भारतात विमानांमध्ये वारंवार होणारे बिघाड हे चिंतेचं कारण आहे का?

बुधवार, 27 जुलै 2022 (21:04 IST)
शुभम किशोर
नागरी उड्डाण संचलनालयने (डीजीसीए) स्पाइसजेटच्या विमानांमध्ये येत असलेल्या तांत्रिक बिघाडाबाबत येत असलेल्या तक्रारींनंतर कारवाई केली आहे. डीजीसीएने आठ आठवड्यांसाठी स्पाइसजेटच्या 50 टक्के उड्डाणांवर निर्बंध लादले आहेत. याच दरम्यान डीजीसीए स्पाइसजेटवर नजरही ठेवेल.
 
डीजीसीएनं म्हटलं आहे की, स्पॉट चेक्स, तपासणी आणि स्पाइसजेटला बजावलेली कारणे दाखवा नोटीस यानंतरच ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 18 दिवसांत स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड होण्याच्या आठ घटना घडल्या आहेत.
 
एकदा तर चीनला जात असलेल्या मालवाहू विमानाला कोलकात्याला परत यावं लागलं, कारण त्या विमानाच्या हवामानसंबंधी रडारनं काम करणं बंद केलं होतं.
 
दुसऱ्या एका घटनेमध्ये दुबईला जात असलेल्या पॅसेंजर विमानाला पाकिस्तानातच कराचीमध्ये लँड करावं लागलं. विमानातील इंधनाची पातळी सांगणाऱ्या रडारमध्ये बिघाड आला होता.
 
प्रवाशांना कराचीमध्ये 11 तास काढावे लागले होते. त्यामुळे त्यांचे नातेवाईक, कुटुंबीयांनी काळजी व्यक्त केली होती.
 
या घटनेनंतर डीजीसीएने स्पाइसजेटला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
 
रविवारी (24 जुलै) शारजा ते हैदराबाद या विमानाला कराचीमध्ये उतरवावं लागलं. कंपनीच्या मते पायलटला विमानात तांत्रिक दोष आढळला आणि सावधगिरीचा उपाय म्हणून कराचीला वळवण्यात आलं.
 
रविवारीच एअर इंडिया एक्सप्रेसच्या कालिकत ते दुबई या विमानाला मस्कतला लँड करावं लागलं. विमानात काहीतरी जळण्याचा वास येत होता असं सांगितलं गेलं.
 
पाच जुलैला स्पाईसजेट च्या दिल्ली ते दुबई या विमानाला कराची येथे उतरवलं कारण विमानाच्या फ्युएल इंडिकेटरमध्ये काहीतरी गडबड आढळली.
त्याच दिवशी इंडिगोच्या एका विमानाला इंदोरला लँड केल्यावर विमानात धूर झाल्याची बातमी समोर आली.
 
दोन जुलैला स्पाईस जेट च्या एका विमानाला दिल्लीला लँड करावं लागलं कारण पाच हजार फुटावर केबिनमध्ये धूर दिसला होता.
 
19 जूनला पाटण्यात स्पाईस जेटच्या विमानात इंजिनाला आग लागल्यामुळे इमरजंसी लँडिग करावं लागलं.
 
या वर्षी विमानांचं इमरजंसी लँडिग आणि तांत्रिक गडबडींच्या घटनांची यादी मोठी आहे. गेल्या दोन महिन्यात तांत्रिक कारणांमुळे बिघाड झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
 
DGCA ने केली चौकशी
या सगळ्या घटनांचं एकच कारण दिसत नाही तरी कारणांचा शोध घेण्यासाठी काही मुद्दे शोधले आहेत. त्यातून काही कारणं समोर आली आहेत. ती पुढीलप्रमाणे:
 
1) नीट कारणमीमांसा न होणं.
 
2) दुसरं असं की MEL जारी होण्याचा ट्रेंड वाढत आहे. याचा अर्थ असा आहे की विमानाच्या एखाद्या भागात बिघाड झाला तर खराब झालेलं उपकरण दुरुस्त होईपर्यंत किती काळ विमान उडवता येईल याची परवानगी देणं.
 
3) कमी अंतराच्या विमानांसाठी स्टाफची उपलब्धता.
 
ही समस्या सोडवण्याठी DGCA ने आदेश दिला आहे की आता बेस आणि ट्रान्झिट स्टेशन्स वर सगळ्या विमानांना AME कॅटेगरी B1/B2 परवाना धारक स्टाफला जाण्याचीच परवानगी मिळेल.
 
DGCA ने दिलेल्या कारणांनुसार एयरलाईन इंडस्ट्रीत काहीतरी गडबड असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
 
या विषयावर आणखी माहिती घेण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया
 
काही तज्ज्ञांच्या मते विमानात छोटे छोटे बिघाड होणं ही सामान्य बाब आहे. मात्र गेल्या आठवड्यात ज्या सातत्याने बातम्या येताहेत त्या चिंताजनक आहेत.
 
बीबीसीशी बोलताना DGCA चे माजी प्रमुख भारत भूषण म्हणतात, "वारंवार अशा बातम्या येणं हे चांगलं लक्षण नाही. त्याची कारणं शोधायला हवीत. हे काम DGCA करू शकतं. त्यांच्याकडे सर्व साधनं आहेत."
 
विमानाच्या देखभालीत काही उणीवा आहेत का?
काही तज्ज्ञांच्या मते गेली दोन वर्षं विमानं उडाली नाहीत. त्यामुळे त्यांच्यात तांत्रिक बिघाड होणं शक्य आहे मात्र भूषण याच्याशी सहमत नाही.
 
ते म्हणतात, "या काळात विमानाची देखरेख योग्य पद्धतीने न झाल्याची शक्यता आहे. मात्र विमानाला उड्डाणाची परवानगी दिली याचा अर्थ ते उडण्यायोग्य आहेत. जर विमानात काही गडबड असेल तर ते उडू शकत नाहीत. आम्ही 99 नाही तर 100 टक्के उड्डाणायोग्य विमानांना परवानगी देऊ शकतो."
 
इंडिगो कर्मचाऱ्यांनी विमान तयार करणाऱ्या कंपनी एयरबस ला एक पत्र लिहून सांगितलं आहे की विमानाची देखभाल योग्य पद्धतीने होत नाही. या कारणामुळे इंडिगोचे कर्मचारी, संपावर गेले होते.
 
'हिंदुस्थान टाइम्स'ने या संदर्भात एक बातमी दिली होती.
 
त्या पत्रात "ज्या ऑपरेटरला तुम्ही विमान दिलं होतं. ते विमानाच्या मेन्टेनन्सच्या नियमाचं पालन करत नाहीये. गेल्या चार दिवसांपासून आमचे तंत्रज्ञान विभागाचे कर्मचारी संपावर आहेत. योग्य देखभाल न करता विमानं सुरू आहेत आणि विमानांच्या देखभालीच्या तारखा समोर ढकलल्या जात आहेत.त्यामुळे एयरबसच्या प्रतिष्ठेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. " असं नमूद केलं होतं.
 
इंडिगोने या आरोपांचा इन्कार केला आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटलं, "इंडिगो दर्जाच्या बाबतीत अतिशय सजग आहे आणि सगळं नियमांप्रमाणे होतं. हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत आणि एका विशिष्ट उद्देशाने चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत."
 
DGCA ने सांगितलं की त्यांनी तपास केला आणि सगळं योग्य होतं.
 
स्पाईसजेटनेही एक निवेदन जारी केलं आणि सांगितलं की ते प्रवासी आणि पायलट यांच्या सुरक्षेच्या बाबतीत ते कटिबद्ध आहेत.
 
कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह
16 जूनला दिलेल्या एका निवेदनात स्पाईसजेट चे मालक अजय सिंह म्हणाले होते की विमानात वापरण्यात येणाऱ्या इंधनाची किंमत गेल्या वर्षभरात 120 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचा भार विमान कंपन्यांना उचलणं अतिशय कठीण झालं आहे.
 
ते म्हणाले की या विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाला एव्हिएशन टर्बाईन फ्युएल असं म्हणतात. त्याची किंमत जगभरात भारतात सगळ्यात जास्त आहे. केंद्र सरकारला याबाबतीत तातडीने पावलं उचलायला हवीत.
 
दुसरीकडे विमान कंपन्यांची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे. जाणकारांच्या मते याचा परिणाम देखरेखीवर होतो.
 
काही दिवसांपूर्वी बीबीसीशी बोलताना हवाई वाहतूक तज्ज्ञ मोहन रंगनाथन म्हणाले होते, "जेव्हा एअरलाईन्सकडे कॅश कमी असते तेव्हा विमानाचा एखादा भाग दुसऱ्या विमानासाठी वापरला जातो. पायलटलाही सांगतात की त्यांनी तांत्रिक अडचणींबद्दल बोलू नये. कारण त्यांना नोकरी गमावण्याचा धोका असतो."
 
SETC चे चेअरमन सुभाष गोयलव म्हणतात की गेल्या काही महिन्यांपासून विमानांची तिकिटं अतिशय महाग आहेत. ते पाहता विमान कंपन्या तोट्यात आहेत हे म्हणणं योग्य होणार नाही.
 
ते म्हणाले, "तिकिटाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लोक प्रवास करताहेत. पैसे देण्यात अजिबात हात आखडता घेत नाहीयेत. सर्व विमानं पूर्ण भरली आहेत."
 
विमान कंपन्या नियमांमध्ये सुरक्षा मानकांमध्ये तडजोड करत नाहीत. असे इमर्जंसी लँडिंग जगभरात होत असतात. त्यात फार आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.
 
मात्र भारत भूषण त्यांच्याशी सहमत नाही. त्यांच्या मते जगातील सगळे नियम अतिशय कडक आहेत आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही.
 
नक्की जबाबदारी कोणाची?
सुरक्षेची जबाबदारी एयरलाईन्स आणि DGCA या दोन्हींची आहे. भारत भूषण मानतात की, DGCA ने योग्य नियम पाळले तर असे प्रसंग टाळता येऊ शकतात.
 
या घटनेनंतर DGCA ने चौकशी केली आणि एयरलाईन्सने उत्तरही मागितलं आहे.
 
स्पाईसजेटला DGCA ने कारणे दाखवा नोटिस बजावली आहे आणि एअरलाईन्सने तीन आठवड्यांमध्ये उत्तर मागितलं आहे.
 
भारत भूषण म्हणतात, हे इतकंच पुरेसं नाही. "कारणे दाखवा नोटिस काय असते? याचा अर्थ असा आहे की एअरलाईन कडून उत्तरं मागितले आहे. तुमच्याकडे इतकी संसाधनं आणि इतके लोक आहेत की तुम्ही विमान कंपन्यांची चौकशी करू शकतात."
 
"इतकंच नाही, तर विमानतळांचीही चौकशी व्हायला हवी." ते पुढे म्हणतात.
 
भूषण यांच्या मते, "कंपन्यांवर करडी नजर ठेवली तर असे प्रसंग टाळता येतील. विमानात कुठे गडबड असेल तर विमानांना उड्डाणांपासून थांबायला हवं. "
 
स्पाईस जेटच्या घटनेनंतर मोहन रंगनाथन यांनी DGCA वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
 
त्यांच्या मते, "DGCA च्या मते प्रवाशांची सुरक्षा सर्वोच्च आहे तर त्यांनी विमानांना उडण्यापासून थांबवायला हवं होतं. असं का झालं नाही?"
 
त्यांच्या मते,"ऑडिटची माहिती सहा महिने जुनी आहे. याचा अर्थ असा की DGCAला हे माहिती होतं की स्पाईस जेटच्या काही अडचणी आहेत. मग एअरलाईन्सला वेळ का दिला गेला?"
 
प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करायला हवी- ज्योतिरादित्य शिंदे
DGCA च्या महासंचालकांनी सांगितलं की विमानाच्या सुरक्षेसाठी ते कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीयेत.
 
स्पाईस जेटच्या घटनेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली मात्र फ्लाईट ऑपरेशन रोखण्याबद्दल ते म्हणाले होते की नियमांचं पालन केलं नाही तर कोणत्याही विमान कंपनींना थांबवलं जाऊ शकत नाही."
 
इतर प्रकरणांची चौकशीही DGCA करत आहे.
 
नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंत्रालय आणि DGCA च्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि सर्व नियमांचं योग्य पालन व्हायला हवं असा आदेश दिला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती