पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांना भाजप कसं हाताळणार?
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (10:15 IST)
-श्रीकांत बंगाळे
पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे या दोन्ही भाजपच्या नेत्यांनी गोपीनाथ गडावरून त्यांची नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.
"आपण पक्षातच राहणार. आता बॉल भाजपच्या कोर्टात आहे. मी पक्षाला सोडणार नाही, पण पक्षाला जर मला सोडायचं असेल, तर त्यांनी निर्णय घ्यावा. मी आता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं पुढील काम करणार आहे," असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं..
तर "भाजपची वाटचाल गेली 40 वर्षं आम्ही पाहिली आहे. शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून पक्षाला ओळखलं जायचं, त्या पक्षाला बहुजन पक्षाचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं, " असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. त्यामुळे आता पंकजा मुडे, एकनाथ खडसे या नेत्यांची नाराजी भाजप कशी दूर करणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
'पक्षात सामावून घ्यावं लागेल'
पंकजा मुंडे यांना पक्षात सामावून घ्यावं लागेल, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात.
कट्टा न्यूजचे संपादक सुधीर सूर्यवंशी म्हणतात, "माधव म्हणजेच माळी, धनगर आणि वंजारी हा गट भाजपचा मतदार आहे. तो भाजपपासून दूर गेल्यास ती भाजपसाठी धोक्याची घंटा ठरेल. त्यामुळे ही व्होटबँक कायम ठेवण्यासाठी पंकजा मुंडे, एकनाथ खडसे या नेत्यांना भाजपला सामावून घ्यावं लागेल. त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं लागेल, ते शक्य नसल्यास या नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रियेत स्थान द्यावं लागेल."
तर राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या मते, "भाजपमधील अंतर्गत गटबाजीला जातीय रंग प्राप्त झाले आहे. पंकजांना डावलणं म्हणजे ओबीसींना डावलणं आहे का, असा प्रश्न उपस्थित होईल. ब्राह्मण समाजाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेच जर मराठा समाजाचे असते, तर असा प्रसंग उद्भवला असता का, हाही प्रश्न उपस्थित होईल." "पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली, तर त्यांचं बंड शमू शकतं. भाजपची व्होट बँक ओबीसी आहे, त्यामुळे पंकजा मुंडेंना दुखावून चालणार नाही. त्यांना सामावून घ्यावं लागेल," देसाई पुढे सांगतात.
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या मते, "जोपर्यंत विधानपरिषदेच्या नियुक्त्या जाहीर होत नाही आणि प्रदेशाध्यक्षपदाची निवड होत नाहीत, तोपर्यंत नाराज गट सक्रिय राहिल. यापैकी काही एक ठिकाणी पंकजा मुंडेंना जागा न मिळाल्यास त्या मात्र वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे."
प्रतिष्ठानच्या माध्यमातून दबावतंत्र?
गोपीनाथगडावरील कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, पाशा पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
विजय चोरमारे सांगतात, "देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ज्यांचं दमन करण्यात आलं, ते नेते आता एकत्र आलेत. पंकजा मुंडेंच्या मेळाव्यामुळे या सगळ्या नाराज नेत्यांना एक व्यासपीठ मिळालं आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी जाहीर केलंय. याचा अर्थ पराभव झाला असताना मतदारसंघ बांधण्याचा विचार न करता त्या यापद्धतीनं पक्षावर दबाव आणू पाहत आहेत."
तर राजकीय विश्लेषक राही भिडे यांच्या मते, "गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक कार्य करणार, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. तेव्हा त्या भविष्यात वेगळा पक्ष काढणार, असा प्रश्न उपस्थित होतो. शिवाय, प्रतिष्ठानच्या माध्यमातून पक्षावर सतत दबावाची टांगती तलवार ठेवणार का, हे पाहावं लागेल. पण, प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या राजकीय काम करणार असल्यास पक्ष त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करेल का, हेही पाहावं लागेल."
अमित शाह आणि पंकजा यांचं समीकरण कसं?
चंद्रकांत पाटील या कार्यक्रमाला कशाकरता उपस्थित होते, असा प्रश्न हेमंत देसाई उपस्थित करतात.
ते म्हणाले, "अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचं समीकरण पाहिजे तितकं चांगलं नाही. पण, चंद्रकांत पाटील आणि अमित शाह यांचं मात्र चांगलं जमतं. चंद्रकांत पाटील या मेळाव्याला उपस्थित होते, त्यामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला अमित शाह यांची मंजुरी नाही, असंही त्यांच्या उपस्थितीतून सांगण्याचा प्रयत्न असू शकतो."
पण, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांच्या मते, "अमित शाह हे राजकीयदृष्ट्या व्यावहारिक नेते आहेत. प्रत्येक नेत्याची राजकीय ताकद बघून ते त्याचा वापर करतात किंवा त्याल बाजूला सारतात. पण, भाजपकडून मुंडे आणि खडसे यांना विश्वासात न घेण्याची चूक नक्कीच झालीय. या दोघांनाही पक्षानं निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यायला पाहिजे होतं."
भाजपची भूमिका काय?
पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या भूमिकेनंतर भाजपची भूमिका समजून घेण्यासाठी आम्ही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांना पक्षात सामावून घेण्यासाठी 100 टक्के प्रयत्न केले जातील, असं त्यांनी म्हटलं. ते म्हणाले, "पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हे नेते भाजपचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्याशी संवाद, चर्चा करून त्यांची नाराजी दूर करू आणि पक्षाचा विस्तार करू."
पण, पंकजा मुंडे पक्षात राहून प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार आहेत, याविषयी ते म्हणाले, "पंकजा ताई फक्त काही कामं प्रतिष्ठानच्या माध्यमातून करणार आहेत. त्यांनी काही भाजप सोडलेला नाही."
या नेत्यांची नाराजी कशी दूर करणार, विधानपरिषदेवर घेणार का, यावर ते म्हणाले, "आता याबाबत आमची चर्चा सुरू होईल. विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर याविषयी निर्मय घेतला जाईल. या नेत्यांना पक्षात सामावून घेण्यासाठी आम्ही 100 टक्के प्रयत्न करणार आहोत."