ABVP : भाजपचा धाकटा भाऊ का आहे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात?
रविवारी (5 जानेवारी) संध्याकाळी चेहरे झाकलेले काही जण दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात घुसले. त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, तोडफोड केली. या हिंसाचाराविरोधात देशभरात असंतोषाची लाट उसळली.
हा हल्ला अतिशय सुनियोजित असून अभाविपचे गुंड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित प्राध्यापकांनी संगनमतानं हा घडवून आणला आहे, असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोष हिनं केला आहे.
तर दुसरीकडे अभाविपचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आशिष चौहान यांनी हा डाव्या संघटनांनी केलेला नियोजनबद्ध हल्ला असल्याचं म्हटलं.
या हिंसाचारामुळे JNU, तिथलं विद्यार्थी संघटनांचं राजकारण आणि अभाविप पुन्हा चर्चेत आलं आहे.
वेगवेगळ्या विद्यापिठांमध्ये अभाविपचा डाव्यांसोबत संघर्ष सुरू आहे. दिल्ली विद्यापिठातील तोडफोड, उजैनमध्ये प्राध्यापकांना मारहाणसारखे आरोप ABVP याआधी झाले आहेत.
अनेकांना अभाविप हे भाजपचं 'बालरुप' आहे, असं वाटतं. पण अभाविपचे प्रवक्ते हे नेहमी आपण भाजपशी संलग्न नसल्याचं जोर देऊन सांगत असतात. ते स्वतःची ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा अशीच करून देतात.
पण अभाविप नेमकी कोणाची शाखा आहे? JNU मधील विवादाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थी संघटनांच्या राजकारणात अभाविपचं स्थान काय आहे? या प्रश्नांचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.
काय आहे अभाविप?
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापनाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केली होती. 1948 साली अभाविपची स्थापना झाली. अर्थात, संस्थेची अधिकृत नोंदणी ही 9 जुलै 1949 साली झाली. देशातील विविध विद्यापीठांमधील डाव्या विचारांचा पगडा कमी करणं हा अभाविपच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश होता.
1958 साली मुंबईमधील एक प्राध्यापक यशवंतराव केळकर हे अभाविपचे प्रमुख संघटक बनले. अभाविपच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सध्या अभाविपचं जे स्वरूप आहे, त्यामागे केळकरांचे प्रयत्न आहेत. केळकर हे खऱ्या अर्थानं अभाविपचे शिल्पकार असल्याचं वेबसाईटवर म्हटलं आहे.
70 च्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात अभाविप आक्रमकपणे सहभागी झाली होती. आणिबाणीच्या काळात अभाविपची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली.
आसाममध्ये उभे राहिलेलं बांगलादेशी घुसखोरी विरोधीचे जनांदोलन, १९८०च्या दशकातली खलिस्तानी चळवळी, श्रीलंकेतील तमिळवंशीय आंदोलनाचा प्रश्न, उत्तरार्धात आणि त्यानंतर उग्र रूप धारण केलेला काश्मीर प्रश्न आणि दहशतवादाचा प्रश्न अशा विविध राष्ट्रीय प्रश्नांवर अभाविपनं सातत्यानं भूमिका घेतल्या.
1990 च्या दशकात मंडल आयोग, राम मंदिर अशा प्रश्नावर सक्रिय होत अभाविपनं राजकारणातले आपले पाय अधिक ठामपणे रोवले.
अभाविप भलेही आग्रहानं आपण भाजपची नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना असल्याचं सांगते. पण अनेक अभ्यासकांच्या मते मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधली सीमारेषाच धूसर आहे. त्यामुळे अभाविपला संघाची किंवा भाजपची विद्यार्थी संघटना म्हटल्यानं काहीच फरक पडत नाही.
भाजपमधील नेत्यांची एक मोठी फळी अभाविपतूनच राजकारणात सक्रिय झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, अनंत कुमार, रवी शंकर प्रसाद, जेपी नड्डा या भाजप सरकारमधील सध्याच्या नेत्यांची पार्श्वभूमी अभाविपचीच आहे.
अभाविपचा विस्तार
अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात अभाविपचा विस्तार लक्षणीयरित्या झाला. पण 2014 पासून अभाविपची सदस्य संख्या झपाट्यानं वाढली आहे. 2014 ते 2015 या एका वर्षात अभाविपच्या सदस्यसंख्येमध्ये 10 लाखांची भर पडल्याचा दावा अभाविपकडून करण्यात आला होता.
दरवर्षी अनेक विद्यार्थी पास आउट होऊन बाहेर पडत असतात. त्यामुळे अभाविपकडून नियमितपणे नवीन विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग कॅम्प घेतले जातात.
5 हजारहून अधिक शहरांमध्ये शाखा, 9 हजार कँपस युनिटसह देशभरातील हजारो महाविद्यालयांमध्ये अभाविप कार्यरत आहे.
अभाविपची सुरुवातीच्या काळातील भूमिका ही विद्यार्थी आजचा नागरिक आहे, अशी होती. त्यामुळेच त्यानं राष्ट्रीय मुद्द्यांवर भूमिका घेतली पाहिजे आणि त्यांची राजकीय विचारधाराही पक्की हवी अशी होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय विचारधारा म्हणजे राष्ट्रवाद या दिशेने अभाविपचं राजकारण जात आहे, का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नांना वाचा फोडण्याऐवजी काश्मिरमध्ये तिरंगा फडकावणे, घुसखोरांविरोधात भूमिका घेणे अशीच राहिली आहे. अभाविपची राष्ट्रवादाची संकल्पना हीच मुळात हिंदू प्रतीकांभोवतीच फिरत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
अभाविप आणि वाद
JNU मध्ये 5 जानेवारीला झालेल्या हिंसाचारामुळे विद्यापीठातील डाव्या संघटना आणि अभाविपमधील तीव्र मतभेद समोर आले. पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्या संघटना आणि अभाविप आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये.
2016 साली JNU मध्ये संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुला देण्यात आलेल्या फाशीविरोधात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान देशविरोधी घोषणा दिल्या गेल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी विद्यार्थी संघटनेचा तत्कालिन अध्यक्ष कन्हैय्या कुमार याला देशद्रोह आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपावरून अटकही करण्यात आली होती.
त्यावेळीही अभाविपचे कार्यकर्ते अंधाराचा फायदा घेऊन घुसले आणि त्यांनीच या घोषणा दिल्या असा आरोप डाव्या संघटनांनी केला.
केवळ JNUच नाही तर पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ अशा वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये अभाविपचा डाव्यांसोबत संघर्ष सुरू आहे.
• गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठामध्ये केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना डाव्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनी घेराव घातला होता. या घटनेनंतर अभाविपच्या जवळपास 200 विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून तोडफोड केली होती.
• 2 ऑगस्ट 2015 ला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी 'मुझफ्फरनगर बाकी है' या माहितीपटाचं स्क्रीनिंग थांबवलं होतं. हा माहितीपट 2013 साली मुझफ्फरनगर इथं झालेल्या दंगलींवर आधारित होता. 'मुझफ्फरनगर बाकी है' हा माहितीपट आमच्या धार्मिक भावनांना दुखावणारा असल्याचं अभाविपच्या सदस्यांनी म्हटलं होतं.
• 7 सप्टेंबर 2013 साली हैदराबाद इथं एका काश्मिरी चित्रपट महोत्सवाला अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप झाला होता.
• 24 ऑगस्ट 2013 साली पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये जय भीम कॉम्रेडचं स्क्रीनिंग आणि कबीर कला मंचाच्या कलाकारांच्या सादरीकरण झालं होतं. या कार्यक्रमातही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप झाला होता. कबीर कला मंचाच्या कलाकारांना त्यांनी नक्षलवादी म्हणून संबोधल्याचाही आरोप झाला होता.
• 29 जानेवारी 2012 साली अभाविपनं संजय काक यांच्या 'जश्न-ए-आझादी' या माहितीपटाचं स्क्रिनिंग रद्द करण्यासाठी आंदोलन केलं. पुण्यातील सिंबायोसिस कॉलेजमध्ये या माहितीपटाचं स्क्रीनिंग होणार होतं. हा माहितीपट काश्मिरच्या परिस्थितीवर भाष्य करणारा होता.
• 26 फेब्रुवारी 2008 साली अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या इतिहास विभागात तोडफोड केली होती.
• 26 ऑगस्ट 2006 साली अभाविपच्या कार्यकर्त्यांनी उज्जैनमधील माधवबाग महाविद्यालयातील प्राध्यापक हरभजन सिंह सभरवाल आणि दोन अन्य प्राध्यापकांना मारहाण केली होती. त्यापैकी प्राध्यापक सभलवाल यांचा जागीच कार्डिआक अरेस्टनं मृत्यू झाला होता.