रक्षाबंधन: भाऊ-बहिणीच्या नात्यामध्ये संपत्तीवरुन वितुष्ट कसं येतं?

रविवार, 22 ऑगस्ट 2021 (12:00 IST)
ओंकार करंबेळकर
"आईवडील गेल्यावर माझ्या भावाने अचानक सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करत असल्याची नोटीस मला आणि माझ्या बहिणीला पाठवली आणि आम्ही घरी नसल्यामुळे त्या नोटिशीला उत्तरही देऊ शकलो नाही.
 
वडिलार्जित संपत्ती अशाप्रकारे त्याच्या नावावर झाल्यापासून आमच्या नातेसंबंधात आलेला अडथळा आजवर दूर झालेला नाही." हे उद्गार आहेत नागपूरला राहाणाऱ्या साठी ओलांडलेल्या रमाबाईंचे. (नाव बदलले आहे)
 
लहानपणापासून एकाच घरात वाढलेले, त्याच पालकांच्या शिस्तीखाली, प्रेमाने वाढलेले भाऊ-बहीण अनेकदा फक्त संपत्तीच्या कारणामुळे दूर का जातात?
 
हा प्रश्न आपल्या समाजात बऱ्याचवेळा पडतो. संपत्तीचे कारण या दोघांचं नातंच संपवून टाकू शकेल इतकं प्रबळ का होतं?
 
2020 साली वडिलोपार्जित संपत्तीवर मुलाप्रमाणेच मुलींचा समान वाटा असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
हा कायदा अस्तित्त्वात येऊन आता 15 वर्षे झाली. पण तरीही प्रत्यक्षात घरातल्या मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळतो का? कायद्याने मिळत असलेला वारसा हक्क मुली का नाकारतात? हा हक्क मागितल्याने माहेर तुटेल असे मुलीला का वाटते?
 
इतकं वितुष्ट का?
वर उदाहरण दिलेल्या रमाबाईंचं आणि त्यांच्या बहिणींचं माहेर संपत्तीच्या कारणावरुन कायमचं दुरावलं. त्या म्हणतात संपत्तीचा वाटा आम्हाला मिळाला नाही इतक्यावरच हे थांबलं नाही तर आम्ही अशी मागणी केलीच कशी अशी भावना मनात ठेवून आम्हाला कायमचं लांब फेकण्यात आलं.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "संपत्ती भावाला मिळाल्यानंतर नातं कधीच नीट झालं नाही. भावाने आमच्याकडे येणं थांबवलं, सर्व लहान-मोठे समारंभ, घरातील बारशी-श्राद्धं, लग्न-मुंजी यांना येणं थांबवलं. गेल्या कित्येक वर्षांमध्ये मी माझ्या भावाला राखी बांधलेली नाही."
 
"लग्न होऊन सासरी गेलेल्या बाईला अशाप्रकारचा आधार नसणं आणि माहेरुन योग्य तसा प्रतिसाद नसणं ही भावना कोंडी करणारी असते. गेल्या आठवड्यात माझ्या यजमानांचं वर्षश्राद्ध पुण्यामध्ये होतं. पण त्यालाही भावानं येणं टाळलं. आताही केवळ तो चुकून का होईना राखी बांधून घ्यायला येईल या विचाराने मी पुण्यात थांबले आहे, नाहीतर कधीच गावाला निघून गेले असते."
 
'भाऊ नाही भाव शोधते'
गरजेच्या वेळेस भाऊ मदतीला किंवा आधाराला आला नाही याची कटूता मनात असली तरी नात्याची भूक कायम राहाते, प्रेमाची भूक कायम राहाते असं रमाबाई सांगतात.
त्या म्हणाल्या, "आता काही काळानंतर मी लोकांमध्ये भाऊ नाही आपलासा करणारा भाव शोधते. सख्खा भाऊ नसला तरी सख्य बाळगणारे लोक मदतीला येतात. तेच भाऊ होतात. पण भावनिक व्हायला होतंच."
 
"आता माझी मुलगी माझ्या भावाच्याच शहरात राहाते. तिचं आणि भावाच्या मुलाचं नातं चांगलं आहे. भावाच्या सुनेचं आणि तिचीही चांगली मैत्री आहे. मला भाऊ आणि वहिनीचं प्रेम मिळालं नाही पण माझ्या मुलीला मिळालं हे पाहून मला समाधान वाटतं."
 
प्रायव्हेट ट्र्स्टचा बागुलबुवा
रमाबाईंसारखा दुसरा एक अनुभव मुंबईत राहाणाऱ्या रंजना (बदललेलं नाव) यांनी बीबीसी मराठीकडे कथन केला.
त्यांचं तीन भाऊ आणि चार बहिणींचं कुटुंब आहे. आज सगळ्यांची वय साठच्या पुढे आहेत. वीस वर्षांपूर्वी घरातल्या दोन भावांनी वडिलांनी आणि निधन झालेल्या एका भावाने उभी केलेली संपत्ती एका प्रायव्हेट ट्रस्टखाली एकत्र आणली. आजच्या किंमतीत ती करोडोंच्या घरात आहे. ती प्रॉपर्टी गेल्या वीस वर्षांमध्ये अनेक पटीने वाढली. वडील हयात असताना वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांचं इंग्रजी भाषेत मृत्यूपत्र केलं गेलं. त्यात प्रायव्हेट ट्रस्ट तयार करण्याविषयी लिहिलं गेलं. त्यासोबतच इतर चार बहिणींकडून या संपत्तीत कोणताही हक्क नको असं लिहून घेतलं गेलं.
 
संपत्तीच्या वाट्याची जाणिवच नव्हती
रंजना आणि त्यांच्या बहिणींना आपला संपत्तीत वाटा असू शकतो अशी जाणीवही तेव्हा नव्हती. जेव्हा ही जाणिव झाली तेव्हा प्रायव्हेट ट्रस्टचा बागुलबुला सतत उभा केला गेला.
 
ट्रस्ट म्हणजे कोणी त्याचे वैयक्तिक फायदे घेणार नाही अशी भाबडी समजूत मनातून जाण्यासाठी या बहिणींना काही वर्ष लागली. आता या ट्रस्टच्या व्यवहारावरुन बहिणींनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि भावांना अस्वस्थ वाटू लागलं.
वर्षागिणक ठिणग्या पडत गेल्या. वाद-विवादांना तोंड फुटलं. वरवरचे संबंध राहिले. पुढल्या चार-पाच वर्षांतच नात्यातला ओलावा संपत गेला. गेल्या पंधरा वर्षांपासून रक्षाबंधनच काय भाऊबीजही बहीण-भावांसाठी बंद झाली.
 
'मोठे झाले आणि बहिणीला विसरले'
रंजना सांगतात- " माहेरच्या घरासाठी मी काय नाही केलं. कर्ज काढून भावंडांना शिकवणं असो की घरं बांधताना केलेली पदरमोड आणि कष्ट असोत. त्याची कदर भावांनी ठेवली नाही. त्यांचं वय लहान होतं तेव्हा माझ्या मताला किंमत होती, तेव्हा मी कर्ती होते कमवत होते. पण ते जसे कमवायला लागले आणि त्यांना पैसे दिसायला लागले तसं नातं त्यांच्यासाठी महत्त्वाचं राहिलं नाही."
 
'माहेर इतकं परकं होईल असं वाटलं नव्हतं'
"गेल्या वीस वर्षांत या दोन्ही भावांनी चार प्लॅट, 2 बंगले, 3 जमिनीचे प्लॉट्स, 7 एकर शेतजमीन अशी त्याच संपत्तीच्या जीवावर संपत्ती वाढवली. पण त्यातला एक कणभर हिस्सा कधी दिला नाही.
आई-वडिलांचं घर म्हणून जे काही थोडं नातं आहे ते, त्यासाठी वर्षातून एकदा बाहेरुन घर बघावसं वाटतं. कधी हक्काने राहायला मिळालं तर ते ही नकोसं वाटतं. दुःख होतं. कधीही वाटलं नव्हतं हे घर माझ्यासाठी इतकं परकं होईल."
 
बहिणीचं नातं विसरले
भावाच्या आठवणीने, भाऊबीजच्या आठवणीने वेदना होतात. सासरी आल्यावर न चुकता येणाऱ्या भावाची एकेकाळी मी वाट पाहात असायचे. पैशाने, संपत्तीने माणसाची नियत बदलते असं ऐकलं होतं. माझे भाऊ बदलले. संपत्तीच्या हव्यासेपोटी बहिणीचं नातं विसरले. मी त्यांच्यासाठी, घरासाठी जे केलं त्याची किंमत त्यांना नाही राहिली.
आज रंजना यांचं वय 80 वर्षं आहे. घरातली प्रॉपर्टी आणि ट्रस्ट हा त्यांच्यासाठी गेली 20 वर्षं दुखरा कोपरा राहिलाय.
 
भावाला काय वाटतं?
संपत्तीमुळे नाती तुटली तरी दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये प्रेमही कमी झालेलं असतं असं नाही. बहुतांशवेळा भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयाचा नंतर पश्चाताप होत असल्याचं दिसून येतं.
 
मुंबईत राहाणाऱ्या प्रिती शिंदे (बदललेलं नाव) यांनी बीबीसी मराठीला आपला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, "वडिलांच्या निधनांतर संपत्तीवर इतर नातेवाईक हक्क सांगण्याच्या तयारीत होते. अशा वेळी भावाला त्रास होऊ नये यासाठी आम्ही 4 बहिणींनी एकत्र येत एक निर्णय घेतला. वडिलोपार्जित घर आणि जमिनीवरचा हक्क सोडण्याचा हा निर्णय होता. भावाला मदत म्हणून सर्व काही भावाच्या नावावर करत आम्ही बहिणींनी हे पाऊल उचललं."
 
"नंतर भावाने स्वतःच्या व्यवसाय आणि इतर गरजांसाठी घर आणि काही जमीन परस्पर विकली. आम्हाला याबाबत साधी कल्पना दिली नाही. याचं त्यावेळी वाईट वाटलं होतं. पण आम्ही सर्वांनी मिळून जो निर्णय घेतला त्यावर कायम राहत या बाबत भावाला किंवा इतर कुणालाही याबाबत कधीच विचारणा केली नाही. संपत्ती आणि पैशापलीकडे हेच तर खरं प्रेम असतं असं वाटतं."
 
सणाला आठवण होते पण...
प्रिती शिंदे सांगतात, "आईचं निधन झाल्यावर आमचं माहेरी जाणं कमी झालं. आम्ही मुंबईत असल्याने तसा फारसा संबंध येत नव्हता. पण माझ्या इतर तिघी बहिणी जवळच्या गावात राहत होत्या. पण त्यांनाही फारसा संबंध ठेवता आला नाही. सणाला माहेरची आठवण कुणाला येत नाही. खास करून रक्षाबंधन आणि भाऊबीज यावेळी तर हमखास भाऊ बहिणींना भेटायची इच्छा होते. पण नात्यामधला दुरावा सहन करावा लागला."
 
भावाला पश्चाताप
बहिणींना अंधारात ठेवून संपत्ती विकण्याच्या निर्णयाचं आज प्रिती शिंदे यांच्या भावाला वाईट वाटतं. याबद्दल त्या म्हणाल्या, "घर जमीन विकण्याचा भावाच्या निर्णयाचा आज त्याला पश्चाताप होतोय पण आजही आम्ही त्याच्यासोबत आहोत. भावाची परिस्थिती बेताची आहे. पण त्याच्या प्रत्येक अडचणीच्या काळात आम्ही शक्य ती मदत केली आणि पुढेही करू. नात्यांची वीण एकाने उसवली तर दुसऱ्याने घट्ट धरून ठेवली तरच नाती टिकू शकतात."
 
वडील किंवा मुलगी हयात असो वा नसो मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर समान हक्क आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने 11 ऑगस्ट 2020 पुन्हा एकदा स्पष्ट केले.
 
त्यावेळेस बीबीसी मराठीशी बोलताना वर्षा देशपांडे म्हणाल्या होत्या, "पूर्ण संपत्ती भावाला मिळावी यासाठी बहिणी हे सोडपत्र देत असतात. महाराष्ट्रात अगदी परंपरा असल्यासारखी ही पद्धत वापरली जाते. बहिणी स्वत: हक्कसोड पत्र देतात त्यामुळे दुसरं कुणी त्यामध्ये आक्षेप घेऊ शकत नाही. कारण मुळात असंच केलं जातं हे त्यांच्यावर बिंबवलं जात आहे."
 
स्त्रियांच्या संपत्तीच्या हक्कांसाठी मोहीम
गेली काही वर्षे स्त्रियांच्या संपत्तीमधील हक्काबाबत चर्चा सुरू झाली आहे. लोकशाही उत्सव समितीतर्फे तशी एक मोहीमच हाती घेण्यात आली आहे. या संघटनेच्या सीमा काकडे यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला.
 
त्या म्हणाल्या,
 
स्त्रिचा संपत्तीमधील वाटा कायद्यानेच मान्य केला आहे. रक्षाबंधन किंवा भाऊबिजेला प्रेमाचे गोडवे गायले जातात तेव्हा समानतेचा हक्कही मान्य केला गेला पाहिजे.
स्त्रिच्या नावावर मालमत्ता असण्याचं प्रमाण आजही कमी आहे. शहरी, सुशिक्षित भागांमध्येही हे प्रमाण अत्यल्प आहे. स्त्रियांना सन्मानाने जगण्यासाठी तसेच त्यांना आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहाता यावं यासाठी अशी समान वाटणी आवश्यक आहे.
एकट्या राहाणाऱ्या, परित्यक्ता, विधवा किंवा कोणत्याही कारणाने एकट्या पडलेल्या महिलांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न तयार होतो. समान वाटणीने त्यांना आधार देता येईल.
मुलीच्या लग्नाच्यावेळेस खर्च झाला, हुंडा दिला म्हणून तिला आता पुढे काहीच मिळणार नाही असं सांगितलं जातं. असं करण्याऐवजी लोकांनी लग्नं साध्या पद्धतीने करावीत आणि तो वाचलेला खर्च व संपत्तीचा वाटा मुलीला देणं चांगलं ठरेल.
हक्कसोडपत्राचा आग्रह होता कामा नये. ते स्वेच्छेनं झालं पाहिजे. आई-वडिलांची जबाबदारी मुलगा घेणार, तो वंशाचा दिवा, सगळी संपत्ती त्याला अशी लहानपणापासून शिकवण देण्याऐवजी समानतेसाठी विचार केला पाहिजे असं काकडे सांगतात.
हे सगळं पाहाता रक्षाबंधन, भाऊबीजेसारख्या सणांना आता नवा आयाम देण्याची गरज असल्याचं दिसतं. संपत्तीमधील समान वाटा हीच रक्षाबंधनाची सर्वोत्तम भेटवस्तू किंवा भाऊबिजेची ओवाळणी ठरू शकते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती