प्रताप सरनाईक : 'सरकारने मला क्लिनचिट द्यावी'

मंगळवार, 6 जुलै 2021 (13:27 IST)
राज्य सरकारने क्लिन चिट देण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली आहे.
एमएमआरडीए घोटाळा प्रकरणी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गृह मंत्रालयाला आरोप सादर करावा आणि खरंच घोटाळा झाला किंवा नाही हे अहवालावरून स्पष्ट करावं अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
 
"मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळं हे आरोप अप्रत्यक्षपणे राज्यसरकारवर आरोप आहेत.त्यामुळं या प्रकरणाची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून घ्यावी," अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.
 
"घोटाळा झाला नाही, असं जर समोर आलं असेल तर अहवाल लोकांसमोर सादर करून क्लीनचीट द्या अन्यथा दोषी असेल तर कारवाई करा,"असं सरनाईक म्हणाले.
 
यासाठी त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिलं.त्यावर वळसे पाटील यांनी कारवाई सुरू केल्याचं सांगितलं आहे.
 
उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत - प्रताप सरनाईक

अडचणीच्या काळात पक्षप्रमुख पाठिशी उभे राहिले नाहीत, असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सोमवारी म्हणाले. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुरू असतना शिवसेना पक्ष, पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडी सरकार पाठिशी उभं राहिलं नसल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
 
काही दिवसांपूर्वी सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राची बरीच चर्चा झाली होती. ते पत्र लिहिण्याचं कारण सांगताना सरनाईक यांनी ही नाराजी मांडली.
 
विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पक्षानं बजावलेल्या व्हीपमुळं सरनाईक हे विधानसभेत उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना यांपूर्ण प्रकरणाबाबत माहिती दिली.
 
प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांना चौकशीचा ससेमिरा मागं लागल्यानं होत असलेल्या त्रासाचा उल्लेख केला होता. शिवसेनेनं पुन्हा भाजपशी युती करावी असंही सरनाईक म्हणाले होते.
 
त्यानंतर मात्र याविषयी फारशी चर्चा झाली नाही. मात्र अधिवेशनाच्या निमित्तानं पत्रकारांना भेटल्यानंतर सरनाईक यांनी या प्रकरणी त्यांची नाराजी व्यक्त केली.पत्र लिहून काही चूक केली असं वाटत नसल्याचंही प्रताप सरनाईक स्पष्टपणे म्हणाले
 

'नीरव मोदी, मल्ल्यासारखा पळून जाणार नाही'
आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या चौकशीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं.
 
"माझ्या विरोधात कुठंही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. कुणीही माझ्यावर कोणताही आरोप केलेला नाही, कुणीही तक्रारदेखील दिलेली नाही,"असं प्रताप सरनाईक म्हणाले.
 
"एमएमआरडीए प्रकरणी माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. पण या प्रकरणी एमएमआरडीएनंही आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीसमोर जबाब दिला आहे,"असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं."देश किंवा महाराष्ट्र सोडून पळून जायला मी काही नीरव मोदी नाही, मेहूल चोक्सी नाही किंवा विजय मल्ल्यादेखील नाही," असं सरनाईक पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
 

आरोप करण्यापूर्वी कुटुंबाची पार्श्वभूमी पाहावी
किरिट सोमय्या यांच्या काही भ्रष्टाचारांच्या विरोधात मी आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांनी माझ्या विरोधात तक्रार केली,असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केलाय.
 
 
मात्र विरोधकांनी आरोप करण्यापूर्वी संबंधितांची कौटुंबीक पार्श्वभूमी लक्षात घ्यावी,असं म्हणत सरनाईक यांनी या काळात कसा संघर्ष केला हे सांगितलं.
 
''माझी हृहयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती.पत्नी कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी संघर्ष करत होती, माझ्या कुटुंबावर कोरोनानं घाला घातला होता, त्यामुळे मी माध्यमांपासून लांब होतो.''
 
सरनाईक यांच्या विरोधात सोमय्या यांनी आमदार हरवले असल्याची बॅनरबाजी केली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना सरनाईक यांनी ही माहिती दिली.कशाचाही विचार न करता असे आरोप केले जात असल्याचं ते म्हणाले.
 
मी माध्यमांपासून लांब असलो तरी मतदारसंघातली कामं सुरू होती, असंही सरनाईक यावेळी म्हणाले.
 

'मी विरोधकांचं लक्ष्य होतो'
 
महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून नंतरच्या काळातही गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घडामोडींमध्ये मी आघाडीवर होतो.त्यामुळं मी विरोधकांचं टार्गेट बनल्यानं चौकशीचा ससेमिरा मागं लागला,असं सरनाईक म्हणाले.
 
"विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या चर्चांदरम्यान युती तुटण्याआधी सर्वांत आधी प्रवक्ता म्हणून मी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी मी आणि माझ्या मुलांनी हॉटेलमध्ये आमदारांची काळजी घेतली. पोलिसांनी बंद केलेलं अन्वय नाईक प्रकरण मीच समोर आणलं. अर्णव गोस्वामीवर कारवाई केली. कंगना राणावत विरोधात भूमिका घेतली, गोस्वामी-राणावत यांच्या विरोधात हक्कभंग मीच दाखल केला," असं सरनाईक यांनी सांगितलं.
 
या सर्व प्रकरणांमुळं मी विरोधकांचं टार्गेट बनलो होतो. त्यामुळं काहीही गुन्हा नसतांना ईडीचा ससेमिरा माझ्या मागे लावल्याचा आरोप सरनाईकांनी केला.
 
 

'पक्षप्रमुख पाठिशी नव्हते'
सरनाईक यांनी या सपूर्ण चौकशीच्या मुद्द्यावरून पक्ष म्हणजे शिवसेना आणि पक्षप्रमुख म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलही नाराजी व्यक्त केली.
 
"माझ्या विरोधात अशाप्रकारे चौकशी मागे लागल्यानंतर याविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात गेलो. सर्वोच्च न्यायालयानं मला संरक्षण दिलं," असं त्यांनी सांगितलं.
 
महाविकास आघाडी सरकारवर होणारे हल्ले अंगावर घेत मी त्यांना प्रत्युत्तर देत होतो. पण पक्षप्रमुखांबरोबरच महाविकास आघाडीचे नेते माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठाम उभे राहायला हवे होते. तसं झांलं नाही असं मला वाटलं,"अशी नाराजी सरनाईक यांनी मांडली.
 
माझ्या पाठिशी पक्ष, सरकार ठामपणे उभं नाही, असं वाटल्यामुळं मी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आणि त्यात माझं काही चुकलं असं मला वाटत नसल्याचं, सरनाईक यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती