म्यानमार: पोलिसांनी आंदोलकांवर रबराच्या गोळ्या का झाडल्या?
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (18:45 IST)
म्यानमारमध्ये सध्या लष्करी राजवटीविरुद्ध ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. मंगळवारी (9 फेब्रुवारी) मात्र आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष दिसून आला. म्यानमारची राजधानी नेपिटोमध्ये आंदोलनबंदीचा निषेध करणाऱ्या हजारो आंदोलकांवर पोलिसांनी रबराच्या गोळ्या झाडल्या.
म्यानमारमध्ये लोकशाही पूर्ववत करण्याची मागणी करण्यासाठी हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी पाण्याचा मारा आणि अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.
बीबीसी बर्मिसला दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या संघर्षात दोन आंदोलक जखमी झाले आहेत. 8 फेब्रुवारीला 'नवीन नियम' जाहीर केले असले तरी म्यानमारच्या राजधानीत आज (9 फेब्रुवारी) चौथ्या दिवशीही आंदोलन सुरू आहे.
काही शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली असून रात्रीच्या वेळी कर्फ्यू लागू केला आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही असा इशारा लष्करी नेतृत्त्व मिन आँग हलिंग यांनी दिला. बर्मिस टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आलेल्या भाषणात त्यांनी कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे, असंही म्हटलं आहे.
लोकप्रतिनिधी आँग सान सू ची यांच्यासह नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (NLD) पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सोडण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
म्यानमारमध्ये लष्कराने उठाव केल्यानंतर सू ची यांना अटक करण्यात आली आहे. निवडणुकीत कोणतीही फसवणूक झाल्याचा पुरावा नसताना लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं आहे. तसंच वर्षभरासाठी लष्कारने आणीबाणी जाहीर केली आहे.
परिस्थिती चिघळली
9 फेब्रुवारीला सकाळपासूनच पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा मारा सुरू केला. रॉयटर्स न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, तरीही आंदोलकांनी निदर्शनं सुरू ठेवली आणि आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.
"लष्करी हुकूमशाही संपवा," अशा घोषणा देण्यात आल्या.
रबरी गोळ्या आंदोलकांवर झाडण्याआधी त्यांना इशारा देण्यात आला होता. एएफपी न्यूज एजन्सीला एका रहिवाशाने सांगितलं, "पोलिसांनी आधी हवेत दोन वेळा गोळीबार केला आणि त्यानंतर आंदोलकांवर रबराच्या गोळ्या झाडल्या."
एका वैद्यकीय अधिकाऱ्याने बीबीसी बर्मिसला दिलेल्या माहितीनुसार, या संघर्षात दोन आंदोलक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला आणि छातीला मार लागला आहे. ते कशामुळे जखमी झालेत याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
रबरी गोळ्या लागल्याने इतर तीन आंदोलक जखमी झाल्याचा संशय असल्याचं आपत्कालीन कक्षातील एका डॉक्टरांनी सांगितलं. जखमींना आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
काही ठिकाणी पोलिसांनीही निदर्शनात सहभाग घेतल्याच्या बातम्या येत आहेत. त्याची पुष्टी अद्याप होऊ शकलेली नाही. काही भागांत पोलिसांनी बॅरिकेड्स ओलांडूनही आंदोलनाची परवानगी दिल्याच्या बातम्या येत आहेत.
बीबीसीचे अग्नेय आशियाचे प्रतिनिधी जोनाथन हेड यांनी सांगितलं, आंदोलकांना पांगवण्यासाठी अधिकारी 'पूर्ण ताकदीने' प्रयत्न करत आहे हे स्पष्ट आहे. पण अद्याप अजूनही प्राणघातक पर्यायांचा वापर केला गेलेला नाही.
यापूर्वी 1988 आणि 2007 मध्ये लष्करी राजवटीविरुद्ध झालेल्या आंदोलनात अनेक लोक मारले गेले होते.
8 फेब्रुवारी रोजी झालेल्या आंदोलनातही शिक्षक, वकील, बँक कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पण आंदोलन पांगवण्यासाठी पाण्याचा मारा 9 फेब्रुवारीला पहिल्यांदाच करण्यात आला. यात काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे, पण आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं नाही.
लष्कराची प्रतिक्रिया
8 फेब्रुवारीला जनरल मिन आँग हलिंग यांनी आठवडाभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर पहिल्यांदा भाषण केलं.
या भाषणात नोव्हेंबरला पार पडलेल्या निवडणूक याद्यांमधील अनियमिततेची चौकशी करण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला. यामुळे मतदारांची फसवणूक झाली आणि यासाठीच सत्ता बळकावणे योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीत फसवणूक झाल्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचं निवडणूक आयोगाने यापूर्वी स्पष्ट केलं होतं. आँग सान सू ची यांच्या पक्षाने ही निवडणूक जिंकली होती.
जनरल मिन आंग हलिंग यांनी नव्या 'सुधारित' निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली नव्याने निवडणुका घेण्यात येतील अशी घोषणा केली आहे. या निवडणुकीत विजयी होणाऱ्या पक्षाकडे सत्ता देण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
9 फेब्रुवारीला न्यूझीलंडने म्यानमारसोबतचे आपले सर्व उच्चस्तरीय संपर्क स्थगित केले आहेत.
1 फेब्रुवारीपासून म्यानमारच्या लष्करी राजवटीविरोधात घेतलेले हे आतापर्यंतचं सर्वांत मोठं आंतरराष्ट्रीय पाऊल मानलं जात आहे.