मोरबीसोबत नरेंद्र मोदींचं जुनं कनेक्शन, माच्छू नदीवरचा बांध फुटला आणि...

मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (08:37 IST)
रेहान फझल
मोरबी येथे झुलता पूल कोसळल्यामुळे 141 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (1 नोव्हेंबर) मोरबीला भेट देणार आहेत.
 
या मोरबी, माच्छू नदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जुनं नातं आहे. मोरबीतूनच त्यांनी सार्वजनिक आयुष्यात प्रवेश केला होता.
 
मोदींनी तिथे काय आणि कसं काम केलं याच्याविषयी जाणून घेण्याआधी मोरबीत 43 वर्षाआधी काय झालं होतं ते आधी जाणून घेऊ या.
 
ही गोष्ट आहे 11 ऑगस्ट 1979 ची. राजकोट जवळ असलेल्या मोरबीत संपूर्ण जुलै महिना पाऊस झाला नव्हता. मात्र ऑगस्ट येता येताच तिथे जोरदार पाऊस सुरू झाला.
 
मोरबीच्या जवळून वाहणाऱ्या माच्छू नदीवर दोन बांध तयार केले होते. माच्छू नदीवर 22.56 मीटर उंच आणि दुसरा बांध 1972 मध्ये तयार झाला होता. 10 ऑगस्ट 1979 च्या संध्याकाळी माच्छू नदीवर असलेल्या बांध नंबर 1 मधून पाणी सोडायला सुरुवात केली होती.
 
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या बांधाचेही दरवाजेही उघडण्यात आले. मात्र तांत्रिक कारणामुळे दोन दरवाजे उघडले गेले नाहीत. त्यामुळे बांधामध्ये अतिरिक्त पाणी जमा झालं. तिथे पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता.
 
भयावह दृश्य
दुपारी एक वाजताच्या सुमारास बांधाच्या वरून पाण्याचे लोट वाहू लागले. दोन वाजेपर्यंत बांधाच्या वरून दीड ते दोन फूट उंचीवरून पाणी वाहत होतं. सव्वा दोन वाजता बांधाच्या डाव्या बाजूची माती वाहायला सुरुवात झाली. थोड्यावेळात उजव्या बाजूची माती ढासळायला सुरुवात झाली.
 
पाणी इतकं वेगाने वाहत होतं की बांधावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या केबिनमधून बाहेर निघण्याची संधीसुद्धा मिळाली नाही. 20 मिनिटाच्या आत बांधावरचं सगळं पाणी जवळच असलेल्या मोरबी गावात घुसलं.
 
साडे तीन वाजता मोरबी भाग 12 ते 30 फूट पाण्याखाली गेलं होतं. पुढच्या चार तासात संपूर्ण मोरबी शहर पाण्याखाली गेलं. साडेसात वाजता पाणी थोडं कमी झालं. मात्र जवळजवळ संपूर्ण शहराला मृत्यूने विळखा घातला होता.
 
जागोजागी लोकांचे मृतदेह पडले होते. हा पूर आल्यावर आठ दिवसांनी सुद्धा कुजलेल्या मृतदेहांची दुर्गंधी चहुकडे पसरली होती. सगळीकडे ढिगारा पसरला होता. वीजेचे खांब कोसळले होते.
 
सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की स्थानिक प्रशासनाला बांध फुटल्यावरही 15 तास या घटनेची काहीही माहिती मिळाली नव्हती. त्यांना वाटत होतं की पूर आल्यामुळे सातत्याने पाऊस पडत आहे.
 
घटनेच्या 24 तासानंतर 12 ऑगस्टला ही बातमी पहिल्यांदा रेडिओवर आली. बचाव कार्यासाठी लष्कराच्या जवानांना मोरबीला पाचारण करण्यात आलं. मात्र ते 48 तासानंतर म्हणजे 13 ऑगस्टला तिथे पोहोचले.
 
टेलिग्रामची सेवा खंडित झाल्यामुळे स्थानिक प्रशासन ही माहिती जिल्हा मुख्यालय असलेल्या राजकोटलाही पोहोचवू शकले नाहीत. टेलिफोनने संपर्क करण्याचा तर प्रश्नच नव्हता. कारण तिथले फोन वाहून गेले होते.
 
सरकारी आकडेवारीनुसार जवळजवळ 1000 लोक या घटनेत मृत्यूमुखी पडले होते. मात्र गैर सरकारी आकडेवारीनुसार हा आकडा 25000 होता. या घटनेच्या एक आठवड्यानंतर जेव्हा राष्ट्रीय प्रसारमाध्यमं तिथे पोहोचली तेव्हा मोरबी शहरात भुताटकी झाल्यासारखं वातावरण होतं.
 
नरेंद्र मोदी बचाव कार्यात उतरले
कधीकधी मोठ्या राजकीय गोष्टींची सुरूवात मात्र अराजकीय कारणांमधून झालेली पहायला मिळते. त्यावेळी बाबू भाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळात भारतीय जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते केशुभाई पटेल सिंचन मंत्री होते.
 
मोरबीमध्ये अचानक आलेल्या पुराची बातमी ऐकल्यानंतर केशुभाई तातडीने मोरबीकडे रवाना झाले. मात्र माच्छू नदीचं पाणी सगळीकडे घुसलं होतं आणि ते शहरात जाऊच शकले नाहीत.
 
सुरुवातीच्या काळात तर कोणतंही साहित्य मोरबीपर्यंत पोहोचत नव्हतं. पूर्ण सरकारी यंत्रणा एकप्रकारे पंगू बनली होती. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींनीही खूप दिवस लोटल्यावर पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बऱ्याच काळानंतर मोरबीचा दौरा केला.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी मोरबीला मदत पोहचविण्याचा विडाच उचलला. त्यावेळी नरेंद्र मोदी आरएसएसचे पूर्णवेळ प्रचारक होते. संघाचे ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांच्यासोबत ते चेन्नईमध्ये होते.
 
मोरबीमधील परिस्थिती ऐकल्यानंतर ते तातडीने गुजरातला परतले आणि त्यांनी मोरबीमध्ये बचावकार्य सुरु केलं.
 
मोरबी धरण दुर्घटनेत लोकांच्या बरोबरीने उभं राहिल्यामुळे त्यांच्यामध्ये आरएसएस बद्दल आपुलकीची भावना वाढली.
 
ही पहिलीच घटना होती, जेव्हा नरेंद्र मोदी सार्वजनिक व्यासपीठावर आले होते. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. या घटनेनंतर 22 वर्षांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले.
 
ऐंशीच्या दशकाच्या शेवटी माच्छू धरण पुन्हा बनवलं गेलं. मणि मंदिराच्या बाहेरच त्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचं स्मारक बनवलं गेलं. तिथे आजही दरवर्षी 11 ऑगस्टला लोक श्रद्धांजली द्यायला येतात.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती