सुरेश पिंगळे : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात एकाने स्वतःला पेटवून का घेतलं?
गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (17:31 IST)
- राहुल गायकवाड
महत्त्वाची सूचना
आत्महत्या करणे, आत्महत्येचा विचार येणं किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे हे सर्व नक्की थांबवता येऊ शकतं. योग्य औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने यावर उपचार नक्की शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या कुठल्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
लाईन
"काही चुकलं असेल तर माफ कर," अशी शेवटची ओळ त्याने लिहिली अन् त्याचा फोन बंद झाला.
"सकाळी त्याचा फोन आला, म्हणाला मी पाठवलेला मेसेज बघ. मी काही वेळाने पाहिलं तर त्याने त्याला होणाऱ्या त्रासाबद्दल लिहिलं होतं. शेवटी काही चुकलं असेल तर माफ कर अशी शेवटची ओळ त्याने लिहिली होती. त्यानंतर त्याला अनेक फोन केले तर ते बंद आले.''
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दरवाजासमोर स्वतःला पेटवून घेऊन आयुक्तालयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्नात गंभीर भाजलेल्या सुरेश पिंगळे यांचे मित्र संतोष कोळआपटे सांगत होते.
शनिवारवाड्याजवळच्या सूर्या रुग्णालयाबाहेर सुरेश यांचे मित्र आणि नातेवाईक जमले होते. आपल्या मित्राची काळजी त्यांना सतावत होती.
सुरेश पिंगळे (वय 42) यांनी बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास पुणे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर स्वतःला पेटवून घेत आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
चारित्र्य पडताळणीवरून ही घटना घडली का?
पिंगळे हे पाषाण येथील एआरडीई या ठिकाणी काँट्रॅक्ट बेसिसवर ऑफिस बॉयचं काम करतात. ते आयुक्तालयात चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेटबाबत चौकशी करण्यासाठी आले होते. त्यांच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे जुनं चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट होतं. परंतु त्यांचा काँट्रॅक्टर जुलैमध्ये बदलला होता. त्यामुळे त्यांना नव्याने चारित्र पडताळणी सर्टिफिकेट हवं होतं.
त्यासाठी त्यांनी 1 जुलैला पहिला अर्ज केला होता. परंतु महिन्याभरानंतर देखील त्यांना पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट न मिळाल्याने त्यांनी स्वतःला पेटवून घेतलं.
सुरेश या घटनेत 80 टक्क्यांपेक्षा जास्त भाजले आहेत. त्यांच्यावर सूर्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरेश यांना तीन मुलं आहेत.
मोठ्या मुलीचं लग्न झालं असून ती आठ महिन्याची गरोदर आहे. या घटनेबाबत तिला अद्याप सांगण्यात आलेलं नाही. त्यांची पत्नी सध्या रुग्णालयात त्यांच्यासोबत आहे.
सुरेश यांच्यासोबत काम करणारे राहुल करपे सूर्या रुग्णालयाबाहेर गर्दीत थांबले होते.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "आज या पडताळणीच्या कामासाठी सुरेश आयुक्तालयात येणार होते. एक महिना त्यांना चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट आणण्यासाठी मुदत दिली होती. ती मुदत संपली तरी कंपनीने त्यांना सर्टिफिकेट आणण्यासाठी वेळ दिला होता.
"त्यांना ते लवकर मिळत नव्हतं. आज ते ऑफिसला आले नाहीत. त्यांच्या पत्नीचा दुपारी फोन आला त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं. सुरेश ऑफिसला आलेत का, याची चौकशी करण्यासाठी त्यांनी फोन केला होता. त्यानंतर मला या घटनेची माहिती मिळाली. आत्ता काम संपल्या संपल्या इकडे लगेच आलो," करपे सांगतात.
सुरेश यांचे मित्र संतोष म्हणाले, "सुरेश म्हणत होता पोलीस म्हणतायेत त्याच्यावर तीन गुन्हे आहेत. गुन्हा दाखल असलेली व्यक्ती तीच आहे का हे पडताळायचंय. सुरेश साधा माणूस आहे. एक गुन्हा तर तो पुण्यात यायच्या आधीचा दाखवत होता. ही पडताळणीची प्रोसेस लवकर होत नव्हती, त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्यांच्यावर त्यांचं अख्खं कुटुंब चालतं त्यामुळे त्यांना हे सर्टिफिकेट लवकर मिळणं आवश्यक होतं."
पोलीस आयुक्तालयाच्या दारातच एकाने पेटवून घेतल्याची घटना घडल्याने सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतलीय. ही घटना दुर्देवी असल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. घटना घडल्यानंतर सर्वच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
घटना कशी झाली?
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी पत्रकारांना या घटनेबाबतची सविस्तर माहिती दिली. यावेळी झोन 2 चे पोलीस उपायुक्त सागर पाटील देखील उपस्थित होते.
घट्टे म्हणाले, "बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास आयुक्तालयाच्या गेटवरील एक खिडकी योजनेच्या इथे सुरेश आले होते. त्यांना हवं असलेल्या चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेटबाबत त्यांनी विचारणा केली.
"त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीवर तीन ठिकाणी गुन्हे दाखल होते. समर्थ, कोथरुड आणि सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल होते. समर्थ आणि कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात ते नसल्याचे समोर आले होते. सहकारनगरचा अहवाल येणं बाकी होतं.
घट्टे पुढे सांगतात, "त्यामुळे तो रिपोर्ट येईपर्यंत थांबावे लागेल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच त्यांनी पेटवून घेत आयुक्तालयात येण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आग विझवून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. त्यांनी चारित्र्य पडताळणीसाठी 1 जुलैला ऑनलाईन अर्ज केला होता. परंतु त्यांच्या काही कागदपत्रांची पूर्तता नसल्याने त्यांनी 27 जुलैला नवीन कागदपत्रे दिली होती. नावात साधर्म्य असल्यास पडताळणीस काहीसा वेळ लागतो."
पोलीस आता या घटनेचा सर्व बाजूने तपास करत आहेत. सुरेश यांच्यासोबत पोलिसांना एक बॅग देखील मिळाली आहे. त्याची सुद्धा पडताळणी करण्यात येत आहे. सहकारनगर येथील दाखल असलेल्या गुन्ह्यात देखील सुरेश यांचे नावाचे साधर्म्य होते. परंतु याच व्हेरिफिकेशनला वेळ लागल्याने सुरेश यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांचे मित्र सांगतात.