जीडीपी विकास दराच्या परीक्षेत नरेंद्र मोदी पास की नापास?
बुधवार, 2 जून 2021 (16:08 IST)
ऋजुता लुकतुके
2020-21 आर्थिक वर्षासाठीचा भारताचा जीडीपी विकास दर उणे 7.3% इतका होता. म्हणजे आपली अर्थव्यवस्था यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत आकुंचित झाली.
मागच्या 70 वर्षांतील हा नीचांक आहे. पण, हे आकडे आपल्या अर्थव्यवस्थेबद्दल नेमकं काय सांगतात? महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये देशाची कामगिरी कशी होती? आणि भारताच्या तुलनेत बाकीच्या देशांची कामगिरी कशी होती?
या आठवड्यात योगायोगाने दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. 30 मे ला नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळाची दोन वर्षं 30 मे 2021ला पूर्ण केली. आणि सत्तेतला त्यांचा एकूण कालावधी झाला सात वर्षं तर 31 मे ला म्हणजे काल देशाची वर्षभरातली आर्थिक कामगिरी सांगणारा जीडीपी विकास दरही जाहीर झाला.
देशाचं हे आर्थिक रिपोर्ट कार्ड असं सांगतं की, आर्थिक वर्षं 2020-21 मध्ये देशाचा आर्थिक विकासदर उणे किंवा वजा 7.3% होता. म्हणजे आपली अर्थव्यवस्था इतक्या टक्क्यांनी घसरली किंवा कमी झाली. आता या अख्ख्या वर्षात आपण आणि जगानेही कोरोनाचा मारा सहन केलाय. त्यामुळे विकासदर कमीच असेल हा अंदाज होताच. पण, आपली कामगिरी जगातल्या इतर देशांच्या तुलनेत कशी होती? आणि कृषी, उत्पादन अशा महत्त्वाच्या क्षेत्रांनी कशी कामगिरी केलीय हे समजून घेऊया.
देशाचा विकास दर कमी झाला म्हणजे काय?
देशाचा जीडीपी म्हणजे एका आर्थिक वर्षांत देशभरात जितक्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं किंवा वस्तू, सेवांची देवाण घेवाण झाली त्याचा संपूर्ण खर्च म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन किंवा जीडीपी.
आपला ताजा जीडीपी विकास दर आपल्या अर्थव्यवस्थेविषयी काय सांगतो ते समजून घेऊया...
आपण भारतात आर्थिक वर्षं एप्रिल ते मार्च असं मोजतो. म्हणूनच इथं आर्थिक वर्षं आहे एप्रिल 2020 ते मार्च 2021.
आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत आपलं देशांतर्गत सकल उत्पन्न या कालावधीत 7.3% नी कमी झालंय. 2020-21 मध्ये आपल्या देशाचं सकल उत्पन्न 135.13 लाख कोटी इतकं होतं. जे आधीच्या वर्षी 145.69 लाख कोटी होतं.
खरंतर 1980-81 नंतर पहिल्यांदा आपली अर्थव्यवस्था निगेटिव्ह गेलीय. आणि मागच्या सत्तर वर्षांचा हा नीचांक आहे.
पण, सुरुवातीला म्हटलं तसं हे कोरोना वर्ष होतं. आणि तुम्हाला आठवत असेल तर देशात संपूर्ण लॉकडाऊन असताना म्हणजे एप्रिल ते जून 2020 या तिमाहीतच मूळात आपला जीडीपी 24.7% नी कमी झाला होता. त्यामुळे वर्षभराची एकूण कामगिरी ही शून्याच्या खाली असणार असा अंदाज होताच.
रिझर्व्ह बँक आणि सांख्यिकी मंत्रालयाने आपला विकास दर उणे 8% पर्यंत घसरेल असा अंदाज व्यक्त केला होता. मूडीज् सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनीही तो आठच्याही खाली असेल असा अंदाज केला होता. त्यापेक्षा हा विकास दर बरा आहे हीच समाधानाची गोष्ट…
महत्त्वाच्या क्षेत्रांमधील भारताची कामगिरी
आता बघूया कृषी, बांधकाम, कारखान्यांमधलं उत्पादन आणि सेवा या क्षेत्रातली 2020 मधली भारताची कामगिरी कशी होती?
कृषी क्षेत्र - कोरोनाच्या काळातही दूध, भाजी-पाला, डाळी यांचे भाव अव्वाच्या सव्वा वाढले नाहीत.
कारण, आधीच्या वर्षी आपलं कृषी उत्पादन सरप्लस म्हणजे गरजेपेक्षा जास्त होतं. आता कोरोना काळातही उत्पादन चांगलं असलं तरी आधीच्या तुलनेत घटलं आहे. 2019-20 मध्ये कृषि उत्पादन 4.3% नी वाढलं होतं. ही वाढ यंदा आहे 3.6%
उत्पादन क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत सुधारणा असली तरी आताही वाढ ही निगेटिव्ह मध्येच आहे.
गेल्यावर्षी उत्पादन क्षेत्रात 2.4% नी घट झाली होती. ती वाढून यंदा 7.2% झाली आहे.
बांधकाम क्षेत्र देशात सर्वाधिक रोजगार पुरवतं. पण, यंदा बांधकाम क्षेत्रातलं उत्पन्न 8.6% नी कमी होईल असा अंदाज आहे. गेल्यावर्षी बांधकाम क्षेत्राचा विकास दर 1% होता. भारत सेवा क्षेत्रात अग्रेसर आणि एक प्रमुख निर्यातदार देश आहे. तिथे लॉकडाऊन आणि कोरोनाचा फारसा परिणाम दिसलेला नाही. आपला सेवा क्षेत्रातला विकास दर 6.9% होता. आधीच्या वर्षाच्या तुलनेत तो फक्त 0.7%नी कमी झाला.
कोरोनामुळे भारताचं नेमकं किती नुकसान झालंय? आणि येणारा काळ अर्थव्यवस्थेसाठी कसा आहे?
अर्थतज्ज्ञ आशुतोष वखरे यांच्या मते 2020 हे वर्षं कोरोना वर्ष असल्यामुळे या वर्षातील कामगिरीवर
फारसं लक्ष देण्याची गरज नाही. उलट जानेवारी ते मार्च 2021 या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकास दर 1.6% म्हणजे पॉझिटिव्ह होता याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
'आपल्या अर्थव्यवस्थेला 7.3%चा फटका बसला हे खरं आहे. पण, चांगली गोष्ट ही आहे की, शेवटच्या
दोन तिमाहींमध्ये म्हणजे सप्टेंबर 2020 पासून अर्थव्यवस्था सावरतेय. आणि या दोन तिमाहींमध्ये आपण विकास दर पॉझिटिव्ह राखण्यात यशस्वी झालो आहोत. या कालावधीत आपलं उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रंही चांगली कामगिरी करत होतं. शिवाय कृषी क्षेत्राचा दरही उत्साह वाढवणारा आहे. सरकारने या सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा ओतलाय हेच यातून दिसतंय. आणि दुसरं म्हणजे देशात परकीय गंगाजळीही वाढत आहे,' आशुतोष वखरे यांनी या जीडीपी आकड्यांतील सकारात्मक मुद्दे सांगितले.
त्याचबरोबर त्यांनी या मुद्यावरही बोट ठेवलं की, येणाऱ्या कालावधीत रोजगार आणि व्यक्तिगत उत्पन्न यावर लक्ष द्यावं लागणार आहे. शिवाय लोकांची खर्च करण्याची क्षमता कमी झाल्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसल्याचं ते म्हणाले.
'पहिल्या लाटेतून सावरत असताना दुसरी लाट आली. आणि आपण तिची कल्पनाही केली नव्हती. त्यामुळे आपल्याला पुन्हा लॉकडाऊन सदृश निर्बंध लावावे लागले आहेत. अशावेळी 2021 साली आपली अर्थव्यवस्था 12%नी सुधारेल म्हणजे कोरोनाचं नुकसान आपण भरून काढू असा जो अंदाज होता तो आता कठीण झालाय. आपण पुढच्या वर्षी जेमतेम 10% विकास दर ठेवू शकू. अशावेळी अर्थव्यवस्थेसमोरचं पुढचं आव्हान मोठं आहे,' असं वखरे म्हणाले.
पण, कोरोना काळात भारताची कामगिरी अशी दोलायमान असताना इतर देशांची आर्थिक कामगिरी कशी होती हे बघणंही महत्त्वाचं ठरेल.
कोरोना काळात इतर देशांची आर्थिक कामगिरी
जीडीपी विकास दर हाच निकष लावायचा झाला तर 2020 मध्ये जीडीपी विकास दरांच्या आधारावर पहिले पाच देश आहेत - अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि युके. भारत युकेच्या खालोखाल सहाव्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी आपण पाचव्या क्रमांकावर होतो.
आता 2020 वर्षासाठीचा स्थूल देशांतर्गत सकल उत्पन्न म्हणजे रियल जीडीपी विकास दर बघितला तर अमेरिकेचा विकासदर उणे 3.5%, चीन 2.3%, युके - उणे 9.76%, जर्मनी उणे 4.9% असा आहे.
थोडक्यात कोरोनाचा फटका सगळ्यांनाच बसलाय. आणि आधीच्या तुलनेत अर्थव्यवस्थेचा विकास दर कमीच आहे. पण, चीन मात्र, कोरोनाचा उद्रेक तिथून सुरू झाला असा आरोप होत असताना लॉकडाऊनमधून सावरला आणि आता अर्थव्यवस्थेची गतीही पूर्ववत होताना दिसतेय.
इथं जाता जाता उल्लेख करायचा तर शेजारच्या पाकिस्तानचा आर्थिक विकास दरही 2020मध्ये पॉझिटिव्ह म्हणजे 1.5% आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.