केरळ हत्तीण : गर्भार हत्तीणीचा मृत्यू, सर्वत्र संताप

बुधवार, 3 जून 2020 (21:54 IST)
-इमरान कुरेशी
 
फटाके भरलेलं अननस खाऊ घातल्याने एका गर्भार हत्तीणीचा केरळमध्ये मृत्यू झालाय. माणूस आणि प्राण्यांतला संघर्ष पुन्हा एकदा यामुळे समोर आलाय.
 
ही हत्तीण 14-15 वर्षांची असावी असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.
 
स्फोटकांमुळे या हत्तीणीला इतक्या वेदना झाल्या की ती तीन दिवस वेलियार नदीत उभी होती आणि मदतीसाठी आलेलं पथक तिच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या हत्तीणीने सोंड आणि तोंड पूर्णवेळ पाण्यात बुडवून ठेवलं होतं.
 
पलक्कडमधल्या सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कचे वॉर्डन सॅम्युअल पचाऊ यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "तिला जिथे जखम झाली होती ती जागा आम्हाला मिळालीच नाही. ती फक्त पाणीच पीत होती. कदाचित यामुळे तिला बरं वाटत असावं. तिच्या पूर्ण जबड्याला दोन्ही बाजूंना गंभीर जखमा झाल्या होत्या. दातही तुटले होते."
 
पलक्कड जिल्ह्यातल्या मन्नारकड भागाचे वनाधिकारी सुनीलकुमार यांनी बीबीसीला सांगितलं, "25मेला ही हत्तीण वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडली, ती रस्ता चुकून जवळच्या शेतांमध्ये गेली होती. कदाचित तिच्या पोटातल्या पिलासाठी तिला काही खायचं असावं."
 
रॅपिड रिस्पॉन्स टीमचे वनाधिकारी मोहन कृष्णन यांनी फेसबुकवर याविषयी एक भावनिक पोस्ट लिहील्यानंतर ही घटना सगळ्यांना समजली. जखमी झाल्यानंतर ही हत्तीण गावातून पळत बाहेर पडली पण तिने कोणालाही इजा केली नाही, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलंय.
 
"म्हणूनच मी म्हटलं, की ती कनवाळू होती," या हत्तीणीचा फोटो पोस्ट करत कृष्णन यांनी म्हटलंय. या हत्तीणीला झालेली जखम किंवा होणाऱ्या वेदना या फोटोंमधून दिसत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
 
"पशुवैद्यांना हत्तीणीला उपचार करता यावेत म्हणून आम्ही तिला नदीतल्या त्या जागेतून बाहेर काढण्यासाठी अधिकारी आणि दोन प्रशिक्षित हत्ती बोलावले. पण ती जागची हलली नाही. आम्ही ऑपरेशनची तयारी करण्याआधीच तिचा मृत्यू झाला," सुनील कुमार यांनी सांगितलं.
 
पाण्यात उभ्या या हत्तीणीचा 27 मेला मृत्यू झाला. तिचा मृतदेह जवळच्याच एका ठिकाणी नेऊन पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. ही हत्तीण गर्भार असल्याचं त्यावेळी अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं.
 
कृष्णन लिहितात, "ती एकटी नव्हती, असं या हत्तीणीचं पोस्टमॉर्टंम करणाऱ्या डॉक्टरने मला सांगितलं. त्यांच्या चेहरा मास्कमुळे झाकला गेला होता, पण त्यांचं दुःख मला समजलं. आम्ही तिथेच या हत्तीणीवर अंत्यसंस्कार केले. तिच्यापुढे झुकत तिला श्रद्धांजली वाहिली."
 
याप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पचाऊ यांनी सांगितलं. आणि "या कृत्यामागे ज्यांचा हात आहे त्यांना शोधण्यासाठी आम्ही यंत्रणा कामाला लावली आहे," असंही त्यांनी सांगितलं.
 
माणूस आणि प्राण्यांमधला हा संघर्ष निलांबर वन क्षेत्रासाठी नवा नाही. हा भाग केरळच्या मलप्पुरम आणि पलक्कड जिल्ह्यातल्या आणखी चार वनक्षेत्रांना लागून आहे.
 
"याआधीही माणूस आणि प्राण्यांमधला संघर्ष पहायला मिळालेला आहे. पण पहिल्यांदाच स्फोटकांनी अशाप्रकारे एखाद्या हत्तीला जखमी करण्यात आलं." पाचू यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती