दिल्ली लहान मुलीवर बलात्कार: स्मशानभूमीतल्या कुलरचं पाणी आणायला गेली ती परतलीच नाही...
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (23:05 IST)
सलमान रावी
निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारं भयंकर प्रकरण राजधानी दिल्लीत घडलं आहे.
दिल्लीतल्या पुरानी नांगल या भागात येणारे जाणारे रस्ते स्थानिकांनी सील करून टाकले. या भागातली माणसं रस्त्यावर डेरा टाकून आहेत.
गर्दी वाढतेच आहे आणि अंगाची काहिली होणाऱ्या उकाड्यात आणि प्रचंड आर्द्रता असलेल्या वातावरणातही लोक मागे हटायला तयार नाहीत.
या भागातल्या एका नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या दुष्कृत्यात दोषी असलेल्या व्यक्तींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात यावा जेणेकरून पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल अशी या लोकांची मागणी आहे.
या प्रकरणी एफआयआर दाखल करून घ्यायला पोलिसांनी केलेल्या टाळाटाळीमुळे लोकांचा रोष वाढला आहे.
पीडितेच्या पालकांना 15 तास पोलीस स्थानकात बसवून ठेवणाऱ्या आणि एफआयआर दाखल करून घ्यायला उशीर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशीही स्थानिकांची मागणी आहे.
पीडितेचं कुटुंब तीन जणांचं आहे. 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही तिन्ही माणसं एकत्र होती. कचरा वेचून आणि भिक मागून हे कुटुंब गुजराण करतं.
त्यादिवशी घरातल्यांनी नऊ वर्षांच्या मुलीला आईने जवळच्या स्मशानभूमीत बसवलेल्या कुलरचं थंड पाणी आणण्यासाठी पाठवलं. त्यावेळी आपल्या मुलीवर काय प्रसंग ओढवणार आहे याची त्या माऊलीला जराही कल्पना नव्हती. काही क्षणातच त्या सगळ्यांचं आयुष्यच बदलून गेलं.
कुलरचं गार पाणी आणण्यासाठी गेलेली मुलगी बराच वेळ घरी आली नाही. त्यामुळे त्यांनी घराच्या आसपास शोधायला सुरुवात केली.
एफआयआरप्रमाणे, 'जेव्हा आई तिथे पोहोचली, तेव्हा त्यांची मुलगी निपचित पडली होती. मुलीच्या नाकातून रक्त वाहत होतं. ओठ आणि चेहरा निळा पडला होता. चेहऱ्यावर जखमा होत्या आणि कपडे ओले होते.'
मुलीबरोबर काय घडलं हे कुणालाच ठाऊक नव्हतं. मात्र आईला शंका आली की लेकीवर बलात्कार झाला आहे.
आईला धमकावलं, मुलीचा मृतदेह जाळण्यात आला
जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा रडून रडून आईची अवस्था केविलवाणी झाली होती. रडून रडून आई बेशुद्ध पडण्याच्या मार्गावर होती.
मुलीच्या वडिलांना सांभाळणंही आजूबाजूच्या लोकांना अवघड झालं होतं. आई धाय मोकलून मुलीच्या नावाने हंबरडा फोडत होती. आजूबाजूच्या बायका आईला धीर देत होत्या.
थोडी शुद्ध आल्यावर आई नेमकं काय घडलं ते सांगते. आईला खूप काही सांगायचं होतं. मुलीला शोधायला स्मशानभूमीत पोहोचली तेव्हा मुलगी जमिनीवर पडली होती. तिथले पुजारी आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं की कुलरच्या यंत्रातून करंट येत होता. ज्यामुळे मुलीचा मृत्यू झाला.
पुजारी आणि तीन सहकाऱ्यांनी मुलीच्या आईला धमकावलं आणि पोलिसांना काही सांगू नका असं धमकावलं. पोलिसांना सांगितलंत तर पोस्टमॉर्टेमवेळी मुलीच्या अंगाचे काही भाग काढून घेतील असं त्यांनी सांगितलं.
पीडित कुटुंबीयांचे शेजारी नितीन बगहा यांनी सांगितलं की पुजारी आणि सहकाऱ्यांनी स्मशानभूमीचा दरवाजा आतून बंद करण्यात आला होता.
ते म्हणाले, मुलीला शोधायला गेलेली आई परतली तेव्हा वडीलही अस्वस्थ झाले आणि तेही स्मशानभूमीच्या दिशेने निघाले. ते तिथून परतले आणि स्मशानभूमीचा दरवाजा आतून बंद असल्याचं सांगितलं. आम्ही सगळे एकत्र जमलो आणि स्मशानभूमीचा दरवाजा तोडून आत घुसलो. आत शिरलो तर दिसलं की मुलीचा मृतदेह जळत होता. तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते.
पोलिसांचा हलगर्जीपणा
नितीन बगहा यांनी सांगितलं की, पोलिसांना या घटनेविषयी कळवण्यात आलं. पोलीस आले. आम्ही चितेवर पाणी टाकण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा पोलिसांनी आम्हाला तसं करण्यापासून रोखलं.
पोलिसांनी याप्रकरणी पुजारी राधेश्याम यांच्याव्यतिरिक्त कुलदीप, लक्ष्मीनारायण आणि सलीम यांना अटक केली आहे.
जोपर्यंत चितेवर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न झाला तोपर्यंत चिमुरडीचे फक्त पाय शिल्लक राहिले होते. शरीराचे बाकी भाग जळून गेले होते.
दिल्ली छावणीस्थित फॉरेन्सिक टीमने चितेवरची राख आणि मृतदेहातून मिळालेले पाय यांची तपासणी करण्यासाठी घेऊन गेले आहेत.
दिल्ली छावणी पोलीस स्टेशनचे एसएचओ जगदीश राय यांनी आरोप फेटाळताना सांगितलं की त्यांनी स्वत: चितेवर पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. हे सगळं संध्याकाळी सहा वाजता घडलं आणि पोलिसांना यासंदर्भात रात्री दहा वाजता सांगण्यात आलं.
आम्हाला जसं याविषयी कळलं आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो. तोपर्यंत चिता जळत होती.
भीक मागून गुजराण करणारं कुटुंब
स्मशानभूमीच्या बरोबर समोर पीर बाबा दर्गा आहे. तिथे पीडितेचे कुटुंबीय भीक मागून गुजराण करत असत. आजूबाजूला सैन्याची माणसं असतात कारण हा दिल्ली कँट म्हणजे लष्कराचा परिसर आहे. जिथे हे कुटुंब राहतं तिथे तुटक्याफुटक्या स्थितीतली कॉट, जुने कपडे आणि काही भांडी एवढंच आहे.
घरात विखुरलेल्या वस्तू कुटुंबाची अवस्था दर्शवतात. कचरा वेचून हे कुटुंब उदरनिर्वाह करत असे. मात्र कोरोनामुळे त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं असं शेजाऱ्यांनी सांगितलं.
जेव्हा सगळं पुन्हा पूर्ववत होऊ लागलं, तेव्हा त्यांनी पीर बाबा दर्गावर भीक मागायला सुरुवात केली.
नितीन बगहा सांगतात की जेव्हा त्यांना खायला-प्यायला नसे तेव्हा ते आजूबाजूच्या लोकांकडे मागून खात असत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.
प्रकरण दडपून टाकण्याचा प्रकार
पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, प्रचंड उकडत आहे त्यामुळे स्मशानभूमीत बसवलेल्या कुलरमधलं पाणी आम्ही पीत असू. आमची मुलगी अनेकदा तिथे थंड पाणी आणण्यासाठी जात असे. ती एकटीच जात असे. त्यादिवशीही तशीच गेली होती.
वडील सांगतात, "आरोपींनी पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाका असं म्हटलं होतं. शेजारपाजारच्या लोकांकडून आम्हाला स्मशानभूमीत काहीतरी घडलं आहे हे कळलं. मुलगी तिकडेच गेली होती आणि बायकोही तिला शोधायला तिथेच गेली होती त्यामुळे मीही तिथे जायला निघालो. ही रात्री साडेसातची गोष्ट आहे."
"मी तिथे पोहोचलो, तेव्हा काय घडलं असं पुजाऱ्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की प्रकरण वाढवू नका," मुलीचे वडील सांगतात.
2012 मध्ये दिल्लीत झालेलं निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरण पीडितेच्या बाजूने खटला लढवणाऱ्या वकील सीमा कुशवाहा यांचं म्हणणं होतं की मुलीचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला यातूच काहीतरी अनुचित घडलं आहे हे स्पष्ट होतं.
त्या सांगतात, "कुलरचा करंट लागून मुलीचा मृत्यू झाला असेल तर आरोपींनी तिला जाळून का टाकलं? त्यांनी पोलिसांना का कळवलं नाही? किंवा ते मुलीला रुग्णालयात का घेऊन गेले नाहीत? जाळण्यापूर्वी ती मुलगी जिवंत होती की नाही हेही माहिती नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता काय घडलं असेल याचा अंदाज येऊ शकतो."
लोकांमध्ये रोष
पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे लोकांमध्ये रोष आहे. दलित संघटना आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करत आहेत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करून घ्यायला चालढकल केली होती त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
कारण त्यांनीच पीडितेच्या कुटुंबीयांना तासनतास पोलीस स्टेशनात बसवून ठेवलं. एफआयआर दाखल करून घेण्याची तसदीही पोलिसांनी घेतली नाही.
"मुलीचा मृत्यू कुलरचा करंट लागून झाला आहे हे खरं मानण्यासाठी पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांवर दबाव आणला," असं सामाजिक कार्यकर्ता आणि बलात्काराच्या घटनासंदर्भात काम करणाऱ्या योगिता भयाना यांनी सांगितलं.
पंधरा तास कुटुंबीयांनी हे प्रकरण वाढवू नये यासाठी प्रयत्न झाले. त्यांना मदत करण्याऐवजी त्रास देण्यात आला. दबाव टाकून 164 कलमाअंतर्गत त्यांच्याकडून असं वदवून घेतलं की मुलीचा मृत्यू करंट लागून झाला आहे.
सुरुवातीला जी तक्रार दाखल करण्यात आली त्यात हत्या आणि पुरावे मिटवण्याचे आरोपच लावण्यात आले होते.
3 ऑगस्ट रोजी नव्याने एफआयआर दाखल करण्यात आली. याची प्रत एसीपी दिलीप सिंह यांनी घटनास्थळी जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांना दिली.
एसीपींनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "अनुसूचित जातीजमातीसंदर्भात शोषण कलमाव्यतिरिक्त कलम 302, 376, 506 यांच्यासह लैंगिक छळापासून लहान मुलांचं संरक्षण व्हावं यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याची कलमंही जोडण्यात आली आहेत. ज्यादिवशी हे घडलं त्याचदिवशी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आलं आहे."
पीडितेच्या कुटुंबीयांचा जबाब मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवण्यात आला आहे त्यामुळे पोलिसांनी दबाव टाकल्याचा आरोप तथ्यहीन आहे, असं एसीपी सांगतात.
लोकांची मागणी काय?
लोकांचा रोष कमी होण्याची चिन्हं नाहीत. दोषी पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन होत नाही तसंत पीडितेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील असं भीमआर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी सांगितलं.
या घटनेचं कळल्यापासून पुरानी नांगल भागात दलित आणि महिला कार्यकर्त्यांचं जाणंयेणं सुरू आहे.
शारदा दीक्षित सांस्कृतिक संघटनेशी संलग्न आहेत. आंदोलनात त्या सहभागी होणार आहेत. समाजातल्या शेवटच्या स्तरातल्या वंचित आणि उपेक्षित लोकांना कशा पद्धतीच्या जगण्याला सामोरं जावं लागतं याचं ही घटन जितंजागतं उदाहरण आहे असं त्यांनी सांगितलं.
हा केवळ जातीचा मुद्दा नाही, महिलांवर अत्याचाराचं प्रकरण समोर येतं तेव्हा सरकारी यंत्रणेची भूमिका बहुतांश प्रकरणांमध्ये अशीच असते.
ही संघटना पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत आहेत.
बुधवारी सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दिल्ली सरकारने प्रकरणाची चौकशी मॅजिस्ट्रेटच्या नेतृत्वात करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पीडितेच्या घरच्यांची भेट घेतली. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली.
माजी खासदार आणि अनुसूचित जातीजमाती संघटना महासंघाचे अध्यक्ष उदित राज यांनी सांगितलं की दिल्ली सरकारने एक कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी.