मधुबाला, दिलीपकुमार आणि कोर्टात प्रेमाची कबुली

बुधवार, 7 जुलै 2021 (09:32 IST)
- प्रदीप कुमार
भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वांत सुंदर चेहरा कोणता या प्रश्नावर आजही अनेकांच्या ओठावर पहिलं नाव येतं मधुबालाचं. मधुबालाच्या वेगवेगळ्या चित्रपटातल्या अदा डोळ्यांसमोर येतात.
 
हावडा ब्रिज चित्रपटातील मादक डान्सर, मिस्टर अँड मिसेस 55 मधली अवखळ तरूणी, अकबरासमोर बेधडकपणे प्यार किया तो डरना क्या म्हणणारी मुघल ए आझम चित्रपटातली अनारकली...मधुबालाच्या या भूमिका एकापाठोपाठ एक आठवतात.
 
मोहक, सुंदर, दिलखेचक आणि प्रसन्न, चेहऱ्यावर तेज अशी अनेक विशेषणं तिच्या सौंदर्याला लावली गेली. 1990 मध्ये एका चित्रपटविषयक मासिकानं बॉलिवूडमधील सार्वकालिक श्रेष्ठ अभिनेत्रींविषयी सर्वेक्षण केलं होतं. त्यामध्ये 58 टक्के लोकांनी मधुबालाला पसंती दिली.
 
दुसऱ्या क्रमांकावर होती अभिनेत्री नर्गिस. मात्र नर्गिसला मिळालेल्या मतांची संख्या होती 13 टक्के. यावरूनच मधुबालाची लोकप्रियता पुढच्या पिढ्यांमध्येही किती टिकून होती हे लक्षात येतं. मधुबालाला आपल्यातून जाऊन पन्नास वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र नवीन पिढीही सौंदर्याचा मापदंड म्हणून मधुबालाच्याच नावाला पसंती देते.
 
मधुबालासोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारे अभिनेते राजकपूर यांनी एकदा म्हटलं होतं, की परमेश्वरानं त्यांना स्वतःच्या हातानं संगमरवरातून घडवलं आहे. पेंग्विन इंडियानं प्रकाशित आणि भाईचंद पटेल यांनी संपादित केलेल्या बॉलिवूड टॉप 20- सुपरस्टार्स ऑफ इंडिया या पुस्तकात राज कपूर यांचं हे विधान आहे.
 
या पुस्तकात शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेला एक प्रसंग आहे. ठाकरे चित्रपटसृष्टीत काम करत होते, तेव्हाची ही आठवण आहे. त्यांनी एक दिवस मधुबालाचं चित्रीकरण पाहिलं. मधुबालाला पाहिल्यानंतर आजचा दिवस सार्थकी लागला असा विचार त्यांच्या मनात आला.
 
अभिनेते शम्मी कपूर यांनीही आपलं आत्मचरित्र शम्मी कपूर- द गेम चेंजरमध्ये एक पूर्ण प्रकरण मधुबालावर लिहिलं आहे. 'फेल मॅडली इन लव विथ मधुबाला' असं या प्रकरणाचं शीर्षक आहे. "मधु दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते हे मला माहिती होतं. पण तरीही मी तिच्या प्रेमात पडलो होतो. यात कोणाचाच दोष नाही. तिच्याइतकी सुंदर स्त्री मी माझ्या आयुष्यात पाहिली नव्हती," असं शम्मी कपूर यांनी लिहिलं आहे.
 
शम्मी कपूर यांचं आत्मचरित्र 2011 मध्ये प्रकाशित झालं होतं. आज साठ वर्षांनंतरही जेव्हा मधुबालाचा विचार मनात येतो, तेव्हा हृदयात हलकीशी कळ उमटते, असंही शम्मी यांनी लिहिलं होतं. शम्मी यांच्यावर मधुबालाच्या सौंदर्याची जणू मोहिनी पडली होती. शम्मी आपल्या पदार्पणाचा चित्रपट 'रेल का डब्बा'च्या चित्रीकरणादरम्यान मधुबालाला पाहिल्यानंतर संवादच विसरून जायचे.
 
मधुबाला यांना अवघं 36 वर्षांचं आयुष्य लाभलं होतं. त्यातही शेवटच्या नऊ वर्षांत त्यांना आपल्या घरातून बाहेरही पडता येत नव्हतं. मात्र आपल्या अल्पायुष्यातच त्यांनी स्वतःचं असं स्थान निर्माण केलं, जे आजही अबाधित आहे.
 
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चित्रपटसृष्टीत
जन्मतःच मधुबालाच्या हृदयाला छिद्र होतं. डॉक्टरांनी आरामाची गरज असल्याचं वारंवार सांगूनही मधुबालाच्या वडिलांनी तिला अशा जगात ढकलंल, जिथं रात्रंदिवस काम करावं लागायचं.
 
अकरा बहिण-भावंडांच्या कुटुंबात मधुबाला ही एकटी कमावती होती. तिच्यावरच सर्वजण आर्थिकदृष्ट्या अवलंबून होते. मधुबालाचे वडील लाहौरमध्ये इंपीरियल टोबॅको कंपनीमध्ये काम करायचे. मात्र नोकरी गेल्यानंतर ते दिल्लीला आले. तिथून ते मुंबईला पोहोचले. इथं आल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की आपल्या सुंदर मुलीला चित्रपटांमध्ये सहज काम मिळेल.
 
अवघ्या सहाव्या वर्षी मधुबाला यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. इतक्या लहानवयापासून कष्ट करताना मधुबाला शारीरिक-मानसिकदृष्ट्या अगदी झिजून गेली. या कामाचा तिच्यावर कसा परिणाम झाला होतो, याची झलक फिल्मफेअरच्या एका विशेष अंकामध्ये पहायला मिळते. 1957 साली फिल्मफेअरनं काढलेल्या या अंकामध्ये त्यावेळेच्या सर्व सुपरस्टार्सना स्वतःबद्दल काहीतरी लिहायला सांगितलं होतं. नर्गिस, मीनाकुमारी, नूतन, राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद, किशोर कुमार, अशोक कुमार या सर्वांनी स्वतःबद्दल लिहिलं होतं. मधुबाला यांनी मात्र स्वतःबद्दल काही लिहिण्यास नकार देत माफी मागितली होती.
 
आपल्या नकाराचं कारण देताना त्यांनी लिहिलं होतं, "माझं अस्तित्वंच हरवलंय. अशापरिस्थितीत मी स्वतःबद्दल काय लिहू? तुम्ही मला अशा व्यक्तिबद्दल लिहायला सांगितलंय जिला मी ओळखतही नाही. मला कधी स्वतःला निवांतपणे भेटण्याचा वेळच मिळाला नाही. मी पाच वर्षांची असताना मला कोणी काही विचारलं नाही आणि मी या भूल-भुलैय्यामध्ये आले. चित्रपटसृष्टीनं मला शिकवलेला पहिला धडा म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल सगळं काही विसरावं लागतं. तरच तुम्ही अभिनय करू शकता. अशापरिस्थितीत मी स्वतःबद्दल काय लिहू?"
 
मधुबालाच्या आयुष्यावर खतीजा अकबर यांनी 'आय वाँट टू लिव्ह-द स्टोरी ऑफ मधुबाला' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकातून मधुबालाला आपल्या सौंदर्याचा अजिबात अहंकार नव्हता हे स्पष्ट होतं. आपल्या कामाप्रति त्यांची शिस्त आणि शिकत राहण्याची उर्मी कधीच कमी झाली नाही.
 
मधुबाला त्याकाळातली एकमेव अशी कलाकार होती, जी वेळेच्या आधीच सेटवर हजर रहायची. अर्थात, नाजूक तब्येतीमुळे मधुबाला रात्री शूटिंग करायची नाही. आपल्या पूर्ण कारकिर्दीत त्यांनी कधी आउटडोर शूटिंगही केलं नाही. मात्र तरीही मधुबाला त्याकाळची आघाडीची अभिनेत्री होती.
 
मधुबाला आपल्या कामात किती चोख होत्या याचं उदाहरण म्हणजे मुघले आजम चित्रपटातील दिलीप कुमारसोबतचे प्रेमप्रसंग. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या तरल रोमँटिक दृश्यांमध्ये मुघले आजमच्या प्रेमप्रसंगांचा समावेश केला जातो. मात्र पडद्यावर उत्कट प्रेमप्रसंग साकारणाऱ्या दिलीप कुमार आणि मधुबालामधील संबंध मुघले आजमच्यावेळेस पूर्णपणे संपुष्टात आले होते. दोघं एकमेकांशी बोलतही नव्हते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती