हरियाणात पोलिसांकडून महिलेला पट्ट्यानं निर्दयी मारहाण, पण का?
- सत सिंह
पोलीस रात्रीच्यावेळी एका महिलेला बेदम मारहाण करत असल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हरियाणातल्या फरिदाबादमध्ये हा प्रकार घडला आहे.
रात्रीची वेळ होती. काही पोलिसांनी एका महिलेला पार्कमध्ये घेरलं होतं. तिची त्याठिकाणी चौकशी करत असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यानंतर अचानक कमरेच्या बेल्टने त्याच ठिकाणी तिला मारहाण करायला सुरुवात होते.
जवळजवळ साडेचार मिनिटांच्या या व्हीडिओत हरियाणा पोलिसांचा राक्षसी चेहरा दिसून येतो. या व्हीडिओत एकही महिला पोलीस उपस्थित नसल्याचं दिसत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हीडिओ 6 महिन्यांपूर्वीचा आहे.
त्यावेळी फरिदाबादमधल्या आदर्शनगर पोलीस स्थानकातल्या पोलिसांना एका पार्कमध्ये अनैतिक गोष्टी होत आहेत अशी माहिती मिळाली होती.
त्याच दरम्यान, पार्कमध्ये एक महिला आणि एक पुरुष चाळे करत असल्याची टीप पोलिसांना मिळाली. पोलीस पार्कजवळ पोहोचले तेव्हा 'त्या' पुरुषाने तिथून पळ काढला, पण पोलिसांनी महिलेला पकडलं.
त्या व्हीडिओतलं संभाषण बारकाईनं ऐकलं तर एक पोलीस महिलेला पळून गेलेल्या पुरुषाविषयी माहिती विचारत असल्याचं दिसतं. दुसरा पोलीस ते दोघे पार्कमध्ये काय करत होते हे सांगण्यासाठी दबाव टाकत होता.
महिलेनं योग्य उत्तरं दिली नसल्याच्या कारणांवरून पोलीस तिला बेल्टने मारत असल्याचं दिसतं.
सोमवारी (27 मे) हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर हरियाणा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 342/323/509 अंतर्गत 5 पोलिसांवर कारवाई केली आहे. यामध्ये 2 पोलिसांना निलंबित केलं तर 3 SPO पोलिसांची सेवा समाप्त केली आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त नवदीप विर्क यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हीडिओ ऑक्टोबर 2018चा आहे. त्यावेळी पीडित व्यक्तीने पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली नव्हती.
या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्यासाठी पोलीस त्या महिलेच्या शोधात आहेत. अशा घटना पोलिसांची प्रतिमा धुळीला मिळवतात. त्यामुळे हे कधीही खपवून घेतलं जाणार नाही, असं फरिदाबादच्या पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे.
त्या महिलेला हवी ती मदत करण्याचं पोलिसांनी आश्वासनं दिलं आहे. तसंच दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी नोटीस हरियाणा राज्य महिला आयोगानं पाठवली आहे, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा प्रतिभा सुमन यांनी बीबीसीला दिली आहे.
"पोलिसांनी लवकरात लवकर FIR दाखल करावा. त्या महिलेसोबत अशी घटना का घडली याबाबत दोन दिवसात माहिती द्यावी. हे एका महिलेचं प्रकरण होत तर त्याठिकाणी महिला पोलिस का उपस्थित नव्हती," असं त्यांनी प्रतिभा सुमन यांनी म्हटलं आहे.