रवीविषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (17:20 IST)
भारतीय पैलवान रवी दहियाचा टोकिओ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पराभव झाला आहे. त्यामुळे रवी दहियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
 
रशियन पैलवान झावूरला सुवर्णपदक मिळाले आहे.
 
कुस्तीपटू रवी कुमार दहियाने भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाचवं पदक पटकावलं आहे. 57 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेववर मात करत अंतिम फेरी गाठलेल्या रवीला रशियाच्या झावूर उगेव्हने 7-4ने पराभूत केला.
 
काल रवी दहियाने 57 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेववर मात करत अंतिम फेरी गाठली होती.
 
पहिल्या फेरीत रवी कुमारने दोन गुणांची आघाडी घेतली मात्र त्यानंतर सनायेवने रवीला चीतपट करत थेट आठ गुणांची कमाई केली. या धक्क्यातून रवीने एक गुण कमावला.
 
रवीने तीन गुणांची कमाई करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. सनायेवच्या पायाला दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर रवीने सनायेवला चीतपट करत बाजी मारली.
 
हरियाणातील सोनिपत जिल्ह्यातील नाहरी गावात जन्मलेले रवी दहियाने आज कमावलेलं यश म्हणजे गेल्या 13 वर्षांच्या कठोर मेहनतीचं फळ आहे.
 
जवळपास 15 हजारांची लोकवस्ती असलेल्या रवी दहियांच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावाने आजवर 3 ऑलिम्पिक खेळाडू दिलेत.
 
महावीर सिंह यांनी 1980 सालच्या मॉस्को आणि 1984 सालच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तर अमित दहिया 2012 साली लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले होते.
 
ऑलिम्पिकचा हा वारसा रवी दहियाने आणखी एक पाऊल पुढे नेऊन ठेवला आहे. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षापासून रवीने दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सतपाल यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली.
 
रवीच्या या प्रवासात त्यांचे वडील राकेश दहिया यांचीही साथ लाभली. शेतकरी असलेले राकेश दहिया यांना आपल्या मुलाला पट्टीचा कस्तीपटू झालेलं बघायचं होतं. त्यासाठी छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्ती शिकणाऱ्या आपल्या मुलाला ते नित्यनियमाने दूध, सुकामेवा पोहोचवीत.
 
राकेश दहिया पहाटे 4 ला उठून पाच किमी अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशनवर पायी जात असे, तिथून ट्रेनने आझादपूर रेल्वे स्टेशनला उतरून आणि पुन्हा तिथून 2 किमी. अंतरावर असलेल्या छत्रसाल स्टेडियमला पायी जात असे.
 
गेली 10 वर्षं हा सिलसिला अखंडपणे सुरू आहे. यावरूनच त्याच्या संघर्षाची कल्पना येते.
 
2015 साली रवी दहियाने ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं आणि लोकांचं लक्ष त्याच्याकडे वळलं.
 
त्यानंतर 2018 साली अंडर 23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्याने सिल्व्हर मेडल पटकावलं. 2019 साली एशियन कुस्ती चम्पियनशिपमध्ये तो पाचव्या स्थानावर होता. मात्र, 2020 साली एशियन कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये त्याने थेट गोल्ड मेडलपर्यंत मजल मारली.
 
हीच कामगिरी कायम ठेवत त्याने 2021 सालच्या एशियन कुस्ती चॅम्पियनशिपमध्येही गोल्ड मेडल पटकावलं.
 
रवी दहिया यांनी 2019 साली कझाकिस्तानच्या नूर सुल्तानमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावून ऑलिम्पिकमध्ये स्थान पक्क केलं.
 
तेव्हापासूनच त्याच्याकडून ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा होती. टॉरगेट ऑलिम्पिक पोडियम या सरकारी योजनेचाही तो भाग होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती