मराठा आरक्षण आंदोलन एकनाथ शिंदेंच्या फायद्यासाठी? मनोज जरांगेंनी केलं स्पष्ट

बुधवार, 24 जानेवारी 2024 (15:59 IST)
मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. पुण्याजवळ असताना बीबीसी मराठीसाठी प्राची कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित अंश:
 
प्रश्न : मुंबईला जाऊन प्रश्न सुटेल असं वाटतंय का?
जरांगे- आमचं काम आहे संघर्ष करणं आणि ते आम्ही करतोय. मात्र सरकारच्या मनात काय आहे हे कुणालाच माहिती नाही पण सरकारला वठणीवर आणण्याची ताकद मराठा समाजामध्ये आहे. त्यामुळे मराठे येत्या 26 तारखेला ताकद काय असते हे सरकारला दाखवून देतील.
 
या देशातच काय तर या विश्वात आत्तापर्यंत एवढ्या रेकॉर्ड ब्रेक संख्येने एखादा समाज कधीच एकत्र आला नसेल. मुंबईतल्या गल्लीगल्लीत आता तुम्हाला फक्त मराठा दिसणार. स्वतःची मुलं मराठ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.
 
मी या गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करतोय, त्यामुळे समाज पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठीमागे उभा राहणार आहे.
 
प्रश्न : आंदोलनात हिंसक उद्रेक होऊ शकतो का?
जरांगे- मराठ्यांचं वादळ नाही येणार, मराठ्यांशी त्सुनामी येणार आहे. आम्ही कधीही उद्रेक केला नाही, तो कुणी घडवून आणला आम्हाला माहिती नाही. आम्ही शांततेत उपोषण करत होतो आणि आमच्यावर हल्ला करण्यात आला. आमच्या लोकांची डोकी फुटली, त्यामुळे आमच्याकडून उद्रेक होण्याचा विषयच नाही.
 
संविधानाने आम्हाला शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यानुसारच आम्ही मुंबईत उपोषणाला बसणार आहोत.
 
प्रश्न : अनेक मराठा नेत्यांना असं वाटतं की आरक्षण मिळणार नाही आणि टिकणार नाही, त्याबाबत काय वाटतं?
जरांगे- आम्हाला आरक्षण मिळणार आणि ते टिकणारसुद्धा. ओबीसीत मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत.
 
मराठा ओबीसी आरक्षणात आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळणार आणि तेही ओबीसीतूनच मिळणार, मग पुढे कुणीही असो.
 
प्रश्न : मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण सुरु केलं आहे, निकष बदलण्यात आले आहेत. त्याबाबत तुम्हाला काय वाटतं?
जरांगे- सरकारने काय करायचं हे त्यांनी ठरवायचं. मागास सिद्ध करण्याचं सरकारचं आणि मागासवर्ग आयोगाचं काम आहे. त्यांनी ते करावं आणि सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी कमी करायला सांगितल्या आहेत त्या त्यांनी कराव्या.
 
त्या मार्गाने मिळालेलं आरक्षण टिकेल की नाही याची पण शंका आहे. त्यापेक्षा मराठ्यांचं आरक्षण ओबीसीत बसतं, त्यामुळे सरकारने बाकीचे 'कुटाने न करता'सरकारने आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं.
 
प्रश्न : तुम्ही मागितलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीत कसे टिकेल?
जरांगे- ओबीसी आरक्षणात मिळालेल्या आरक्षणाला आव्हानच देता येत नाही. आमच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत, त्या कुणाच्याच सापडल्या नाहीत.
 
त्यामुळे आमचं आरक्षण टिकत नसेल तर या देशातलं कुणाचंच ओबीसी आरक्षण वैध राहत नाही. आमच्या 54 लाख नोंदी सापडलेल्या असताना आमची मागणी हीच आहे की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ओबीसी प्रमाणपत्र द्या आणि सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढा.
 
प्रश्न : सरकारच्या शिष्टमंडळाने तुम्हाला काय सांगितलं? कोणतं आश्वासन दिलं?
जरांगे- हे आंदोलन आश्वासनांमुळे थांबणार नाही, ते आता खूप पुढे निघून गेलं आहे. आता आम्हाला थेट कायदा पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आश्वासनाच्या जीवावर थांबायचे दिवस आता निघून गेले.
 
प्रश्न- मराठवाड्यातले बहुतांश आमदार हे एकनाथ शिंदे गटाचे आहेत. तुमच्या आंदोलनाला भेट दिल्यावर त्यांच्याबद्दल जे नकारात्मक वातावरण होतं ते कमी झालं आहे. तुमचा फायदा त्यांना होईल असं म्हटलं जात आहे.
जरांगे - त्यांचा काय संबंध? हा जातीचा मामला आहे. राजकारणी सगळ्याचाच फायदा घेणार आहे. काय असतं बोलणं वेगळं आणि कृती वेगळी.
 
आम्ही ग्राऊंड लेव्हलवर जाऊन गावागावात काम करतो. मराठ्यांच्या दारात जातो. त्यामुळे समाज एकत्र झाला आहे. थंडीचा मामला पाहिला तर माता माऊली लेकरांना घेऊन रस्त्यावर नाही येऊ शकत. तिला अगदी कोट्यवधी रुपये दिले तरी ती नाही येऊ शकत.
 
प्रश्न- या आंदोलनामुळे ओबीसींना फायदा होईल आणि जेव्हा जेव्हा ओबीसींना फायदा होतो तेव्हा भाजपला त्याचा फायदा होतो असं इतिहासात सिद्ध झालं आहे. भुजबळही बोलताहेत. त्यामुळे ओबीसींचं संघटन दुसऱ्या बाजूला होताना दिसत आहे.
जरांगे - मग होऊ दे ना आम्हाला काय करायचं आहे? तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका मग तुम्हाला कळेल की तुमचा सुपडा कसा साफ झाला ते तुम्हाला कळेल. मराठ्यांना कोणीही चॅलेंज करू शकत नाही. मराठ्यांना चॅलेंज केलं की त्याचा सुपडा साफ झालाच म्हणून समजा.
 
प्रश्न- आरक्षणाने प्रश्न सुटतील असं वाटतंय का? कारण शैक्षणिक शुल्क प्रचंड आहे, बेरोजगारी वाढतेय, त्यामुळे तुमचे प्रश्न बदलायला हवेत का?
जरांगे- आयुष्यात पुढे जाताना पहिली पायरी म्हणून आरक्षण तितकंच महत्त्वाचं आहे. पहिलीच पायरी तो चढू शकला नाही तर पुढची पायरी कधीच चढू शकणार नाही. त्यामुळे आरक्षण हवंच.
 
प्रश्न- सध्या निवडणुकांचा मोसम आहे. तुमचा आरक्षणचा तिढा सुटल्यानंतर आरक्षणाचा हा नेता कोणत्या दिशेला जाणार आहे? कोणाला पाठिंबा देणार आहे?
जरांगे- पाठिंबा बिठिंबा काही नाही, ते निवडणुका घेणारच नाहीत. एवढा ज्वलंत प्रश्न पेटलेला असताना निवडणुका कशा घेतील? आमचा आरक्षणाचा प्रश्न संपेपर्यंत ते निवडणुकाच घेणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती