प्रतिभा पाटील: सोनिया गांधींच्या 'त्या' वाक्यानं भारतात इतिहास घडवला…

बुधवार, 22 जुलै 2020 (12:03 IST)
प्रतिभा पाटील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या त्या दिवसाला आज म्हणजे 21 जुलै 2020 रोजी 13 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने प्रतिभा पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय कसा घेतला गेला, त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती याचा घेतलेला आढावा.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा भारताच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपत आला आणि नव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलं होतं. ते वर्ष होतं 2007...
 
दिल्लीत सोनिया गांधींनी '10, जनपथ' या निवासस्थानी युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स अर्थात युपीएच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. युपीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचं नाव ठरवण्यासाठी हे सर्वजण जमले होते.
 
बैठकीत विविध नावांची पडताळणी सुरू झाली. नेहमीसारखं सर्वात आधी सर्व राज्यांच्या राज्यपालांची यादी पाहिली गेली. त्यात कुणी राष्ट्रपतीपदाचा उमेदार बनू शकतो का, याची शहानिशा केली जात होती.
 
एक एक नाव पाहत असतानाच राजस्थानच्या तत्कालीन राज्यपालांचं नाव पुढे आलं आणि सोनिया गांधी पटकन म्हणाल्या, "आजवर भारतात कुणी महिला राष्ट्रपती झाली नाही."
सोनिया गांधींच्या समोर बसलेले सर्व दिग्गज नेते सगळं समजून गेले. सोनिया गांधी यांचं ते वाक्य म्हणजे, राजस्थानच्या तत्कालीन राज्यपालांना राष्ट्रपतीपदासाठी युपीएकडून उमेदवार बनवण्यावर शिक्कामोर्तब होता.
राजस्थानच्या तत्कालीन राज्यपाल - म्हणजेच युपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार ठरलेल्या व्यक्ती होत्या - प्रतिभा पाटील.
 
शरद पवारांनीच हा प्रसंग प्रतिभा पाटलांच्या गौरव सोहळ्यात सांगितला होता. पवारांनी पुढे म्हटलं होतं की, राजकारणाच्या पलिकडे जात मैत्री जपणारे भैरवसिंग शेखावत त्यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभे होते. भैरवसिंग शेखावत हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. मात्र, प्रतिभा पाटलांनाही चांगला पाठिंबा मिळाला.
 
इथे नमूद करावं लागेल की, भाजपप्रणित एनडीएकडून भैरवसिंग शेखावत उमेदावर होते. मात्र, तरीही तेव्हा एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने 'महाराष्ट्राची कन्या' म्हणून प्रतिभा पाटील यांनाच पाठिंबा दिला होता.
 
अशा तऱ्हेने प्रतिभा पाटील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरल्या आणि जिंकल्याही. त्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक विजयी झाल्या, त्या दिवसाला आज म्हणजे 21 जुलै 2020 रोजी 13 वर्षे पूर्ण झाली.
प्रतिभा पाटील यांच्या रुपानं भारताला पहिल्यांदाच महिला राष्ट्रपती लाभल्या. प्रतिभा पाटील 2012 पर्यंत देशाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत राहिल्या. त्यांच्या कारकीर्दीतल्या बऱ्याच गोष्टींचा आजही अनेकजण कौतुकानं उल्लेख करतात.
राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढे त्या सार्वजनिक जीवनात फारशा सक्रीय राहिल्या नाहीत. अगदीच कुठला महत्त्वाचा कार्यक्रम, गौरव समारंभ किंवा शासकीय कार्यक्रम इथवरच त्यांनी आपलं सार्वजनिक आयुष्य मर्यादित केलं. राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या.q
प्रतिभा पाटील राष्ट्रपती हे महाराष्ट्राचं भाग्य - बाळासाहेब ठाकरे
प्रतिभा पाटलांना शिवसेनेनं पाठिंबा दिल्यानं त्यावेळी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण शिवसेना भाजपप्रणित एनडीएचा घटकपक्ष होता. मात्र, तरीही बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसप्रणित युपीएच्या उमेदवार असलेल्या प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता.
त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते, "देशाची पहिली महिला राष्ट्रपती महाराष्ट्रातून असेल, हे चांगले संकेत आहेत. महाराष्ट्राचं भाग्य आहे की, मराठी महिला राष्ट्रपती बनतेय."
 
एनडीएकडून बाळासाहेब ठाकरेंच्या मनधरणीसाठी बरेच प्रयत्न केले गेले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे प्रतिभा पाटलांनाच पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले.
कधीही पराभूत न झालेल्या राजकारणी
प्रतिभा पाटलांमधील राजकीय गुण हेरले ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी. प्रतिभा पाटलांच्या राजकीय प्रवेशासही यशवंतराव चव्हाण कारणीभूत होते, असं म्हटलं तरी अतिशयोक्ति ठरणार नाही.
 
प्रतिभा पाटलांच्या संकेतस्थळावरच यासंदर्भात एक किस्सा आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात पार पडलेल्या राजपूत समाजाच्या मेळाव्यात प्रतिभा पाटील यांचं एक भाषण झालं. या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण उपस्थित होते.
 
राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा विषयात एमए केलेल्या प्रतिभा पाटलांच्या अभ्यासपूर्ण भाषणानं यशवंतारावांनाही आनंद झाला. प्रतिभा पाटलांनी राजकारणात यावं, असं त्यांनीच प्रतिभा पाटलांच्या वडिलांना सुचवलं.
पुढे 1962 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानं प्रतिभा पाटलांना तिकीटही दिलं आणि त्यात त्या विजयी झाल्या. वयाच्या 27 व्या वर्षी त्या आमदार झाल्या. पुढे मग त्यांची राजकीय कारकीर्द कधीच थांबली नाही. 1965 ते 1985 या एवढा कालावधी त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत विजयी होऊन जात होत्या.
 
1984 नंतर त्या राज्यसभेत गेल्या. 1986 ते 1988 या कालावधीत त्या राज्यसभेच्या उपसभापतीही राहिल्या. राज्यसभेच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केलं.
 
2004 ते 2007 या कालावधीत प्रतिभा पाटील यांनी राजस्थानचं राज्यपलपद सांभाळलं. त्यानंतर मग भारताचं राष्ट्रपतीपद.
इथे एक गोष्ट नमूद करावी लागेल की, आजवर म्हणजे संपूर्ण कारकीर्दीत प्रतिभा पाटील एकही निवडणूक पराभूत झाल्या नाहीत.
आमदार झाल्यावरही शिक्षण सुरू
19 डिसेंबर 1934 रोजी जन्मलेल्या प्रतिभा पाटील सहा भावंडांमध्ये एकटीच मुलगी. प्रतिभा पाटील दहा वर्षांच्या असताना त्यांचं मातृछत्र हरपलं. नंतर मावशी आणि वडिलांच्या मायेत प्रतिभा पाटील लहानाच्या मोठ्या झाल्या.
 
त्या काळात चाळीसागावसारख्या ग्रामीण भागात मुलींचं शिक्षण फारसं नव्हतं. प्रतिभा पाटलांनी त्या काळाताही उच्च शिक्षण घेतलं. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र अशा विषयात एमएची पदवी घेतली.
1962 साली ज्यावेळी वयाच्या 27 व्या वर्षी त्या आमदार झाल्या, त्यानंतरही त्यांनी शिक्षण सोडलं नाही. आमदार बनल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. शिक्षणाची अफाट गोडी त्यांना लहानपणापासून असल्याच्या त्या स्वत: सांगतात.
 
अमरावती मतदारसंघाचे माजी आमदार देवीसिंह शेखावत यांच्याशी 1965 साली प्रतिभा पाटील यांचं लग्न झालं. त्यांचा मुलगा रावसाहेब शेखावत आमदार होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती