संजय राऊत : महाराष्ट्राच्या सत्ता'सामन्यात' ट्वीटर गाजवणारा 'शेर'
गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (16:16 IST)
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेचं प्यादं पटावरून पुढे सरकवलं. शिवसेना-भाजप युतीनं एकत्रित निवडणूक लढवली आणि त्यांच्यापैकी जास्त जागा भाजपला मिळाल्या असल्यामुळे 'मोठा भाऊ'च मुख्यमंत्री होणार असं सर्वांना वाटत होतं. परंतु शिवसेनेच्या संजय राऊत यांनी मात्र थेट वेगळीच चाल खेळायला सुरुवात केली.
काहीही झालं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे पहिल्या दिवसांपासून सुरु ठेवलेलं ध्रुपद गेला महिनाभर त्यांनी अखंड ठेवलं आहे. या महिन्याभराच्या काळामध्ये प्रत्येक चर्चेत आपलं नाव राहिलं पाहिजे याची तजवीजही ते दररोज नेमाने करत होते.
अगदी मधल्या महत्त्वाच्या आठवड्यात त्यांना आलेलं आजारपण, त्यांचं रूग्णालयात दाखल होणं, शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलातच मांडी ठोकून लिहायला लागणं, त्याचेही फोटो प्रसिद्ध होणं हे सगळं माध्यमांना दाखवावंच लागलं.
एकीकडे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी वाढलेली जवळीक आणि भाजपकडून सुप्त का असेना पण होणारी टीका अशा दोन्ही प्रकारच्या लाटांमधून त्यांनी आपली नाव हाकणं सुरुच ठेवलं. "मला टाळून चर्चा करता येणार नाही", हे त्यांनी मुक्काम मुंबईत असो वा दिल्ली सगळीकडे कायम राखलं.
दररोज सकाळी नियमित प्रेस कॉन्फरन्स. मग दिवसभर माध्यमांमध्ये चर्चा, बैठका असा क्रम कमी म्हणून त्यांनी ट्वीटरवरूनही कधी स्पष्ट तर कधी संदिग्ध संदेश द्यायला सुरुवात केली. त्यात त्यांनी सगळ्यांत मोठा आधार घेतला शायरीचा. वरवर प्रेरणादायी, सुविचार वाटाव्यात असे शेर ट्वीट करुन त्यांनी धमाल उडवून दिली.
एकेकाळी "भाकरी फिरवावी लागेल", "कामाला लागा!" असे संदिग्ध आणि तितकेच अगम्य सल्ले देण्यासाठी शरद पवार प्रसिद्ध होते. त्यात आता उर्दू शेर आणि हिंदी कवितांचा आधार घेणाऱ्या संजय राऊत यांचा समावेश झाला आहे. निवडणुकीच्या निकालापासून शरद पवार यांच्या सतत संपर्कात असल्यामुळे हा पवारांचा तर परिणाम नसावा ना असा प्रश्न पडू शकतो.
अशी सुरू झाली मैफल
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या नाड्या शिवसेनेच्या हातात आहेत हे निकालांनंतर पहिल्या आठवड्यातच दिसून आलं. पुन्हा राऊत यांनी या नाड्या पहिल्या दिवसापासून आवळल्यामुळे भाजपासाठी सगळं सहज-सोपं असेल अशी शक्यता राहिली नाही.
3 नोव्हेंबर रोजी राऊत यांनी पहिला शेर ट्वीटरवर सुनवला तेव्हा वाटलं की आज एक बदल म्हणून त्यांनी सहज शायरीमधून भाजपला संदेश दिला असेल. परंतु नंतर ही मैफल जवळपास रोजच सुरु राहाणार असल्याचं स्पष्ट झालं.
"उसूलों पर जहाँ आँच आये, टकराना ज़रूरी है
उसूलों पर जहाँ आँच आये,
टकराना ज़रूरी है
जो ज़िन्दा हो,
तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है ....
जय महाराष्ट्र...
जो ज़िन्दा हो, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है ...."
हा वसीम बरेलवींचा शेर ट्वीट करून त्यांनी सुरुवात केली. शिवसेना आता गप्प बसणार नाही असा संदेश देऊन त्यांनी आपल्या भात्यातला पहिला बाण भाजपवर सोडला. पुढे त्यांनी हिंदी कविता, वाक्य, शायरी यांचा ट्वीटमध्ये समावेश केला.
दुसऱ्याच दिवशी त्यांनी "लक्ष्य तर पहुंचने से पहले सफर मे मजा आता है! "असं लिहून त्यांनी पुढचा बाण सोडला. वरपांगी हे हिंदी वाक्य उगाच सेल्फहेल्प पुस्तकांतल्या वाक्यासारखं वाटू शकतं. पण महाराष्ट्रात चाललेल्या ओढाताणीत शिवसेना एका मोठ्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी हे करत असल्याचं त्यांनी या ट्वीटमधून ध्वनित केलं.
त्याच दिवशी त्यांनी राज्यपाल महोदयांची भेट घेतली आणि शिवसेनेतर्फे संजय राऊत कायम चर्चेत राहातील यावर शिक्कामोर्तबच झालं. माध्यमांना सतत भेटणं, त्यांना 'रोखठोक' विधानात उत्तरं देणं त्यांनी कायम ठेवलं. पण शिवसेना हे सगळं 'बार्गेनिंग पॉवर' वाढवण्यासाठी करत असावी आणि पुन्हा गुपचूप भाजपबरोबर सत्ता स्थापन करेल असंही काही जणांना वाटू लागलं होतं.
या शंका थांबवण्यासाठी त्यांनी 5 नोव्हेंबर रोजी आणि एक 'शेरबॉम्ब' टाकला. यावेळी त्यांनी आधार घेतला तो दुष्यंत कुमारांचा.
"सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहीए!
मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कही भी आग, लेकिन आग जलनी चाहीए!"
आता हा शेरसुद्धा कोणाला उद्देशून म्हणतोय हे त्यांनी सांगितलं नव्हतं. पण जाणकारच काय परंतु सहज वाचणाऱ्यालाही त्यांचा उद्देश समजून गेला. भाजपच्या नेत्यांना तर पुढे काय होणार आहे याची नांदी त्यातून दिसली असावी, कारण त्याच्या पुढच्या दिवशी "जो लोग कुछ भी नही करते है वो कमाल करते है" असं आणखी एक वाक्य ट्वीट करून त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला.
आपली मुख्यमंत्रिपदाची मागणी पुढे रेटायची, राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा कायम ठेवत दररोज एक वाग्बाण ट्वीटरवरून भाजपवर सोडायचा क्रम राऊत यांनी सुरु ठेवला. भाजपला धारेवर धरायला त्यांना दुष्यंत कुमार आणि वसीम बरेलवी चांगलेच उपयोगी पडले.
बरेलवी ते अटलबिहारी वाजपेयी
7 नोव्हेंबर रोजी त्यांनी दुष्यंत कुमारांचा एक भेदक शेर ट्वीट करून त्यादिवशीचं काम चोख पार पाडलं.
"तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नही
कमाल है कि, फिर भी तुम्हे यकीन नही" असं सांगून त्यांनी आता गेल्या पाच वर्षांमधली शिवसेना आणि निकालानंतरची शिवसेना यात फरक असल्याचं दाखवून दिलं. 8 नोव्हेंबर रोजी राऊत यांनी भाजपच्याच भात्यातले बाण वापरून त्यांना आपला निग्रह दाखवून दिला. त्यांनी थेट माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचीच कविता ट्वीट केली.
आग्नेय परीक्षा की इस घडी में-
आईए, अर्जुन की तरह उद्घोष करे:
न दैत्यं न पलायनम्!
यावेळेस उर्दू शायरीप्रमाणे वाचकांच्या मनात कोणताही किंतू-परंतु, गोंधळ राहू नये याची त्यांनी काळजी घेतली. न दैत्यं न पलायनम् म्हणजे कोई दीनता नही चाहिए, चुनौतियों से भागना नही, बल्कि जूझना जरुरी है असा अर्थही त्यांनी त्यात लिहून ठेवला. शिवसेना मिंधेपणाची भूमिका स्वीकारणार नसल्याचं त्यांनी सांगूनच टाकलं.
9 नोव्हेंबरला त्यांनी पुन्हा एकदा वसीम बरेलवी यांचं
"वो झूठ बोल रहा था बडे सलिके से..
मै ऐतबार न करता तो और क्या करता " हे वाक्य ट्वीट केलं.
10 नोव्हेंबर रोजी शबीन अदिब यांची
"जो खानदानी रईस हैं वो
मिजाज रखते हैं नर्म अपुना
तुम्हारा लहजा बता रहा है,
तुम्हारी दौलत नई-नई है!"ही शायरी ट्वीट करून भाजपाला टोचायचा पाठ कायम ठेवला.
संजय (बच्चन यांच्या कवितेतून) उवाच...
आता हळूहळू शिवसेना भाजपाला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं काहीतरी करू पाहातंय असं दिसायला लागलं होतं. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाणं कितपत योग्य आहे अशी चर्चा होऊ लागली होती. त्याला त्यांनी 11 तारखेला एका वाक्यात उत्तर दिलं. रास्ते की परवाह करुंगा, तो मंजिल बुरा मान जाएगी.....! असं लिहून त्यांनी मुख्यमंत्रिपदाची 'मंजिल' मिळवण्यासाठी शिवसेना वेगळे 'रास्ते' वापरू शकते, नव्हे त्या नव्या रस्त्यांवरून जायला सुरुवात केली आहे हे त्यांनी सांगितलं.
ते यात नक्की यशस्वी होतील का अशा शंका उमटू लागल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 तारखेला त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या काव्यनौकेत बसून उत्तर दिलं.
"लहरों से डर कर नौका पार नही होती, कोशीश करनेवालों की कभी हार नही होती" ही हरिवंशरायांची ओळ तर लिहीलीच वर हम होंगे कामयाब.. जरूर होंगे असंही त्यांनी त्या ट्वीटमध्ये लिहून ठेवलं.
कदाचित संजय राऊत यांना आपला निर्धार व्यक्त करण्यात हरिवंशराय बच्चन फार उपयोगी वाटले असतील. दुसऱ्या दिवशी त्यांनी बच्चन यांच्या अग्निपथ कवितेतील "अग्निपथ अग्निपथ अग्निपथ" हे सुप्रसिद्ध शब्द ट्वीट केले. केवळ हे तीनच शब्द त्यांनी ट्वीट केले असले तरी
"तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी,
तू न मुडेगा कभी,
कर शपथ, कर शपथ, कर शपथ
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ!" हे त्यांनी न लिहिलेले शब्दही त्या तीन शब्दांमधून फॉलोअर्सना दिसून आले.
हे सगळं होईपर्यंत शिवसेनेनं भाजपचा किनारा व्यवस्थित सोडून आपली नौका भरपाण्यात उतरवली होती. नवा किनारा सापडेल की नाही याचा पत्ता नसल्यामुळे शिवसेनेची ही नौका कशी प्रवास करणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्यावर त्यांनी अब हारना और डरना मना है असं लिहून
14 नोव्हेंबर रोजी "हार हो जाती है जब मान लिया जाता है!जीत तब होती है जब ठान लिया जाता है!" हे ट्वीट केलं.
15 नोव्हेंबरला सुद्धा त्यांनी आपला इरादा पक्का असल्याचं "बन्दे है हम उसके हमपर किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारो ओर " या ट्वीटमधून सांगितलं.
त्याच्या पुढच्या दिवशी"यारों नये मौसम ने ये एहसान किया है,याद मुझे दर्द पुराने आते" हा बशीर बद्र यांचा शेर ट्वीट केला.
18 तारखेला त्यांच्या मदतीला हबीब जालिब आले.
"तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था
उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था "असं ट्वीट करून भाजपाला पुन्हा टोमणा मारला. आणि पुढच्या दिवशी आपण (मुख्यमंत्रिपदाचं) ध्येय सोडलेलं नाही तसेच राष्ट्रवादीबरोबर जाण्यात काहीच गैर नाही हे सिद्ध करणारं
"अगर जिंदगी में कुछ पाना हो, तो तरीके बदलो इरादे नही ...!" हे वाक्य टाकून ट्वीट केलं.
बुधवारी 20 तारखेला त्यांनी पुन्हा एकदा अटलबिहारी वाजपेयींची कविता ट्वीट केली.
"आहुति बाकी, यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने,
नव दधीचि हड्डियां गलाएं। आओ फिर से दिया जलाएं।"असं त्यांनी ट्वीट केलं.
आता इतके दिवस चर्चेत राहिलेले संजय राऊत यांच्यावर आडूनआडून टीकाही सुरु झाली आहे. ते सतत माध्यमांमध्ये असतात, त्यांनी आपल्या पक्षाच्या विरोधकांबरोबर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले अशी टीका झाली, मीम्सही आले, सोशल मीडियात विनोद फिरू लागले. त्यामुळेच की काय कदाचित त्यांनी आजचा शेर निवडला असावा.
"हम बुरे ही ठीक हैं, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था!! असं लिहून त्यांनी हा रोजच्या शेरयज्ञात आजची समिधा टाकली आहे.
अर्थात संजय राऊत गेला महिनाभर ट्वीटरवर एकापाठोपाठ एक शेर टाकून आपली मतं मांडत असले तरी त्यांना ट्रोलही तितकच केलं जात आहे. लोक उत्तरादाखल शायरीमधूनच त्यांना लिहीत आहेत.