International Nurses Day : कोरोना वॉर्ड सांभाळणारी नर्स आणि तिच्या मुलाचं भावनिक मनोगत
मंगळवार, 12 मे 2020 (15:00 IST)
अमृता दुर्वे
कोव्हिड 19च्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसच्या मनात काय घालमेल सुरू असते? त्यांच्या घरच्यांचं काय? विशेषतः त्यांच्या लहान मुलांचं काय?
मुंबईतल्या एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये कोव्हिड वॉर्ड हाताळणाऱ्या एका नर्सचं आणि तिच्या मुलाचं हे मनोगत.
मी एक कोव्हिड वॉर्ड नर्स...
आमच्या हॉस्पिटलची त्या दिवशी तातडीची बैठक झाली. आजपासून आपलं हॉस्पिटल कोव्हिड पेशंट्स घेणार असून त्यासाठी मानसिकरीत्या तयार होण्यास आम्हाला सांगण्यात आलं. त्यासाठी वॉर्ड सज्ज करायला आम्ही सुरुवात केली. कस्तुरबा हॉस्पिटलमधून आमच्याकडे पेशंट्स येणार होते आणि त्यासाठी आम्ही तयारी करत होतो. या कोव्हिड वॉर्डसाठी माझंच डिपार्टमेंट निवडण्यात आल्याचं मला नंतर समजलं.
20 तारखेपासून आम्ही कस्तुरबामधून पेशंट्स घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मी दुसऱ्या डिपार्टमेंटला जाऊन मदत करत होते, म्हणून भीती वाटली नव्हती. तिथे काय काय लागतंय, कशी सोय करण्यात आली आहे, याचा अभ्यास आम्ही करत होतो.
तेच आम्हाला आमच्या वॉर्डमध्येही करायचं होतं, पण त्यावेळीच आता आपल्याला आपल्या कुटुंबाला लांब ठेवावं लागणार असल्याचं लक्षात आलं.
माझ्या मुलाची 10वीची परीक्षा नुकतीच संपली होती आणि लगेचच 24 मार्चला त्याचा 15वा वाढदिवस होता. खरंतर मी त्यासाठी खूप आधीच सुटी टाकलेली होती, बऱ्याच गोष्टी प्लान केल्या होत्या.
माझा नवरा पत्रकार असल्याने आम्ही दोघंही नियमित कामावर जात होतो. पण त्याच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीपासूनच आमच्याकडे पेशंट्स यायला सुरुवात झाली आणि म्हणूनच नवऱ्याशी चर्चा करून आम्ही त्याला आजीकडे पाठवलं.
24 मार्च उजाडला तेव्हा मी सुटी रद्द करून कामावर गेले आणि मग रात्री 8 वाजेपर्यंत मी हॉस्पिटलमध्येच होते. दिवसभराच्या या सगळ्या धावपळीत मी लेकाचा वाढदिवस पूर्णपणे विसरून गेले! त्याला ओवाळणं तर दूरच, मी त्याला साधं विश देखील केलं नव्हतं.
तो माझ्या आईकडे होता, त्याच्या काकीने आणि आजीने त्याला ओवाळलं. अगदीच राहावलं नाही म्हणून आम्ही रात्री 11 वाजता त्याला भेटलो. रात्री उशिरा तिघंही देवासमोर उभं राहिलो आणि त्याचे आभार मानले.
वाढदिवस असूनही आईने स्पेशल काही केलं नाही, पण तरीही त्या दिवशी माझा लेक रागावला नाही किंवा त्याने तक्रारही केली नाही. उलट "It's okay, Mamma. हे सगळं संपल्यावर आपण सेलिब्रेट करू," असं म्हणत त्याने माझीच समजूत घातली.
पण तरीही मला हुरहूर लागलेलीच. मी त्याला प्रॉमिस करण्याऐवजी तोच मला प्रॉमिस करत होता.
यानंतर माझा थेट पेशंट्सशी संबंध येऊ लागला. अनेक विचार मनात यायचे... याचा संसर्ग मला होऊ शकतो, माझ्या टीमला होऊ शकतो, याची जाणीव होतीच. माझ्या वॉर्डमध्ये पहिला पेशंट येण्याआधी मी सगळ्या टीमला एकत्र केलं. त्यांना मिठी मारून सांगितलं की, 'आता आपल्याला ही सगळी परिस्थिती सांभाळायची आहे. तुमची काळजी घेणं, ही टीम लिडर म्हणून माझी जबाबदारी आहे. आपल्याला स्वतःची काळजी घेऊन पेशंट्सचीही काळजी घ्यायची आहे...'
हे सगळं बोलताना डोळ्यांतलं पाणी थांबत नव्हतं, पण मी या समाजाचं काही देणं लागते ही भावना मनात होती, म्हणूनच इथून माघार न घेण्याचं ठरवलं.
पहिला पेशंट स्टेबल झाल्यानंतर जरा धीर वाढला. मुलाला माझ्या आईकडे पाठवलं तरी नवरा घरी होताच. त्याच्या सुरक्षेचं काय? मी घरी आल्याने, माझ्यामुळे कोणाला संसर्ग होईल का? ज्या सोसायटीत राहते, त्यांना काही प्रॉब्लेम होईल का? असे विचार मनात आले की खूप रडू यायचं. आपल्याला हे नाही जमणार अशीही भीतीही कधी कधी वाटायची.
अशाच मनःस्थितीत एकदा लेकाला फोन केला. त्याला सांगितलं तू आता अजिबात इथे घरी यायचं नाहीस आणि मी आणि पप्पाही तिथे येणार नाही. वाहतुकीचे पर्याय बंद असल्याने माझा नवरा मला हॉस्पिटलला सोडत होता. मला कामावर सोडून मग तो कामावर जायचा. हे सगळं समजून घेऊन मुलानेही मानसिक तयारी दाखवली. "ममा, तू आली नाहीस तरी चालेल," असं म्हणत विश्वास दिला.
पण मलाच रडू येत होतं... मुलगा म्हणाला, "ममा, दोन मिनिटं थांब. तू रडू नकोस."
पंधराव्या मिनिटाला तो माझ्या दारात उभा होता. माझ्या हाताला धरून बसवत मला म्हणाला, "ममा, तू रडू नकोस. तू मोठं काम करतेय. आणि पप्पा, आजी, आजोबा, मामा आणि आम्हाला सगळ्यांनाच तुझा अभिमान आहे. तू नर्स आहेस म्हणून माझे मित्रंही तुझं कौतुक करतात. तू असं रडून चालणार नाही. तू हे काम करशील यावर माझा विश्वास आहे."
माझा 15 वर्षांचा मुलगा त्यादिवशी माझ्यापेक्षा मोठा होऊन मला समजावत होता.
त्यानंतर रोज तो मला फोन करायचा. 'तू घरी आलीस का? जेवलीस का? हॉस्पिटलमध्ये काय झालं? काळजी घेतेयस ना?' अशी चौकशी व्हायची. रोज त्याच्याशी बोलताना माझ्या डोळ्यांतून पाणी यायचं आणि तो मला समजवायचा. व्हिडिओ कॉल केला की 'बघ, मी कसा छान, फिट दिसतोय', असं सांगत मला हसवायचा.
कधी कधी वाटायचं की आपण PPE घालतो, आपल्याला धोका नाही. जाऊन लेकाला भेटून यावं. अशावेळी माझा नवरा मला रोखायचा, माझ्या वयोवृद्ध आईवडिलांसाठीही हे धोकादायक ठरू शकतं, याची पुन्हा एकदा जाणीव करून द्यायचा.
14 दिवस हॉस्पिटलममध्ये मी रोज 10 ते 12 तास ड्युटी करायचे, वॉर्ड कोव्हिड पेशंट्सनी भरलेला होता. मात्र या फोन कॉल्सनी मला बळ मिळायचं.
ही साथ कधी आटोक्यात येईल माहिती नाही. कदाचित तो पर्यंत माझ्या मुलाला आजीकडेच रहावं लागेल. कदाचित मला तोपर्यंत त्याला भेटता येणार नाही.
14 दिवस ड्युटी झाल्यानंतर मी हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन होते. नवरा एकटा घरी, मी हॉटेलमध्ये आणि मुलगा आजीकडे. कुटुंबातले तिघे तीन ठिकाणी होतो.
पण सुदैवाने यावेळी फोन कॉल्स आणि व्हीडिओ कॉल्सचाच आधार होता. एकमेकांना आम्ही पाहू शकत होतो. तिघांनी पुन्हा एकत्र बसून गप्पा मारणं कधी शक्य होईल, मला माहीत नाही.
क्वारंटाईनचा कालावधी संपताना दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच मी घरी परतू शकत होते. ही दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर झालेला आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही. 14 दिवस 12 पेशंट्ससोबत काम केल्यानंतरही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने माझा धीर वाढला.
नवऱ्याला न सांगताच हॉटेलमधून मी थेट आईकडे गेले. महिन्याभरानं पाहिल्यानंतर मला माझाच मुलगा खूप वेगळा वाटला. त्यादिवशी मला तो मोठा झाल्यासारखा वाटला. मी पाहत असलेला रोजचा माझा लेक नव्हताच तो. एका महिन्यात खूप काही बदललं होतं.
रिपोर्ट निगेटिव्ह असूनही मी त्याला जवळ घेतलं नाही, कारण मनात कुठेतरी भीती होतीच.
एरवी कधीही व्यक्त न होणाऱ्या माझ्या मुलाने इन्स्टाग्रामवर माझ्यासाठी एक पोस्ट लिहिली. ती पाहून त्याला जवळ घेऊन रडावसं वाटलं. वाटलं त्याला सांगावं की तू माझ्यापेक्षा मोठा आहेस आणि मी लहान आहे.
15 मिनिटं थांबून मी आईकडून निघाले. दोन दिवसांच्या ब्रेकनंतर मी पुन्हा कामावर रुजू झालेय. पुन्हा एकदा हेच महिनाभराचं चक्र फिरणार आहे... पण मनात विश्वास आहे की सारं काही सुरळीत होईल आणि आम्ही पुन्हा एकत्र येऊ.
- सोनल घुमे
या कोव्हिड वॉर्ड हाताळणाऱ्या नर्सचा 15 वर्षांचा मुलगाही यानिमित्ताने व्यक्त झाला.
माझी मम्मा कोव्हिड वॉर्ड सांभाळते...
जगभर कोव्हिड 19 मुळे हाहाःकार माजलाय. प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय... कोणत्या ना कोणत्या प्रकारे सगळ्यांच्याच आयुष्यावर याचा परिणाम झालाय. माझ्याही आयुष्यावर याचा परिणाम झालाय.
ही साथ पसरायला लागली तेव्हा माझी दहावीची परीक्षा सुरू होती. माझ्या मित्रांसारखाच मीदेखील सुट्टीसाठी एक्साइटेड होतो. उन्हाळ्याच्या सुटीत रोज काय-काय करायचं, हे देखील मी ठरवून टाककलं होतं.
पण तेवढ्यातच देशभरात 14 एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मी या निर्णयाने फारसा खुश नव्हतो. या रोगाचं गांभीर्य तोपर्यंत मला समजलं नव्हतं.
माझा पप्पा पत्रकार आहे आणि मम्मा मुंबईतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. ही दोन्ही क्षेत्रं 'अत्यावश्यक सेवां'मध्ये येतात. म्हणजेच त्या दोघांचंही काम लॉकडाऊनच्या काळात सुरू राहणार होतं.
त्यातच, माझ्या मम्माचा तिच्या हॉस्पिटलमधल्या कोरोना पेशंट्सची काळजी घेणाऱ्या टीममध्ये समावेश करण्यात आला होता. माझ्या नर्स मम्माला आणि मग तिच्यामुळे मला इन्फेक्शन होईल, अशी भीती सर्वांना वाटत होती, त्यामुळे मग माझी रवानगी आजीकडे करण्यात आली.
पप्पा या काळात मला कधीकधी आजीकडे भेटायला यायचा. पण तो देखील घरात यायचा नाही, बाहेरूनच बोलायचा. कारण तो मम्मासोबत राहात होता आणि तो देखील ऑफिसला जायचा.
ड्युटीच्या दिवसांनंतर मम्माला तिच्या हॉस्पिटलजवळच्याच हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. जवळपास महिनाभर मी तिला पाहिलंही नव्हतं. त्या दिवसांमध्ये आमच्या तिघांच्या कुटुंबात - पप्पा घरी एकटा, मी आजी-आजोबांकडे आणि मम्मा एकटी हॉटेलवर क्वारंटाईनमध्ये.
खबरदारीचा उपाय म्हणून तिची कोरोनासाठीची चाचणी घेण्यात आली. सगळ्यांनाच त्याचं टेन्शन आलं होतं. त्यात तिच्या एका सहकाऱ्याची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं समजल्याने कुटुंबातल्या सगळ्यांचीच काळजी वाढली होती.
मम्माला मी रोज फोन करायचो. कधी-कधी व्हिडिओ कॉल. तिला वाईट वाटतंय, एकटं वाटतंय हे समजायचं मला. मी आणि कुटुंबातले सगळेच तिला चीअर-अप करण्याचा प्रयत्न करायचो. तिला हसवण्यासाठी मी काहीतरी जोक करायचो. पण ती खूप मोठ्या धोक्याला रोज सामोरी जात असल्याची जाणीव आत खोलवर कुठेतरी होतीच.
कोरोनासाठीची टेस्ट निगेटिव्ह आल्याचं तिने फोनवर सांगितलं, आणि सगळ्यांनीच निःश्वास सोडला. तिला धोका नाही हे समजल्याने सगळेच खूप खुश होते.
काही दिवसांनी भेटायला येईन, असं मम्माने मला सांगितलं होतं, आणि अचानकच 21 एप्रिलला ती हॉटेलमधून निघून थेट आजीच्या दरवाजात येऊन उभी राहिली. आल्या-आल्या तिने हात आणि तोंड धुतले, पुसले आणि सोफ्यावर बसली.
मी खूप आनंदात होतो, चकित झालो होतो. ती इतक्या लवकर येईल, असं वाटलंच नव्हतं मला. तिला घट्ट मिठी मारावी, असं मला वाटत होतं, पण तिने मला तिच्यापासून लांब राहायला सांगितलं.
खरंतर मला कुशीत घेऊन तिचं माझ्यावर किती प्रेम आहे हे सांगावं, असं मम्मालाही वाटत असेल, पण ती तसं करू शकली नाही... पण इतक्या दिवसांनंतर तिला पाहणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
2020 मधला माझ्यासाठीचा आतापर्यंतचा हा सगळ्यात चांगला दिवस होता.
माझं तिच्यावर किती प्रेम आहे, हे त्या दिवशी माझ्या लक्षात आलं. मम्मा आता माझ्यासोबत असेल असं वाटून मी खूप खूश होतो. पण ती माझ्यासोबत राहू शकणार नव्हती. दोन दिवसांनी ती कामावर परतणार होती आणि त्यानंतरचे दोन आठवडे ती हॉटेलला राहणार आहे.
मला खरंतर तिला जाऊन द्यायचंच नव्हतं... पण तिला जावंच लागलं, कारण सध्या हॉस्पिटलमध्ये नर्सेसचा तुटवडा आहे.
'Duty always comes first' हे मला तिच्याकडूनच समजलं. इतक्या जबाबदारीने वागणाऱ्या पालकांचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे.
सध्या आपल्याला घरी बसून कंटाळा येतोय, आपले हक्क हिरावल्यासारखं वाटतंय. पण कोरोना व्हायरसची साखळी मोडून काढण्यासाठी ते गरजेचं आहे.
यापुढे लहानशा कारणासाठी घराबाहेर पडताना माझ्या मम्मा-पप्पांसारख्या लोकांचा विचार करा. असे अनेक जण आहेत, जे त्यांच्या कुटुंबापासून दूर राहून रात्रंदिवस काम करतायत... सगळ्यांनाच सुरक्षित ठेवण्यासाठी. घराबाहेर पडण्याआधी या 'कोव्हिड वॉरियर्स'च्या कुटुंबांचा विचार करा, ज्यांच्या जीवाला या 'वॉरियर्स'च्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या काळजीने घोर लागलाय.