळी विजय मिळवला. पण त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहिला तर हा विजय त्यांच्या राजकीय इतिहासाला साजेसा नव्हता. या निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील केवळ अल्पमतांनी विजयी झाले.
 
"2004च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. यावेळीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचंच सरकार राज्यात बनलं. पण यावेळी पद्मसिंह पाटलांना मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळे पद्मसिंह अत्यंत अस्वस्थ होते. दुसरीकडे पवनराजे यांच्याकडून पद्मसिंहांच्या सत्तेला आव्हान वाढतच होतं. एकेकाळी त्यांच्यासाठी काम करणारी व्यक्ती आपल्याविरोधात कारवाया करत असल्यामुळे ते चिंताग्रस्त होते," असं आशिष जाधव सांगतात.
 
यादरम्यान, पवनराजे यांची 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पवनराजे मोटारीतून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात पवनराजे आणि त्यांचे वाहनचालक या दोघांचाही मृत्यू झाला. यात सीबीआयने त्यांना 2009 मध्ये अटक केली होती.
 
2009 पासून जामिनावर
या प्रकरणानंतर स्वाभाविकपणे संशयाची सुई पद्मसिंह पाटील यांच्यावर होती. सुरुवातीला महाराष्ट्र पोलिसांकडे हे प्रकरण होतं. पण निंबाळकर कुटुंबीयांनी हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी लावून धरली. दोन वर्षांनंतर तपासाची सूत्रे सीबीआयकडे देण्यात आली.
 
सीबीआयच्या आरोपपत्रात पवनराजेंचा आपल्या राजकीय भवितव्याला धोका असल्याचं पद्मसिंह पाटील यांना वाटत होतं. म्हणून त्यांनीच पवनराजेंच्या खूनाचा कट रचला. यासाठी त्यांनी तीस लाखांची सुपारी दिली, असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. पद्मसिंहांनी हे आरोप फेटाळले आहेत.
 
पुढे नोव्हेंबर 2009 मध्येच या प्रकरणात डॉ. पाटील यांना जामीन मिळाला. तेव्हापासून ते जामिनावरच बाहेर आहेत.
 
सध्या या प्रकरणाची सुनावणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुरू आहे.
 
पवनराजे हत्याकांडाचा खुलासा करणारा पारसमल जैन याने पवनराजे यांच्या हत्येबरोबरच समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची 30 लाख रुपयांची सुपारी डॉ. पद्मसिंह पाटलांनी दिली होती असा गौप्यस्फोट जैन यांनी केला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती.
 
या खुलाशानंतर अण्णा हजारेंनी पद्मसिंह पाटलांविरुद्ध तक्रार दाखल केली. मला मारण्याचा कट पाटलांनी रचला होता असं त्यांनी तक्रारीत म्हटलं. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे.
 
सत्तेची महत्त्वाकांक्षा
ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव सांगतात, "डॉ. पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे सहकारी. विशेषतः भुजबळ शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पवारांनी पद्मसिंह पाटलांकडे दिली होती. पद्मसिंह म्हणजे दबंग व्यक्तिमत्व. त्यांना पैलवान म्हणून ओळखलं जायचं. त्यांची उस्मानाबादमध्ये जरब होता. पण त्यामुळे त्यांनी कुठले अवैध धंदे-दारू अड्डे वगैरे काहीही सुरू केले नाहीत."
 
ते पुढे सांगतात, "आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयाची जबाबदारी होती. जबाबदारी आल्यानंतर डॉक्टरांच्या कामाचा व्याप वाढला. त्यापेक्षाही ते मुंबईत जास्त रमले."
 
"पवारांनीही त्यांना आधीपासून जवळीकता दिली. पण मंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांचा मतदारसंघातील संपर्क थोडाफार कमी झाला. तिथली जबाबदारी त्यांनी पवनराजे यांच्याकडे दिली. त्यामुळे एखाद्याच्या लग्नाला, कार्यक्रमाला किंवा अंत्ययात्रेला पवनराजे पद्मसिंह पाटलांचे प्रतिनिधी म्हणून जाऊ लागले. त्यामुळे तिथं पवनराजेंचं प्रस्थ वाढू लागलं.
 
"यादरम्यान घोटाळ्याच्या बातम्या बाहेर आल्या. नवाब मलिक, सुरेश जैन आणि पद्मसिंह पाटलांविरोधात अण्णा हजारे यांनी मोर्चा उघडला. त्यानंतर पवनराजे हे विधानसभेला पद्मसिंहांच्या विरोधात उभे राहिले. त्यात पद्मसिंहांचा विजय झाला मात्र आपण पवनराजेंवर इतका विश्वास ठेवला, त्यांनी आपल्याला धोका दिला, अशी त्यांची धारणा बनली. पद्मसिंह पाटील पवनराजेंवर प्रचंड नाराज होते, हे खरं आहे. पवनराजेच अण्णा हजारेंना टीप देतात. बातम्या लीक करतात. त्यांच्यामुळेच आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका होऊ शकतो अशी भीती त्यांच्या मनात होती," असं आशिष जाधव सांगतात.
 
उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील सांगतात. "पद्मसिंहांचा पवनराजेंवर प्रचंड विश्वास होता. ते कारखान्याचे अध्यक्ष असताना त्यांनी संपूर्ण कारभार पवनराजेंकडे सोपवला होता. राजकीय महत्वाकांक्षेमुळे दोन्ही नेत्यांमध्ये वितुष्ट आलं. ते इतकं टोकाला गेलं की दोन्ही नेते एकमेकांना पाण्यात पाहू लागले. आपल्या जवळचा माणूस अशा प्रकारे दूर गेल्यांतर कोणत्याही व्यक्तीला त्याची खंत वाटणं सहाजिकच आहे."
 
ते पुढे सांगतात, "पवनराजे यांचा खून झाल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. मागच्या 14 वर्षांत उस्मानाबादचं राजकारण पूर्णपणे बदललं आहे. तेरणा साखर कारखानाही आता बंद पडला आहे. पवनराजे यांचे चिरंजीव ओमराजे यांनीही विधानसभेत राणा जगजितसिंह आणि 2019च्या लोकसभेत पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती