136 पुरुषांवर दारुच्या बहाण्याने बलात्कार आणि चित्रण करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

बुधवार, 8 जानेवारी 2020 (10:21 IST)
दीडशेहून अधिक लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये दोषी रेयनहार्ड सिनागा या विकृत इसमाला ब्रिटनच्या मँचेस्टर क्राऊन न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
 
136 बलात्काराचे गुन्हे नावावर असलेल्या आरोपीची सुटका करणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही, असं न्यायालयाने निकाल देताना नमूद केलं.
 
मँचेस्टर क्लबबाहेर पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढून तो आपल्या फ्लॅटवर नेत असे. त्यांच्यावर अत्याचार करत असे आणि हा सगळा प्रकार तो चित्रितही करत असे.
 
आमच्याकडे पुरावे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याने जवळपास 190 माणसांना त्रास दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
 
अनेक पीडितांना तर पोलिसांनी संपर्क करेपर्यंत आपल्यावर बलात्कार झाला आहे हे कळलंदेखील नव्हतं.
 
ब्रिटनच्या न्यायिक इतिहासातला सिनागा हा सगळ्यात कुख्यात गुन्हेगार आहे, असं द क्राऊन प्रॉक्झिक्युशन सर्व्हिसने म्हटलं आहे.
 
सिनागाने तुरुंगात किमान 30 वर्षं व्यतीत करायला हवीत असं न्यायाधीशांनी म्हटलं आहे.
 
या खटल्याच्या वृत्तांकनासाठी प्रसारमाध्यमांवर टाकण्यात आलेले निर्बंध मँचेस्टर क्राऊन न्यायालयाने हटवले. त्यामुळे सिनागा कोण हे आता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जगाला कळू शकतं.
 
दोन वर्षांपूर्वीच्या खटल्यात दोषी आढळल्याने सिनागाला याआधीच 20 वर्षांची जन्मठेप सुनावण्यात आली होती. सिनागाने पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
 
चार विविध खटल्यांमध्ये सिनागा दोषी आढळला. शिवाय बलात्काराच्या 136 खटल्यांमध्ये तो दोषी आढळला. बलात्काराचा प्रयत्न करण्याच्या 8 तर लैंगिक अत्याचाराच्या 14 गुन्ह्यांमध्ये तो दोषी आढळला. 48 पीडितांनी सिनागाविरुद्ध तक्रार नोंदवली होती.
 
आणखी 70 पीडितांचा शोध घेता आलं नाही, असं तपासकर्त्यांनी सांगितलं. सिनागाने त्रास दिलेल्या व्यक्तींनी समोर यावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
 
सिनागा हा सराईत विकृत गुन्हेगार असून तो चांगल्या नाईट आऊटकरता लोकांवर अत्याचार करून त्यांचं शोषण करत असे.
 
सिनागा हा अतिशय क्रूर, हिंसक, धोकादायक आणि कारस्थानी माणूस आहे. त्याची सुटका करणं समाजातील अन्य व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही, असं महिला न्यायाधीशांनी सांगितलं.
 
नाईटक्लब आणि बारमधून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना सिनागा गाठत असे. त्यांना फ्लॅटवर नेऊन त्यांच्यावर अत्याचार करत असे. ड्रिंक घेऊया या बहाण्याने तो व्यक्तींना बरोबर नेत असे. ड्रगच्या माध्यमातून व्यक्तीला बेशुद्ध करून त्यांच्यावर अत्याचार करत असे. पीडित व्यक्तीला शुद्ध येई तेव्हा मधल्या काळात काय झालं हे त्यांना आठवतही नसे.
 
सिनागाने हे आरोप नाकारले आहेत. सर्व लैंगिक संबंध सहमतीने झाल्याचं सिनागाचं म्हणणं आहे. प्रत्येक व्यक्तीने झोपलेलं असताना त्यांचं चित्रण करण्याची परवानगी दिली असंही त्याचं म्हणणं आहे.
 
सिनागाने GHB सारख्या ड्रग्जचा वापर केल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं. या ड्रग्जचा वापर करताना पकडलेल्या व्यक्तीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
 
या ड्रग्सचा वापर काळजीचं कारण असल्याचं ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी सांगितलंय.
 
सिनागा हा लीड्स विद्यापीठात पीएचडी करत होता. गेले काही वर्षं तो लोकांचं अशा पद्धतीने शोषण करत होता.
 
सिनागावरील हा खटला मँचेस्टर क्राऊन कोर्टात 18 महिने चालला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती