महाराष्ट्र सत्तास्थापनेचा तिढा: शिवसेनेची नेमकी रणनीती काय?
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019 (11:56 IST)
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागून एक आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटला असला तरी राज्यात सत्तास्थापनेची अजून काहीच चिन्हं दिसच नाहीत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या काळामध्ये भाजपला चिमटे काढण्याची एकही संधी सोडलेली नाही.
'सामना'तील बातम्या असोत किंवा पत्रकारांना दिलेल्या मुलाखती, या सर्वांमध्ये त्यांनी समान सत्तावाटपासाठी आग्रही भूमिका लावून धरली आहे. ते अनेकदा तर अशी सततची टीका करत आहेत, जशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपवर केलेली नाही.
भाजप आणि सेना यांच्यात चर्चा होण्याच्या काळात संजय राऊत यांनी अशी टोकाची भूमिका घेणं आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांनी मात्र याबाबत फारशी वक्तव्यं न करणं, हे पाहता शिवसेना नक्की कोणती रणनीती वापरत आहे, हा प्रश्न पडतोच.
24 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या निकालात महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या मतदारांनी सत्ताधारी भाजपाला स्पष्ट कौल दिला नाही. महाराष्ट्रापेक्षा हरियाणाची स्थिती अधिक अस्पष्ट असूनही भाजपानं तिथं दुष्यंत चौटालांच्या जेजेपी पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केलं आणि तिथं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शपथही घेतली.
परंतु महाराष्ट्रात निवडणूकपूर्व युती असूनही भाजप-सेना यांनी सरकार स्थापन केलेलं नाही. इतकंच नाही तर मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दलही साशंकता निर्माण झाली आहे.
समान वाटपाची चर्चा आणि संजय राऊत यांची वक्तव्यं
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पार्टीला गेल्या निवडणुकीपेक्षा 17 जागा कमी मिळाल्याचं स्पष्ट झालं. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या जागाही कमी झाल्या आहेत. परंतु भाजपची ताकद कमी झाल्यामुळे शिवसेनेची 'बार्गेनिंग पॉवर' वाढली अशी चर्चा सुरू झाली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वरळीचे नवनिर्वाचित आमदार आणि सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर्स लावायला सुरुवात केली.
तर तिकडे संजय राऊत यांनी समान सत्तावाटपाची भाषा वापरत भाजपवर टीका सुरू केली. निवडणुकांचे निकाल लागल्यावरच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी "महाराष्ट्राची जनता आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी बसलेलं नक्कीच पाहाण्याची इच्छा आहे," असं वक्तव्य केलं. शिवसेना आणि भाजपा यांची किंवा भाजपाची इतर पक्षांशी चर्चा सुरू होण्याआधीही राऊत यांनी अशी वक्तव्यं सुरू केली होती.
त्यानंतर हातात कमळ घेतलेल्या वाघाचं एक व्यंगचित्र ट्वीट करून त्यांनी आता 'भाजपला आमच्याशिवाय पर्याय नाही', असं सूचित केलं. 2014 साली भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालेल्या पाठिंब्यानंतर सरकार स्थापन केलं होतं. आता मात्र तसं करता येणार नाही, 'आमच्याशिवाय पर्याय नाही' याचे संजय राऊत आता स्पष्ट संकेत देऊ लागले.
अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना निवडणुकीच्या आधीच युतीमध्ये होते. 'आम्हाला सत्तेची हाव नाही परंतु युतीच्या दिलेला शब्द आता पाळायला हवा, युतीचा धर्म पाळला पाहिजे,' असंही संजय राऊत निकालांनंतर म्हणाले.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच-अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरवला नव्हता, असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
यावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपद आणि जबाबदारी याच्या समान वाटपाबद्दल बोलत असलेल्या पत्रकार परिषदेचा व्हीडिओ दाखवूनच उत्तर देऊ लागले. "सत्ता, पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल, असं मुख्यमंत्री स्वतः सांगत आहेत. या शब्दांचा डिक्शनरीतला अर्थ बदललेला नाही," असंही ते म्हणाले.
"भाजप आणि मुख्यमंत्री यांच्याबाबतीत एकदम टीकेची भूमिका स्वीकारल्याचं दिसून येतं. महाराष्ट्राची कुंडली आम्ही बनवणार. कुंडलीत कोणता ग्रह कोठे ठेवायचा आणि कोणते तारे जमिनीवर आणायचे, कोणत्या ताऱ्याला चमकवायचं याची ताकद आजही शिवसेनेकडे आहे," असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं.
'शिवसेनेनं ठरवलं तर आपल्या ताकदीवर सरकार बनवेल'
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपविरोधात प्रखर टीका करण्याबरोबरच शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मधूनही भाजपविरोधात थेट भाष्य करायला सुरुवात केली. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली.
शुक्रवारी सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत राऊत यांचं वक्तव्य प्रसिद्ध झालं आहे. त्यात ते म्हणाले, "जर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असेल की राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. आम्ही कुणाला भेटलो, यामध्ये तुम्ही जाऊ नका. शिवसेनेनं ठरवलं तर दोन तृतीयांश संख्याबळाने आम्ही सरकार स्थापन करू शकू. म्हणून ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्याची हिंमत करू नये, मोठी फजिती होईल," असा खणखणीत इशारासुद्धा राऊत यांनी दिला आहे.
