अलीकडेच रिलीज झालेल्या एका हिंदी सिनेमात एक आजोबा एका आजीला वसंत पंचमीला प्रपोज करतात, असं दाखवलं आहे. मराठीतही 'हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे' असं एक प्रेमळ गाणं आहे. वसंत पंचमी हा भारतीय व्हॅलेंटाईन डे आहे का? याबातची चर्चा दरवर्षी रंगत असते.
वसंतपंचमीला विठ्ठल- रखुमाईचं लग्न झालं असं मानतात. पंढरपुरात वसंत पंचमीला हा देवाचा लग्नसोहळा रंगतो. यंदाही विठ्ठल- रखुमाईचा लग्नसोहळा पंढरपुरात रंगला. पांढऱ्याशुभ्र पोषाखात अलंकारानं नटलेला विठोबा आणि सालंकृत रखुमाईची मूर्ती यांच्यामध्ये आंतरपाट धरून लग्न लावलं जातं. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत विठ्ठलाला शुभ्र पोषाख करून गुलाल उधळण्याची प्रथा आहे, असं म्हणतात.
देशातल्या काही भागात वसंत पंचमीला सरस्वतीची पूजा करण्याची पद्धत आहे. त्याच बरोबर अनेक ठिकाणी आजच्या दिवशी कामदेव आणि रती यांचं पूजन करण्याचीही प्रथा आहे.
याविषयी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले, "भारतीय संस्कृतीत प्रेमाचं वेगळं महत्त्व आहे. आजचा दिवस प्रेमात, आनंदात घालवतात. भारतात अनेक ठिकाणी रती आणि कामदेव यांचं पूजन करण्याची प्रथा आहे. हा भारतीयांचा व्हॅलेनटाईन डे आहे असं म्हटलं तरी हरकत नाही."
पुराणाचे अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखक देवदत्त पटनाईक सांगतात, "कालिदासाच्या काळात वसंत पंचमीला 'मदनोत्सव' असं म्हटलं जात असे. या दिवशी मदनदेवता म्हणजे कामदेवतेची पूजा करण्याची प्रथा होती. आपण आपल्या शरीराची पूजा करायचो. रतिक्रीडेची पूजा व्हायची. रस, भाव, शृंगार यांचा हा उत्सव आहे."
पुराणांमध्ये उल्लेख
पुराणांपेक्षा संस्कृत नाटकांमध्ये मदनोत्सवाचा उल्लेख आहे. 'मृच्छकटिक' किंवा कालिदासाच्या 'मालविकाग्निमित्र' या नाटकांत राजे-रजवाडे आपल्या राजवाड्यात मदनोत्सव साजरा करतात, असे उल्लेख आहेत. हळूहळू ही परंपरा लोप पावली, असं मुंबईत राहणारे पटनाईक सांगतात.
बंगालमध्ये अजूनही वसंत पंचमीला प्रेमाच्या उत्सवाचं रूप आहे. या दिवशी मुलं-मुली एकमेकांना प्रपोज करतात.
"पश्चिम बंगालमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीची पूजा करतात. हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्याची परंपराही इथे जुनी आहे, पण गेल्या काही वर्षांत लोक दिवस प्रेमाचा दिवस 'व्हॅलेनटाईन डे'सारखाच साजरा करू लागले आहेत. आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडबरोबर वेळ घालवतात", असं कोलकत्यातले पत्रकार शुभम बोस सांगतात.
"पूर्वीच्या काळी सरस्वती पूजेच्या दिवशी मुली पहिल्यांदा साडी नेसत," अशी माहितीही शुभम बोस यांनी दिली.
वसंत पंचमी येते तो वसंत ऋतू प्रसन्न वातावरणाचा असतो. हवामान छान असतं. गुलाबी थंडी पडलेली असते. योगायोगाने व्हॅलेंटाईन डेही याच सुमारास येतो.
वसंत पंचमीला प्रेमासाठीचा शुभमुहूर्त आहे, असं अनेक जण मानतात. पण "प्रेमाला मुहूर्त नसतो. किंबहुना मुहूर्त पाहून केलं जातं ते प्रेमच कसलं?" पटनाईक हसत हसत विचारतात.