डोनाल्ड ट्रंप म्हणतायत तो कचरा खरंच भारतातून अमेरिकेत चाललाय?
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (12:42 IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी न्यूयॉर्कमधल्या इकॉनॉमी क्लबमध्ये 12 नोव्हेंबर रोजी हवामान बदलाबद्दल बोलताना भारत, रशिया आणि चीन आदी देशांवर निशाणा साधला.
यावेळी ते म्हणाले की, "मला पृथ्वीवर स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी असावं, असं वाटतं. लोक मला विचारतात, की यासाठी मी काय करतो. एक लक्षात घ्या की आपला देश लहानसा आहे. आपल्या अमेरिकेच्या लहानशा तुकड्याची आपण आकारानं अवाढव्य अशा चीन, भारत आणि रशियाबरोबर केली तर लक्षात येईल की हे देशसुद्धा इतर अनेक देशांसारखेच काहीही उपाययोजना करत नाहीत."
ट्रंप पुढे म्हणाले की, "हे लोक आपल्या देशातली हवा स्वच्छ करण्यासाठी, आपली पृथ्वी स्वच्छ राखण्यासाठी काहीही करत नाहीयेत. स्वतःकडचा कचरा समुद्रात टाकतात आणि हाच कचरा तरंगत आता लॉस एंजेलिसपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यांचा कचरा लॉस एंजेलिसपर्यंत पोचतोय, पण त्यावर कुणालाही बोलायचं नाहीये."
पण प्रश्न असा आहे की ट्रंप हे नेमके भारत, चीन आणि रशियातल्याच कचऱ्याबद्दल बोलतायंत का?
खरं तर ट्रंप ज्या कचऱ्याबद्दल बोलतायंत तो जगातला ग्रेट पॅसिफिक पॅचच्या नावानं ओळखला जातो. हा कचरा कॅलिफोर्नियाच्या हवाईयन बेटांपर्यंत पोचलेला आहे.
हा कचरा नेमका येतो कुठून?
'नेचर' मासिकाच्या एका अहवालानुसार, हा भाग साठ लाख चौरस मैलांवर पसरलेले आहे, म्हणजेच अमेरिकेच्या टेक्सास राज्यापेक्षा दुप्पट मोठं आहे. या क्षेत्राबद्दल जगाला 1990च्या दशकात पहिल्यांदा माहिती मिळाली. 'ओशन क्लीनअप फाउंडेशन'च्या मते, संपूर्ण प्रशांत महासागरामधून येथे कचरा पोचतो, म्हणजेच प्रशांत महासागराच्या आसपास असलेले आशिया, उत्तर आणि लॅटिन अमेरिकेच्या देशांमधून हा कचरा येतो."
अर्थात यात फक्त मोठे प्लॅस्टिक (सॉलिड प्लॅस्टिक) नाही, तर 1.8 ट्रिलियन प्लॅस्टिकचे तुकडेही आहेत. त्याचं वजन साधारपणे 88 हजार टन म्हणजेच 500 जंबो जेट्सच्या वजनाएवढं आहे. हा कचरा स्वच्छ करण्यासाठी कोणत्याच देशाच्या सरकारनं हात पुढे केलेला नाही. 'ओशन क्लीनअप फाउंडेशन' काही संस्थांबरोबर मिळून हे काम करण्याचा प्रयत्न करत आहे.
सगळ्या जास्त कचरा कोण करतं?
पॅसिफिक समुद्राच्या चारही बाजूंना वसलेल्या देशांतून कचरा येतो आणि जमा होतो. यात कचऱ्यात टाकून दिलेलं प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणावर असतं. हा कचरा नदीमार्गे समुद्रात मिसळतं. ग्रेट पॅसिफिक कचऱ्याच्या पॅचमध्ये वेगवेगळ्या देशांमधून आलेला कचरा साठतो. अर्थात यात अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधलाच कचराही असू शकतो.
'यूएस टुडे'मधल्या एका अहवालानुसार या भागात सर्वात जास्त कचरा चीन आणि दुसऱ्या देशांतून येतो. आशियातील दुसऱ्या क्रमांकावरील भारत देशावर आणि देशाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होतात.
परंतु 2015 सालच्या 'सायंस अॅडव्हान्सेस' मासिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, सगळ्यात जास्त कचरा आशियातून येतोय. याच चीन, इंडोनेशिया, फिलिपीन्स, व्हिएतनाम, श्रीलंका आणि थायलंड आदी देशांतून सगळ्यांत जास्त कचरा येतोय, असं नमूद करण्यात आलं आहे.