ट्विटरवर टीका
संजय राऊत यांनी भाजपाला चिमटे काढण्यासाठी ट्विटरचा आधार घेतल्याचं दिसतं. शुक्रवारी सकाळीच त्यांनी एका शायरीद्वारे भाजपावर शरसंधान केलं आहे.
साहिब... मत पालिए अहंकार को इतना,
वक़्त के सागर में कईं सिकन्दर डूब गए..!
'सेनेला गेल्या 5 वर्षांचा वचपा काढायचा असेल'
शिवसेना सध्या घेत असलेल्या भूमिकेबद्दल 'द ठाकरे कझिन्स' पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीकडे मत व्यक्त केलं. ते म्हणाले, "शिवसेनेच्या मनात 1995ची मोठ्या भावाची कल्पना आजही असावी. त्यावेळेस सेनेने भाजपला गृह, वित्त अशी खाती दिली होती. आता त्यांना ती भाजपकडून हवी असावीत. तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने सरकारमध्ये राहून शिवसेनेला दिलेल्या वागणुकीचा वचपा सेनेला काढायचा असेल."
शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन करण्याची कितपत शक्यता आहे, यावर धवल कुलकर्णी म्हणाले, "या निवडणुकीत 124 मतदारसंघांपैकी शिवसेनेची 57 मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात थेट लढत होती. तसेच 2008मध्येही या दोन पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तो प्रयत्न तिथेच बारगळला होता. ती कारणं आजही कायम आहेत.
"काँग्रेसबरोबर शिवसेना गेल्यास सेनेला अयोध्येचं तिकीट कायमचं सोडून द्यावं लागेल. तसेच काँग्रेसलाही बहुसंख्याकांचं राजकारण केल्याचा MIMसारख्या पक्षांचा आरोप सहन करावा लागेल," असं कुलकर्णी सांगतात.
अपक्षांना गोळा करण्याचा प्रयत्न
निकाल लागल्यावर पत्रकारांशी बोलताना पहिल्याच दिवशी 15 अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. वरपांगी हे वक्तव्य विरोधकांसाठी असलं तरी हा इशारा शिवसेनेसाठीही होता, असं मत जाणकारांनी व्यक्त केलं होतं.
निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेनं एकमेकांमध्ये युती आणि सरकार स्थापनेच्या चर्चेला वेळ देण्याऐवजी अपक्षांचा पाठिंबा मिळविण्याची धडपड केल्याचं दिसून येतं. शिवसेनेनंही एकेक अपक्षाच्या मनगटावर 'शिवबंधन' बांधत आपली संख्या वाढत असल्याचं भाजपाला दाखवलं आहे.
निकाल जाहीर होताच नेवासा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, भंडाऱ्याचे नरेंद्र भोंडेकर, रामटेकचे आशिष जयस्वाल, मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील, अचलपूरचे बच्चू कडू, मेळघाटचे राजकुमार पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
'शिवसेनेला जास्त मंत्रिपदं हवी असावीत'
शिवसेनेला आताच्या सरकारमध्ये जास्त मंत्रिपदं हवी असावीत, असं मत 'मिडडे'चे सिटी एडिटर संजीव शिवडेकर यांनी व्यक्त केलं आहे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "भारतीय जनता पार्टी शिवसेनेला सार्वजनिक बांधकाम मंत्रालय, उद्योग, ऊर्जा अशी खाती देऊ करेल. परंतु शिवसेनेला आता अर्थ, गृहसारखी खाती हवी असावीत. 1995 साली युतीच्या सरकारमध्ये ही खाती भाजपाला मिळाली होती. अर्थात कोणतं खातं मिळतं, यापेक्षा यावेळेस सेनेचा भर किती खाती मिळतील, यावर असावा. भाजपनं सेनेला 13 खाती देऊ केली, अशा बातम्या आल्या होत्या. पण सेना तो आकडा 18 ते 20 पर्यंत खेचण्याचा प्रयत्न करेल."
मात्र युतीचा तिढा न सुटल्यास काय, असं विचारल्यावर शिवडेकर सांगतात की शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर कधीच जाणार नाही असं सांगता येणार नाही कारण राजकारणात अस्पृश्य कोणीच नसतं. "मुरली देवरा यांना महापौरपदी बसवताना शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. सुप्रिया सुळे यांच्या पहिल्या निवडणुकीतही सेनेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे अस्पृश्य असं कुणीच नसतं. शिवसेना बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी हे करत असावी."
शिवसेना कितपत ताणणार?
आताची परिस्थिती शिवसेना किती ताणणार, असं विचारलं असता शिवसेना फार टोकाला जाणार नाही, असं मत शिवडेकर यांनी व्यक्त केलं. ते म्हणतात, "अल्पमतातल्या सरकारसमोरील अडथळे कर्नाटकातील उदाहरणामुळे शिवसेनेला माहिती आहेत. शिवसेनेकडे प्रशासनाचा जास्त अनुभव असणारे नेते नाहीत. तसेच पदांच्या वाटपावरून शिवसेनेत नाराजी होऊ शकते. शिवसेनेला मुंबई पालिकेत भाजपाची गरज लागणारच. तसेच 22 तारखेला महापौरांचीही निवड होणार आहे."