संजय राऊत: राम मंदिर लढ्यातलं योगदान मान्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो

मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (12:45 IST)
मयुरेश कोण्णूर
 
अयोध्येतलं राम मंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम जवळ येत असतांनाच हा कार्यक्रम आता खाजगी बनला आहे असं म्हणत एकेकाळचा मित्र आणि रामजन्मभूमी आंदोलनातला साथीदार शिवसेनेनं भाजपावर शरसंधान केलं आहे.
 
"राम मंदिर आंदोलनातले आम्ही स्वातंत्र्यसैनिक आहोत, पण योगदान मान्य करायला मनाचा मोठेपणा लागतो," असं शिवसेना खासदार संजय राऊत 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.
 
अयोध्येच्या कार्यक्रमाला कोणत्याही मुख्यमंत्र्याला न बोलवण्याचा धोरणात्मक निर्णय न घेतल्याचं म्हणत भविष्यकाळात उद्धव ठाकरे अयोध्येला जातील असंही राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्या या मुलाखतीचा हा संपादित अंश.
 
प्रश्न - अयोध्येच्या राम मंदिर भूमीपूजनाचं आमंत्रण शिवसेनेला आहे का? शिवसेनेची भूमिका काय आहे?
 
संजय राऊत - याक्षणी तरी आमंत्रण आलेलं नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नंतर झाले पण ते अगोदर शिवसेनाप्रमुख आहेत. शिवसेनेचा या आंदोलनासाठी जो संबंध आहे तो सहज पुसता येणार नाही.
 
पण सध्याची जी परिस्थिती आहे कोरोनाची आणि उत्तर प्रदेशमध्ये संसर्ग अधिक आहेत, तेव्हा प्रमुख लोकांनी अशी काळात जाणं टाळलं पाहिजे. अशा स्थितीत अट्टाहास करु नये असं आमचं ठरलं आहे.
 
प्रश्न - पण एकंदरीत आपल्या बोलण्यातून आणि प्रतिक्रियेतून असं जाणवतं आहे की शिवसेनला निमंत्रणाची अपेक्षा होती.
 
संजय राऊत - "लढ्यातलं योगदान मान्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. जेव्हा भलेभले 'आम्ही बाबरी पाडली नाही, शिवसेनेने केलं' असं म्हणत पळून जात होते, तेव्हा आम्ही ठामपणे उभे राहिलो.
 
बाळसाहेब ठाकरेंनी म्हटलं की हे जर शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्याचा अभिमान आहे. आयोजकांनी त्या लढ्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्यांना बोलवायला पाहिजे. बाबरी पाडल्याचा जो खटला आहे त्यात शिवसेनेचे लोक आजही आरोपी आहेत. म्हणजे त्यादृष्टीनं आम्ही राम मंदिर लढ्यातले स्वातंत्र्यसैनिक आहोत.
 
ज्यांच्या कानामात्रांचा संबंध नाही ते तिथे असणार आहेत. उदाहरणार्थ, लालकृष्ण आडवाणींनी रथयात्रा काढलीच नसती तर पुढचं रामायण घडलंच नसतं आणि ज्या ठिकाणी भाजपा आणि शिवसेना पोहोचले आहेत त्याठिकाणी ते कधी पोहोचलेच नसते.
 
प्रश्न - सध्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चर्चा होते आहे आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या उद्देशांवरही समाजमाध्यमांवरही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपा विरुद्ध शिवसेना असंही स्वरुप या शाब्दिक चकमकीला आलं आहे. आपलं याबद्दल काय म्हणणं आहे?
 
संजय राऊत - पोलिस तपास करताहेत. ज्यांच्या तपासाशी संबंध नाही अशा व्यक्तींनी यावर बोलू नये. पण त्यावरुन जे राजकारण सुरु आहे ते निर्लज्जपणाचा कळस आहे. आरोप करणा-यांचं काय जातं? हे सरकार अत्यंत पारदर्शक आहे. ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत पाहिली आहे त्यांना माहिती आहे की ते कोणाच्याही कामात हस्तक्षेप करत नाहीत.
 
विशेषत: अशा प्रकरणात तर नक्कीच नाही. पण मागच्या सरकारनं या प्रकरणाशी संबंधित काही लोकांचे गुन्हे कसे दडपले जर आम्ही लोकांच्या समोर आणलं लवकरचं तेव्हा त्यांना समजेल. भविष्यात काय होतं आहे तुम्ही पहा. हळूहळू सगळ्या गोष्टी उघड होतील. पोलिसांना तपास करु द्या. म्हणूनच म्हटलं की काचेच्या घरात राहणा-यानं दुस-याच्या घरावर दगड मारु नयेत.
 
प्रश्न - महाविकास आघाडीमध्ये आपला मित्र आहे कॉंग्रेस. त्या कॉंग्रेसमध्ये सध्या ज्येष्ठ आणि तरुण पिढीमध्ये वाद असल्याचं चित्रं आहे आणि हे वाद ट्विटरवरही सुरू आहेत. आपल्या मित्रपक्षाला आपला सल्ला काय असेल?
 
संजय राऊत - "हे सगळ्यांच पक्षांत चालतं. पण ज्येष्ठांनी नवीन पिढीशी जुळवून घेतलं पाहिजे. कारण जग नेहमी प्रवाहित असतं, पुढे जात असतं. नव्या गोष्टी तरुण पिढी लवकर स्वीकारते. त्यानुसार राहुल गांधींचं ऐकलं पाहिजे.
 
राहुल गांधी जर नेते असतील तर त्या पक्षातल्या प्रमुख नेत्यांनीही राहुल गांधींना नेता मानलं पाहिजे. सत्ता फरक करते. राहुल गांधींकडे सध्या सत्ता नाही. जेव्हा त्यांच्याकडे सत्ता असेल तेव्हा कॉंग्रेसमध्ये जे ज्येष्ठ-श्रेष्ठ नेते आहेत ते राहुल गांधींचा साधे शब्दही आदेशाप्रमाणे पाळतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती