एकीकडे प्रचंड पाऊस तर दुसरीकडे दुष्काळ भारतातल्या हवामानाला झालंय तरी काय?

शुक्रवार, 12 जुलै 2019 (09:52 IST)
गेल्या काही आठवड्यांमध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये झालेला नेहमीपेक्षा मुसळधार पाऊस किंवा मग देशामध्ये इतरत्र असणारा भीषण दुष्काळ. असं टोकाचं हवामान आता वरचेवर का आढळतंय याविषयी आता चर्चा सुरू झालेली आहे.
 
गेल्या काही काळामध्ये पडलेला पाऊस आणि दुष्काळाची आकडेवारी तपासत यामधून काही पॅटर्न समोर येतंय का हे शोधण्याचा प्रयत्न रिएलिटी चेक टीमने केला.
 
भारत पाण्यासाठी दरवर्षी मान्सूनदरम्यान पडणाऱ्या मुसळधार पावसावर अवलंबून असतो.
 
भारताच्या विविध भागांमध्ये पाऊस वेगवेगळ्या वेळी दाखल होतो. पाऊस लवकर दाखल झाला किंवा उशिरा आला तरी त्याचे भयंकर परिणाम शेतकऱ्यांवर होतात. जर नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडला तर शहरी भागांमध्ये त्याचे मोठे परिणाम होतात.
 
गेल्या काही दिवसांत मुंबईवर याचा सर्वांत जास्त तडाखा बसला असून पाणी तुंबल्याने किमान 30 जणांचा बळी गेला आहे. शहरातल्या पायाभूत सुविधा या अनियमित पावसाला तोंड देण्यात अपुऱ्या पडत असल्याचं शहराच्या महापालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण यामध्ये दीर्घकालीन सातत्य आहे का?
 
देशभरातल्या पावसावर लक्ष ठेवणाऱ्या 36 वेधशाळांकडून मिळालेल्या आकडेवारीवरून कोणताही विशिष्ट पॅटर्न दिसून येत नाही.
 
पावसाचा अंदाज वर्तवता येत नाही, किंवा पावसामध्ये अनियमितता आहे हे खरं असलं तरी 2002 पासूनची आकडेवारी पाहिल्यास त्यामधून अति प्रमाणात पाऊस पडल्याचं आढळत नाही.
जास्त किंवा कमी पाऊस
2006 ते 2015 या कालावधीमध्ये पुराच्या 90 मोठ्या घटना घडल्या असून यामध्ये जवळपास 16,000 जणांचा जीव गेल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालामध्ये म्हटलं आहे.
 
प्रमाण जरी वाढलेलं असलं तरी गेल्या दोन दशकांमध्ये पूर येण्याच्या प्रमाणात मोठा बदल झाल्याचं दिसून येत नाही.
 
दुष्काळाचं काय?
एकीकडे मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडून पाणी तुंबत असताना देशाचा बहुतेक भाग मात्र कोरडा आहे.
 
दक्षिणेकडील चेन्नई शहरामध्ये पाऊस वेळेवर न पडल्याने भयानक पाणी टंचाई निर्माण झालेली आहे.
 
भारतामध्ये जूनमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेदरम्यान अनेक भागांमधलं तापमान 45 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचलेलं होतं.
 
एकंदरीत संपूर्ण भारतापैकी 44% भाग दुष्काळग्रस्त असल्याचा अंदा आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण 10 टक्क्याने जास्त आहे.
 
मग भारतातल्या गेल्या काही कालावधीतल्या तापमानाच्या आकडेवारीवरून काही लक्षात येतंय का?
 
उष्णतेच्या लाटेत आणि थंडीच्या लाटेत वाढ
एखाद्या भागातल्या नेहमीच्या तापमानापेक्षा सलग दोन दिवस तापमान साडेचार सेल्सियसने जास्त असल्यास उष्णतेची लाट असल्याचं जाहीर करण्यात येतं.
 
1980 ते 1999 या कालावधीमध्ये 213वेळा उष्णतेची लाट आली.
 
साधारण इतक्याच वर्षांच्या काळात, 2000 ते 2018 दरम्यान उष्णतेची लाट 1400 वेळा आली.
 
टोकाची उष्णता आणि थंडीच्या प्रमाण 2017 आणि 2018मध्ये झालेली वाढही लक्षात येण्याजोगी आहे. पण टोकाच्या हवामानाचा भविष्यातला अंदाज फारसा उत्साहवर्धक नाही.
 
संशोधकांच्या आंततराष्ट्रीय पथकाने केलेल्या अभ्यासानुसार 2100 पर्यंत भारतातील 70% शहरांना कमालीची उष्णता आणि आर्द्रतेचा सामना करावा लागेल. ग्लोबल वॉर्मिंग हे यामागचं सर्वांत मोठं कारण असेल.
 
पूर कमी करण्यासाठी काय नियोजन करता येईल?
शहराचं नियोजन करणाऱ्यांना पावसाळ्यादरम्यान दरवर्षी कोणत्या अडचणी येतात यासाठीचं मुंबई हे चांगलं उदाहरण आहे.
 
2005मध्ये आलेल्या पुरामध्ये 900 जणांचा बळी गेल्यानंतर शहरामधलं पाणी उपसून टाकण्यासाठी आठ पंपिग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातली दोन पंपिंग स्टेशन्स अजूनही बांधून झालेली नाही.
 
शहरातला बहुतेक भाग हा समुद्रात भराव टाकून करण्यात आलेल्या (रिक्लेम्ड) जागेवर असून दरवर्षी पावसाळ्यामध्ये होणारी दैना ही गलथान नियोजन आणि झपाट्याने झालेलं बांधकाम यामुळे होत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
 
मुंबईत साठलेल्या पाण्याचा निचरा करणारी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम (ब्रिमस्टोवॅड) ही अनेक शतकांची जुनी आहे आणि ती समुद्रात आणि शहरातल्या मिठी नदीमध्ये हे पाणी सोडते. पण जर ऐन भरतीच्या वेळीच भरपूर पाऊस पडला तरी पाणी बाहेर पडण्याचे हे दोन्ही मार्ग बंद होतात.
 
शिवाय या दोन्ही मार्गांच्या क्षमतेवर गाळ आणि घन कचरा टाकल्याने (डम्पिंग) परिणाम झालेला आहे.
 
शहराची ड्रेनेज सिस्टीम सुधारण्याची योजना 1993मध्येच सुरू करण्यात आली असली तरी पुरेशी पावलं उचलण्यात आली नसल्याचं टीकाकार म्हणतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती