इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष : इस्त्रायलकडून गाझापट्टी सीमेवर सैन्य पाठवण्यास सुरुवात

गुरूवार, 13 मे 2021 (22:01 IST)
इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शेख जर्राह परिसरातील अल-अक्सा मशिदीजवळ झालेला गोंधळ, लोड शहरातील हिंसाचार, हमासच्या कट्टरवाद्यांचा मृत्यू आणि इस्त्रायलवर झालेले रॉकेट हल्ले या घडामोडींनंतर आता इस्त्रायलकडून गाझापट्टीच्या सीमेवर सैन्यदल पाठवण्यास सुरुवात झाली आहे.
 
शेकडोंच्या संख्येने इस्त्रायली सैन्य गाझापट्टी सीमेकडे कूच करत असल्याची माहिती मिळाली आहे. इस्त्रायलच डिफेन्स फोर्सेसने (IDF) आपल्या सैनिकांनी युद्धासाठी सज्ज राहावं, अधिकाऱ्यांनीही त्याचं नियोजन करावं, अशी सूचना केली आहे.
 
दरम्यान, या सर्व घडामोडी सुरू असताना इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतात्याहू यांचीही प्रतिक्रिया आली आहे.
 
इस्त्रालयने गाझापट्टीतून होत असलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सुरू केलं आहे, अशी माहिती पंतप्रधान नेतान्याहू यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
 
आमच्या नागरिकांचं संरक्षण करताना हमासवरील हल्ले आम्ही सुरू ठेवू. ही मोहीम आणखी काही वेळ चालेल, आम्ही आमचं उद्दीष्ट साध्य करू, असं नेतान्याहू म्हणाले.
 
गाझापट्टीतून रॉकेट हल्ले
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचे वरिष्ठ कमांडर ठार झाल्यानंतर आणि गाझामधील बहुमजली इमारत पडल्यानंतर हमासच्या कट्टरवाद्यांनी इस्रायलवर रॉकेट हल्ले केलेत.
 
दक्षिण इस्रायलमधील अनेक ठिकाणी याचा फटका बसला असून, स्डेरोट येथे एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याचंही काही वृत्तांमध्ये सांगण्यात येत आहे.
 
सोमवारपासून (10 मे) सुरू झालेल्या लढाईत वाढ झाल्याने संयुक्त राष्ट्रानेही "युद्धाची" भीती वर्तवली आहे. आतापार्यंत गाझापट्टीत 14 मुलांसह किमान 65 जण आणि इस्रायलमधील सात जण ठार झाले आहेत.
 
पूर्व जेरुसलेममध्ये इस्रायल-पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये अनेक आठवडे तणाव होता आणि संघर्ष आणखी पेटला. मुस्लिम आणि ज्यूंसाठी पवित्र स्थान असलेल्या या ठिकाणी चकमकीही झाल्या.
 
मिश्र ज्यू आणि अरब लोकसंख्येसह इस्रायली भागात सततच्या हिंसाचारामुळे बुधवारी (12 मे) संध्याकाळी 374 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली, असं इस्रायली पोलिसांनी सांगितलं. तसंच 36 अधिकारी जखमी झालेत.
 
इस्रायलमधील शहरांमध्ये ज्यू आणि अरब दोघांवरही जमावाने हल्ला केल्याच्या बातम्या इस्रायली माध्यमांमध्ये आल्या होत्या. यात अरबांच्या हातून जखमी झालेला एक ज्यू माणूस आणि उजव्या विचारसरणीच्या ज्यूंच्या जमावाने आपल्या गाडीतून खेचून मारहाण केलेला एक अरब माणूस यांचा समावेश आहे.
 
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी (12 मे) रात्री उशिरा बोलताना सांगितलं की, हिंसाचारामुळे फटका बसलेल्या शहरांमध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी आणि पोलिसांच्या मदतीसाठी लष्करी सैन्य पाठवणार आहेत.
 
अलीकडच्या काळात झालेले हे हल्ले "अराजकता" पसरवणारे आहेत असंही ते म्हणाले.
 
"अरब जमावाने ज्यूंवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन करता येणार नाही आणि अरबांवर हल्ला करणाऱ्या ज्यू जमावाचंही समर्थन करू शकत नाही," टाईम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.
 
पॅलेस्टिनी कट्टरवाद्यांनी सोमवारी (10 मे) रात्रीपासून इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला करत आहेत तर प्रत्युत्तर देत इस्रायलनेही या भागाला लक्ष्य करत हल्ले केले.
 
शेकडो हवाई हल्ले आणि रॉकेट हल्ले करण्यात आले. .
 
गाझामधील हमासच्या आरोग्य मंत्रालयानुसार, संघर्ष सुरू झाल्यापासून 360 हून अधिक लोक जखमी झाले आहेत तर 65 जणांचा मृत्यू झाला.
 
इस्रायलला बाहेरील शत्रू आणि देशांतर्गत दंगलखोरांपासून वाचवण्यासाठी सरकार आपली सर्व शक्ती वापरेल, असं पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलंय.
 
परंतु पॅलेस्टिनी शासनाकडून एका ट्विटमध्ये इस्रायलच्या "लष्करी आक्रमणाचा" निषेध केला गेला आणि म्हटले की ते "आधीच अडचणीत असलेल्या 20 लाख लोकांना धक्का पोहचवत आहेत."
 
बुधवारी काय घडलं?
गाझातील कट्टरवाद्यांनी सांगितलं की शहरातील अल-शरूक टॉवर उद्ध्वस्त करणाऱ्या इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी इस्रायलमध्ये 130 रॉकेट डागले.
 
या आठवड्यात हवाई हल्ल्यांमुळे नष्ट झालेल्या तिसऱ्या उंच इमारतीत अल अक्सा टीव्ही हा हमासद्वारे चालवल्या जाणाऱ्या टीव्हीचं कार्यालय होतं.
 
इस्रायलने सांगितलं की, त्यांनी गाझामध्ये हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठार केलं आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांनाही लक्ष्य केलं आहे. हमासने एका वरिष्ठ कमांडरचा आणि "इतर नेत्यांचा" मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
 
इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) बुधवारी (12 मे) सांगितलं की, 2014 मध्ये झालेल्या संघर्षानंतर गाझावर हा सर्वांत मोठा हल्ला होता.
 
लढाऊ विमानांनी हल्ला करण्यापूर्वी रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याचा इशारा देण्यात आला होता. पण तरीही काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
 
एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी (11 मे) झालेल्या हवाई हल्ल्यात एका कुटुंबातील पाच सदस्य ठार झाले असून त्यात दोन तरुण भावांचाही समावेश आहे.
 
"आम्ही हसत होतो आणि मजा करत होतो जेव्हा अचानक त्यांनी आमच्यावर बॉम्ब फेकायला सुरुवात केली. आमच्या आजूबाजूला आग लागली," त्यांचा 14 वर्षांचा चुलत भाऊ इब्राहिम त्यांच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया देताना रडत रडत म्हणाला.
 
दरम्यान, देशभरात रॉकेट हल्ल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर आयडीएफने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी (12 मे) संध्याकाळी लाखो इस्रायली लोक निवाऱ्यात होते.
 
इस्रायलच्या स्डेरोट शहरात ठार झालेल्या मुलाचे नाव इडो अविगल असं होतं. तो सहा वर्षांचा होता. जो फ्लॅटच्या ब्लॉकवर झालेल्या हल्ल्यात अडकला होता.
 
जेरुसलेम पोस्टच्या संरक्षण आणि सुरक्षा वार्ताहर अॅना अहोनहेम यांनी मंगळवारी (11 मे) रात्री आपल्या पाच महिन्यांच्या बाळासह रात्र एका निवाऱ्यात घालवल्याचं सांगितलं.
 
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं,"आपल्याजवळ रॉकेट कोसळताना ऐकणं आणि त्याचा अनुभव घेणं भयानक होते."
 
गुरुवारी (13 मे) सकाळी आयडीएफने सांगितलं की, या आठवड्याच्या सुरुवातीला संघर्ष टोकाला गेल्याने गाझामधून इस्रायली शहरांमध्ये सुमारे 1,500 रॉकेट डागण्यात आले.
 
बुधवारी (12 मे) सकाळी गाझामधून इस्रायलमध्ये डागण्यात आलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राने एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर लोडमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन इस्रायली अरबांचा मृत्यू झाला.
 
जगभरातून काय प्रतिक्रिया येत आहेत?
जगभरातील देशांनी पुन्हा एकदा इस्रायल आणि पॅलेस्टाइनला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
 
अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय संघाने इस्रायल आणि पॅलेस्टाइननं लवकरात लवकर तणाव कमी करण्याचा आग्रह केला आहे.
 
गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी कट्टरवादी आणि इस्रायली सैन्य यांच्यातील गोळीबार आणि रॉकेट हल्ले मोठ्या प्रमाणात तीव्र झाले आहेत. त्यामुळे याचे रुपांतर युद्धात होईल अशी भीती संयुक्त राष्ट्राने व्यक्त केलीय.
 
इस्रायलचं म्हणणं आहे की गेल्या 38 तासांत पॅलेस्टिनी कट्टरवाद्यांनी एक हजाराहून अधिक रॉकेट डागले आहेत. त्यापैकी बहुतांश तेल अवीववर सोडण्यात आले.
 
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे की, त्यांना या हिंसाचाराची अत्यंत चिंता आहे.
 
संयुक्त राष्ट्रसुरक्षा परिषदेची यासंदर्भात बैठक झाली आहे, पण अद्याप कोणतंही निवेदन जारी करण्यात आलेलं नाही.
 
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी बुधवारी पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी इस्रायलच्या सुरक्षेसाठी पाठिंबा असल्याचे सांगत "शांतता" पुन्हा प्रस्थापित करण्याच्या गरजेवर भर दिला.
 
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "माझी अपेक्षा आणि आशा आहे की हे लवकर थांबेल पण जेव्हा तुमच्या प्रदेशावर हजारो रॉकेट सोडले जातात तेव्हा इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे."
 
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन म्हणाले की, त्यांनी दोन्ही बाजूंना भेटण्यासाठी या भागात दूत पाठवले आहेत.
 
रशियाने मध्यपूर्व चार गटांची (अमेरिका, युरोपियन युनियन, संयुक्त राष्ट्र आणि रशिया) तातडीची बैठक बोलावली आहे.
 
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात हमासच्या प्रवक्त्याचा हवाला देऊन म्हटलं आहे की, इस्रायलने पूर्व जेरुसलेममधील "हिंसक कृत्ये" आणि "मूळ अरब रहिवाशांच्या संदर्भात बेकायदेशीर उपाययोजना" थांबवल्यास ही चळवळ थांबवण्यास आम्ही तयार आहोत.
 
वाद काय?
इस्रायलनं जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता आणि संपूर्ण शहर आपल्या मालकीचं असल्याचा त्यांचा दावा आहे. पण बहुतांश देशांना हा दावा मान्य नाही. दुसरीकडे पॅलेस्टिनी लोक स्वतंत्र देशाची आशा करत असून ईस्ट जेरुसलेम ही त्या देशाची राजधानी असेल असं त्यांना वाटतं.
 
गेल्या काही दिवसांपासून जेरुसलेममधला तणाव वाढला आहे. ईस्ट जेरुसलेमवर हक्क सांगणाऱ्या ज्यू लोक येथून पॅलेस्टिनी लोकांना हिसकावून लावत असल्याचा आरोप केला जात आहे.
 
दोन्ही समुदायांतल्या वादामुळे या परिसरात सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडताना दिसतात.
 
नमाजानंतर हिंसाचार
7 मे रोजी रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार असल्यामुळे या ठिकाणी हजारो नागरिक जमा झाले होते.
 
इस्रायल पोलिसांचा दावा आहे, की नमाजनंतर इथे हिंसाचाराला सुरुवात झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
 
त्यानंतर अल अक्सा मशिदीतील विश्वस्तांनी मशिदीच्या स्पीकरवरून शांतता राखण्याचं आवाहन केलं. पोलिसांनी स्टेन ग्रेनेडचा वापर थांबवावा. तरूणांनी संयम बाळगावा आणि शांतता राखावी, असं आवाहन मशिदीतून करण्यात येत होतं.
 
आंतरराष्ट्रीय संघटनांनीही या परिसरातील तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती